पोहे, उपमा, इडली, डोसे याशिवाय नाश्त्याला करण्यासारखं खूप काही आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 04:00 PM2017-12-16T16:00:02+5:302017-12-16T16:10:31+5:30

पोहे, उपमा, इडली, डोसा हे नाश्त्याचे नेहमीचे पदार्थ आपणास माहित आहेत. परंतु, भारतीय खाद्यपरंपरेत प्रांतानुसार विविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी केले जातात. चवीला अप्रतिम आणि पौष्टिक असे हे पदार्थ आहेत. हे पदार्थ आपणही नाश्त्याला करू शकतो.

There is so much to do in snacks why we stuck on poha and upma? | पोहे, उपमा, इडली, डोसे याशिवाय नाश्त्याला करण्यासारखं खूप काही आहे!

पोहे, उपमा, इडली, डोसे याशिवाय नाश्त्याला करण्यासारखं खूप काही आहे!

Next
ठळक मुद्दे* मुगाची डाळ भिजत घालून त्याचे डोसे काढून त्यात उपम्याचे सारण भरु न हा डोसा आंध्रप्रदेशात न्याहारीला खाल्ला जातो.* पराठ्यांचं, दुधा-तुपाचं राज्य म्हणून पंजाबची ओळख आहे. नाश्त्याच्या पदार्थातही पंजाबची खासियत आहेच.* छिलका रोटी, नमकिन पीठा, घुगनी, लिट्टी चोखा ही यादी जेवणाची नसून झारखंडमधील नाश्त्याच्या पदार्थांची आहे. इथल्या नाश्त्याच्या पदार्थात भरपूर व्हरायटी आहे.




-सारिका पूरकर-गुजराथी


ब्रेकफास्ट अर्थात नाश्ता, न्याहारी. या नाश्त्याचे महत्व मानवी आरोग्यासाठी किती आहे हे वेगळं सांगायला नको. आहारतज्ज्ञांच्या मते नाश्ता हा भरपूर प्रमाणात, त्यानंतर जेवण त्यापेक्षा कमी आणि रात्रीचं जेवण त्याहीपेक्षा कमी हे प्रमाण अगदी योग्य आहे. म्हणूनच आजच्या धावपळीच्या काळातही नाश्ता टाळू नका असा सल्ला प्रत्येक डॉक्टर देताना दिसतात. दिवसाची सुरूवात एनर्जिटिक करायची असेल तर नाश्ता करायलाच हवा. पोहे, उपमा, इडली, डोसा . नाश्त्याचे हे नेहमीचे पदार्थ आपणास माहित आहेत. परंतु, भारतीय खाद्यपरंपरेत प्रांतानुसार विविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी केले जातात. चवीला अप्रतिम आणि पौष्टिक असे हे पदार्थ आहेत.

नाश्त्याला कुठे काय काय?

1) पेसरुट्टू उपमा ( आंध्रप्रदेश )- मुगाची डाळ भिजत घालून त्याचे डोसे काढून त्यात उपम्याचे सारण भरु न हा डोसा आंध्रप्रदेशात न्याहारीला खाल्ला जातो. मुगाची डाळ पचायला हलकी आणि पौष्टिक असते. तर उपमा हा चवदार असतो. त्यामुळे हे कॉम्बिनेशन चवीला भन्नाट लागतं. आपण डोशात भाजी भरतो तसेच यात उपमा भरला जातो.

 

2) टान व चांगांग ( मणिपूर ) - मणिपूरचा हा सर्वात लोकप्रिया नाश्त्याचा पदार्थ आहे. पुरीसोबत वाटाण्याची डाळ दिली जाते. तसेच जोडीला दूध न घातलेला चहा असतो. यालाच चांगांग म्हणतात.

3) मिरची वडा ( राजस्थान )- चटपटीत पदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या राजस्थानचा हा नाश्त्याचा पदार्थही खूपच चटपटीत असाच आहे. लांब आणि आकाराने जरा जाड हिरव्या मिरच्या बेसनाच्या घोळात घोळवून वडे काढून तळलेल्या मिरचीसोबत दिले जातात. सोबत चहा असेल तर मस्तच!

 

4) आलू पराठा ( पंजाब )- पराठ्यांचं, दुधा-तुपाचं राज्य म्हणून पंजाबची ओळख आहे. नाश्त्याच्या या पदार्थातही पंजाबची खासियत दिसते. भरपूर तूप, बटर लावून तसेच बटाट्याचं सारण भरून केलेला पराठा आणि ताजे, मलईदार घट्ट दही. परिपूर्ण असा हा पोटभरीचा नाश्ता आहे.

