ट्रायआउटचा टेस्टी ट्रेण्ड

By admin | Published: April 3, 2017 05:10 PM2017-04-03T17:10:36+5:302017-04-03T17:10:36+5:30

वन प्लेटर मेन्यू. असा कधी हॉटेलवाले देतील आणि कॉफीचं ग्लॅमर सरून चहाला एकदम कडक ग्लॅमर येईल असं आपल्याला कधी वाटलं होतं का?

Trial track of tripouts | ट्रायआउटचा टेस्टी ट्रेण्ड

ट्रायआउटचा टेस्टी ट्रेण्ड

Next

  भक्ती सोमण 

वन प्लेटर मेन्यू. असा कधी हॉटेलवाले देतील आणि कॉफीचं ग्लॅमर सरून चहाला एकदम कडक ग्लॅमर येईल असं आपल्याला कधी वाटलं होतं का? पण तसं होतंय २०१७ ने वर्षाच्या सुरुवातीलाच खाण्यापिण्याचा ट्रेण्डही तरुण आणि स्मार्ट बनवण्याचा चंग बांधला आहे...

माझी एक मैत्रीण हॉटेलमध्ये गेली होती. तिथल्या एकंदरीत वातावरणानं भारावून जात, आपण एकदा इथं येऊया म्हणून तिनं मला फोन केला. मग एकदा गेलोच तर त्या रेस्टोरण्टमधल्या पदार्थांची चव तर अप्रतिम होतीच. पण एक मोठा बदल म्हणजे वन प्लेटर मेन्यू. एका माणसाला खाता येईल अशी डीश आणि तिही खाण्याच्याच प्लेटमध्ये वेटरने आणून दिली. मैत्रिणीनं मागवलेल्या पास्तात त्या डिशमध्ये तिच्यापुरताच पास्ता आणि भरपूर सॅलेड होतं. प्रत्येकाने वेगवेगळ्या डीश अशाच प्रकारे मागवल्या होत्या. थोडक्यात, काय तर बाऊलमधून प्लेटमध्ये वाढलचं गेलं नाही.

परत पदार्थांचा दरही अत्यंत वाजवी. पदार्थ वाया जाण्याची चिंताच नाही. खाण्यापिण्याचा सगळ्यात महत्त्वाचा हा बदल, हाच यंदाचा खास नवाकोरा फूड ट्रेण्ड असेल असं दिसतं आहे. पण हा एकच कशाला, खाण्यापिण्याचं सारं जगच तरुण होतं आहे. तरुणांसाठी आणि तरुणांनी म्हणून असे वेगवेगळे ट्रेण्ड्स सध्या चलतीत आहे. आणि मुख्य म्हणजे हे नुस्ते ट्रेण्ड्स नाही तर बदलत्या लाइफस्टाइलचे आरसेही आहेत. त्या आरशातलं हे एक चमचमीत, स्टायलिश, हेल्दी चित्र. १) इट हेल्दी, बी हेल्दी आजकाल अनेकजण इतके बिझी की सकाळी भरपेट नास्ता करायलाही फुरसत नसते.

पण आपण फिट, धडधाकट राहावं, पौष्टिक खावं ही समजही आता मूळ धरते आहे. म्हणून मग जास्तीत जास्त भाज्या, कडधान्य पोटात जाईल याची काळजी बरेचजण घेताना दिसतात. सूप, छोटा बर्गर, भाज्या घातलेला पास्ता आणि भरपूर सॅलेड असं खाण्याचा ट्रेण् मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (याला ब्रंच असंही म्हणतात.) शिवाय तुमचं दिवसभरच शेड्यूल बघून त्यानुसार आता शरीराच्या पोषणतत्त्वानुसार आवश्यक असणारी सॅलेड्सही आता मिळू लागली आहेत. विविध भाज्या, कडधान्य, पालेभाज्या यांचं मिश्रण असलेली ही सॅलेड्स सध्या जाम हीट आहेत.

२) मॉलिक्यूलर क्युझिनची चलती सध्या चायनिज, मॅक्सीकन अशा क्युझिनपेक्षा मॉलिक्यूलर स्टाइल क्युझिनची चलती जास्त आहे. झाडापासून बनवल्या जाणाऱ्या केमिकल्स(रसायन)चा उपयोग जेवणामध्ये करून बनवण्यात आलेल्या पदार्थांना मॉलिक्यूलर स्टाइल्सचे पदार्थ म्हणतात. कॅल्शिअम क्लोराईट, अलजिनेट, अगरअगर, झिंगरगम अशा प्रकारची अनेक रसायने खाण्यासाठी तसेच आरोग्यासाठीही चांगली असतात. या रसायनांचा योग्य पद्धतीने वापर करून त्यापासून कावियर म्हणून किंवा पावडर म्हणून वापर होऊ शकतो. कावियर म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे तर एखाद्या पदार्थाची गोळी.

