त्वचेला ‘हेल्थी’ करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये हे आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 07:16 PM2017-08-02T19:16:39+5:302017-08-02T19:25:15+5:30
निरोगी त्वचा ही काही आपोआप होत नाही. त्यासाठी वरून करण्याचे उपाय जमत नसतील तर उपाय पोटातून करावेत. म्हणजे त्वचेच्या आरोग्याला उपयुक्त पडतील अशा घटकांचा आहारात समावेश केला आणि तोही नियमित तर त्वचेचा पोत नक्की सुधारतो.
- माधुरी पेठकर
त्वचेचा रंग कोणता ही गोष्टे एवढी महत्त्वाची नसते. पण त्वचेचा पोत मात्र नक्कीच महत्त्वाचा असतो. आणि त्वचेचा पोत अवलंबून असतो तो त्वचेच्या आरोग्यावर. म्हणूनच निरोगी त्वचा हीच उत्तम त्वचा मानली जाते. कोणत्याही ॠतूत, ऊन वारा, थंडी, पाऊस अशी कोणतीही परिस्थिती असू देत त्वचेवरची चमक, ओलावा हेच निरोगी त्वचेचं महत्त्वाचं लक्षण असतं.
त्वचा निरोगी ठेवायची असेल तर त्यासाठी नियमित उपाय करणं गरजेचं. हे जरी खरं असलं तरी रोजच्या धावपळीत लेप-लुप लावायला दहा पंधरा मीनिटं काढणंही अनेक जणींना अवघड जातं. पण जमत नाही म्हणून काहीच करायला नको असं मात्र नाही. कारण निरोगी त्वचा ही काही आपोआप होत नाही. त्यासाठी वरून करण्याचे उपाय जमत नसतील तर उपाय पोटातून करावेत. म्हणजे त्वचेच्या आरोग्याला उपयुक्त पडतील अशा घटकांचा आहारात समावेश केला आणि तोही नियमित तर त्वचेचा पोत नक्की सुधारतो.
चांगल्या त्वचेसाठी हे खा
1) आॅलिव्ह आॅइल
आॅलिव्ह आॅइलमध्ये इ जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. या तेलात अॅण्टिआॅक्सिडण्टस असतात. यामुळे त्वचा निरोगी होण्यास मदत होते. या तेलात असलेले पॉलिफिनॉल्स त्वचा खराब करणार्या घटकांचा नायनाट करतात.
2) बेरी-स्ट्रॉबेरी
मोठ्या प्रमाणात अॅण्टिआॅक्सिडण्टस असलेल्या ब्ल्यू बेरी, ब्लॅक बेरी, कॅनबेरी,रासबेरी आणि स्ट्रॉबेरी यासारखी बेरी फळं जशी उपलब्ध असतील तशी खावीत. या फळांमध्ये 85 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे ही फळं खाल्ल्यास त्वचेतला ओलावा टिकून राहतो. ही बेरी फळं शक्यतो सकाळी नाश्त्याच्या वेळी खावीत. किंवा स्मुथीमध्ये टाकून प्यावीत.
3) डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये असलेल फ्लेव्होनिडस त्वचेला हानी पोहोचवणार्या घटकांपासून सूर्याच्या तीव अति नील किरणांपासून त्वचेचं संरक्षण करतात. तसेच डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम, लोह, मॅग्नीज यासारखी खनिजं असतात. ही खनिजं त्वचेवर प्रदूषण, मानसिक तणावाचा जो ताण येतो त्यापासून त्वचेचचं रक्षण करतात. शिवाय पेशींच्या पुर्नज्जीवनाचं कामही करतात. आणि म्ह्णूनच चांगल्या त्वचेसाठी डार्क चॉकलेट खाणं फायदेशीर ठरतं.
4) टमाटे
टमाटयात असलेले अॅण्टिआॅक्सिडण्टस त्वचेचं अती नील किरणांपासून रक्षण करतात . टमाट्याच्या नियमित सेवनानं त्वचेवर वयाच्या खुणा दिसत नाहीत. त्वचा चिरतरूण ठेवण्यासाठी आहारात टमाटे असणं म्हणूनच आवश्यक असतं.
5) अव्हॅकॅडो
अव्हॅकॅडोमध्ये असलेले बियोटीन या घटकामुळे त्वचा कोरडी होत नाही. या फळामध्ये अ, ड आणि इ जीवनसत्त्वं, ओमेगा 9 फॅटी अॅसिडस मोठ्या प्रमाणात असतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हे घटक महत्त्वाचा हातभार लावतात.
6) ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अॅण्टिआॅक्सिडण्टस असतात जे त्वचेचं त्वचेच्या कर्करोगापासून रक्षण करतात. तसेच ग्रीन टीमुळे त्वचेतला ओलावा वाढतो. ज्याचा परिणाम वयाच्या खुणा त्वचेवर दिसत नाही.