5) छुरा भजा ( ओरिसा ) - महाराष्ट्रीयन पोहयांचे ओरिसा व्हर्जन असा हा पदार्थ आहे. पातळ पोहे भाजून त्यात बारीक चिरलेला कांदा, आले-मिरची, कढीपत्ता,शेंगदाणे घातले जातात. चवीला क्रि स्पी लागणारा हा पदार्थ करायला वेळही लागत नाही.

 

6) पोहे आणि जिलबी ( इंदोर, मध्यप्रदेश ) - खवय्यांचे शहर अर्थात इंदोरमधील हा सर्वात लोकप्रिय पदार्थ. पोह्यांवर स्पेशल इंदोरी मसाला आणि पिवळी शेव भुरभुरून हे पोहे जिलबीसोबत नाश्त्याला दिले जातात. चव अर्थातच अप्रतिम हे वेगळं सांगायला नकोच.

7) छिलका रोटी, नमकिन पीठा, घुगनी, लिट्टी चोखा ( झारखंड ) - जेवणाची नाही नाश्त्याचीच यादी आहे ही. इथल्या नाश्त्याच्या पदार्थात भरपूर व्हरायटी आहे. त्यात हरभरा डाळ आणि तांदूळ भिजवून वाटून त्याचे काढलेले डोसे म्हणजे छिलका रोटी. घुगनी म्हणजे अर्थातच हरभरा उसळ. नमकीन पीठा म्हणजेच तिखट-मीठाचे उकडीचे मोदक म्हटले तरी हरकत नाही. लिट्टी म्हणजे बाटी.

8) नीर डोसा ( कर्नाटक ) - फक्त तांदूळ भिजवून, वाटून काढलेले डोसे म्हणजे नीर डोसा. नारळाची चटणी, सांबार याबरोबर तो छानच लागतो. नाही तर कोरडी चटणी केली जाते. त्याबरोबरही तो छान लागतो.

 

9) भटुरु आणि लस्सी ( हिमाचल प्रदेश ) - एरवी छोल्यांबरोबर पंजाबमध्ये मैद्याचे भटुरे केले जातात. हिमाचलप्रदेशात मात्र गव्हाची कणिक आंबवून त्याचे भटुरु तळून काढले जातात.

10 )बेसनाची मसाला रोटी ( हरियाणा )- बेसनात विविध मसाले घालून हे सारण भरून केलेले पराठे म्हणजेच बेसनाची मसाला रोटी. तळलेल्या मिरच्यांसोबत ही मसाला रोटी हरियाणात चवीनं खाल्ली जाते.

 

11 ) सत्तूचे पराठे ( बिहार )- बिहारची सिग्नेचर डिश म्हणून या पदार्थाचा उल्लेख करता येईल. डाळ भाजून त्याचं पीठ करून त्यात विविध मसाले घालून सारण तयार केलं जातं. ते भरून हे पराठे केले जातात.प्रोटीनयुक्त असा हा पराठा आहे.

12) पुट्टु ( केरळ ) - तांदूळ आणि ओलं खोबरं यांचे थर एकावर एक लावून आणि ते वाफवून हा पदार्थ तयार केला जातो. दोन्ही घटक केरळमध्ये भरपूर पिकतात, त्यामुळे नाश्त्याला पुट्टु हमखास असतोच.

13) कचोरी- रस्सा ( उत्तरप्रदेश ) -खमंग , खस्ता कचोरी बटट्याच्या रश्श्यासोबत तसेच हिरव्या मिरचीबरोबर सर्व्ह केली जाते. उत्तर प्रदेशातील हा लोकप्रिय स्ट्रीट फूडचा प्रकार तसेच नाश्त्याचा पदार्थ आहे.

14) लुची -आलू (बंगाल ) - मैद्याची टम्म फुगलेली पुरी आणि बटाट्याची कोरडी भाजी असे हे बंगालमधील फेमस कॉम्बिनेशन आहे. येथे पुरीला लुची म्हणतात.

 

15) जोलपान (आसाम ) - तांदूळ भाजून केलेली पूड, पातळ पोहे, मुरमुरे हे एकत्र करु न दही-गुळ घालून आसाममध्ये नाश्त्याला खाल्ले जातात.

16) भाजी-पाव ( गोवा )- पावभाजी सारखा नाही तर बटाट्याची रस्सा भाजी आणि सोबत पाव असा हा पदार्थ आहे. भाजीत टोमॅटो घातले जातात.

Web Title: There is so much to do in snacks why we stuck on poha and upma?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.