मिरची, रोझ, पिनाकोलाडा, टोमॅटो यांच्यासारख्या अनेक पदार्थांपासून कावियर करता येते. अशा स्टाइलचे पदार्थ देणारी अनेक हॉटेल्स सध्या शहरांमध्ये सुरू आहेत. या पदार्थांचा तज्ज्ञ असलेल्या शेफ सिद्धेश परबने सांगितले की, हे पदार्थ करण्यात एक वेगळे स्किल आहे. समजा, तुम्ही ढोकळा खाणार असाल तर ढोकळ्याचे क्रंबल करायचे. त्याच्याबरोबची चटणी पावडर फॉर्ममध्ये आणि मिरचीचे कावियर करतात. सिद्धेशने अशा पदार्थांचे अनेक नमुने दाखवले. दही-पापडी चाटमध्ये शेवपुरीच्या पापडीवर दह्याचा बॉल होता तर खजुराच्या चटणीबरोबरच हिरवी चटणी म्हणून कॉरिएण्डरचे ज्यूस होते. दही-वड्याचा तर अजब फॉर्मुला होता.

वडा डिहायड्रेटरमध्ये सुकवून त्याची पावडर आणि दह्याचे बोल केले होते. चिंचेच्या चटणीच्या डिपबरोबर हे खायचे. या पदार्थांचा नवा ट्रेण्ड सध्या सुरू आहे. त्यासाठी मात्र चांगले पैसे मोजायची तयारी ठेवायला हवी. ३) फ्युजन क्रिएशन दोन वेगवेगळ्या पदार्थांचे वैशिष्ट्य घेत त्यापासून फ्यूजन करण्याचा ट्रेण्ड वाढत आहे. श्वार्मासाठी पिटा या अरेबिक ब्रेडच्या वापराऐवजी आता बागेट्स या फ्रेंच ब्रेडचा वापर करून त्याचे स्टफिंग सॅण्डवीचसारखे देता येते. असे अनेक पदार्थांत करण्याची पद्धत सुरू झाली आहे. ४) म्हणाल तो केक आता थीमनुसार केक तयार होऊ लागले आहेत. त्यात वाढदिवसाच्या केकमध्ये तर लहान मुलांच्या आवडत्या कार्टूनपासून ते एखाद्या व्यक्तीच्या आवडीनुसार तसे केक तयार होत आहेत.

याशिवाय साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम, डोहाळेजवण अशा कितीतरी गोष्टींसाठी थीम बेस केकची चलती आहे. याबरोबरच सध्या पैठणी आणि त्यावरचे दागिने असा केकही खूप लोकप्रिय आहे. या सर्व केक्सची किंमत साधारण १००० पासून पुढे सुरू होते. याशिवाय छोटे कप केक्सनाही चांगली डिमाण्ड आहे. या केक्सवर वेगवेगळ्या कलरचे क्रीम घालून ते आकर्षक सजवण्याकडेही कल वाढला आहे. शिवाय, त्यात गुलाबजाम, रसगुल्ला, बुंदीचा लाडू स्टफ्ड करून दिले जातात. हे प्रकारही सध्या लोकप्रिय आहेत. ५) फ्रीकशेक्स सध्या ड्रिंक्समध्ये फ्रीकशेक्सची क्रेझ प्रचंड आहे. जारमध्ये त्याच्या टोकापर्यंत विविध ड्रिंक्स तर आपण पितोच. पण फ्रीकशेक्समध्ये मोठ्या जारमध्ये चॉकलेट, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, व्हॅनिला अशा फ्लेवर्सचे शेक्स केले जातात. ते जारमध्ये वरपर्यत भरून त्याच्यावर आइस्क्रीस स्कूप किंवा कोनासकट आइस्क्रीम, स्ट्रॉबेरी, चॉकलेटचे तुकडे, प्लम केक, बिस्कीट असे बरेच प्रकार एकत्र करून दिले जातात. तो जार पाहूनच आपलं पोट निम्म भरतं.

६) चाय पिऐंगे? सध्या कॉफी पिण्यापेक्षा चहा पिण्याकडे कल वाढतो आहे. त्यासाठी मुंबई, पुणे अशा शहरात तर टी लाउंजेस सुरू झाली आहेत. तिथे गरम मसाला चहापासून ते थंड चहाचे प्रकार मिळत आहेत. तसेच "बबल टी" या नव्या चहाच्या प्रकाराची सध्या उत्सुकता आहे. हा बबल टी तैवान येथे मिळत असलेला चहाचा प्रकार आहे. यात थोडासा कोरा चहा, थोडे दूध, आवडत असलेल्या फळांचा रस, टॅपिओकाचे वेगवेगळ्या रंगाचे गोळे एकत्र करून हा चहा दिला जातो. तर याशिवाय हनी लेमन टी, आइस टी, हर्बल टी, ब्लॅक टी, पीच, मिंट, चॉकलेट टी असे चहाचे फ्लेवर्स सध्या खूप लोकप्रिय आहेत.

Web Title: Trial track of tripouts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.