लाल गाजरांचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 01:12 PM2018-12-31T13:12:53+5:302018-12-31T13:22:24+5:30
सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर लाल गाजरं येऊन दाखल झाली आहेत. अशातच घराघरांमध्ये गाजराची कोशिंबीर, गाजराचा हलवा यांसारख्या पदार्थांची मेजवानी असेलचं.
सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर लाल गाजरं येऊन दाखल झाली आहेत. अशातच घराघरांमध्ये गाजराची कोशिंबीर, गाजराचा हलवा यांसारख्या पदार्थांची मेजवानी असेलचं. खाण्यासाठी चवीष्ट आणि कमी कॅलरी असणारं लाल गाजर पौष्टिक तत्वांचा भांडार असतं, असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. यामध्ये बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, खनिजं, व्हिटॅमिन बी1 आणि अॅन्टीऑक्सिडंट यांसारखी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. जर तुम्ही नियमितपणे गाजराचा आहारात समावेश केला तर ते आरोग्यासाठी लाभदायक ठरतं.
गाजराचे आरोग्यदायी फायदे :
- गाजराचा कोणत्याही स्वरूपात नियमितपणे आहारात समावेश केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. यामध्ये बीटा कॅरोटिन मुबलक प्रमाणात असते. गाजर खाल्यानंतर पोटामध्ये जाऊन त्याचे रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होते. डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए अत्यंत उपयोगी ठरतं. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या रॅटिनामध्ये परावर्तित होतं. त्याचप्रमाणे गारजारामधील पौष्टिक तत्वामुळे मोतीबिंदू आणि रातआंधळेपणाची समस्या दूर होते.
- गाजराचा आहारात समावेश केल्याने फुफ्फुसं, ब्रेस्ट आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी होतो. अनेक पदार्थांपैकी गाजरचं असा पदार्थ आहे की, ज्यामध्ये फाल्केरिनोल नावाचे प्राकृतिक कीटनाशक आढळून येतं. अनेक संशोधनांमधून असं आढळून आलं आहे की, गाजराचे सेवन केल्याने कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचा धोका एक तृतियांश कमी होतो.
- गाजराचे सेवन केल्याने वाढत्या वयाची लक्षणंही कमी दिसून येतात. गाजरामध्ये असणारी पोषक तत्व अॅन्टी-एजिंगप्रमाणे काम करतात. यामध्ये भरपूर प्रमाणात असणारं बीटा कॅरोटिन, अॅन्टी-ऑक्सिडंट आपल्या शरीरातील पेशींसाठी उपयोगी ठरतं. यामुळे शरीरावर दिसणाऱ्या सुरकुत्या दूर होतात.
- गाजरामध्ये असणारे औषधी गुणधर्म कोणत्याही प्रकारच्या संक्रमणाला दूर करतं. शक्य असल्यास तुम्ही गाजराचा ज्युस पिऊ शकता किंवा उकडून खाऊ शकता.
- त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही गाजर मदत करतं. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅन्टी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे गाजराचा आहारात समावेश केल्याने सुर्याच्या अतिनिल किरणांमुळे त्वचेला होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो.
- जर नियमितपणे गाजराचा समावेश आहारात केला तर तजेलदार त्वचा मिळण्यास मदत होते. तसेच वाढत्या वयाची लक्षणं, कोरडी त्वचा, अॅक्ने, पिगमेंटेशन, सुरकुत्या इत्याही समस्यांवरही परिणामकारक ठरतं.
- गाजराच्या ज्युसमध्ये काळं मीठ, कोथिंबीरीची पानं, भाजलेलं जीरं, काळी मिरी आणि लिंबाचा रस एकत्र करून प्यायल्याने पचनासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात.
- हॉवर्ड यूनिवर्सिटीने आपल्या एका संशोधनातून सांगितले की, जी लोकं आठवड्यातून पाच किंवा त्यापेक्षा अधिक गाजर खात असतील तर त्यांना गाजर कमी खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका कमी असतो. गाजराचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण यामध्ये असणारं फायबर शरीरातील पित्त कमी करण्यासाठी मदत करतं.
- व्हिटॅमिन ए शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. गाजरामध्ये अस्तित्वात असणारं फायबर कोलोन कॅन्सरवर परिणामकारक ठरतं.
- गाजराच्या सेवनाने दातांचे आरोग्य चांगले राखण्यासही मदत होते. दातांच्या स्वच्छतेसोबतच तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि हिरड्यांचे आरोग्यचांगले राखण्यासाठी मदत करतात.
- भाजलेल्या त्वचेवर गाजराचा रस लावल्याने आराम मिळतो. बराच वेळापासून स्किन अॅलर्जी किंवा इन्फेक्शनचा सामना करत असाल तर गाजर किसून त्यामध्ये मीठ एकत्र करून खा. त्वचेच्या इतरही समस्यांवर हा उपाय परिणामकारक ठरतो.