वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी खास 'मॅजिकल' चहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:26 PM2018-11-03T16:26:30+5:302018-11-03T16:26:59+5:30
दिवाळीपूर्वीच स्थिती गंभीर झाली असून नंतर काय होईल या चिंतेने लोक हैराण आहेत. या विषारी हवेमुळे अनेकांना श्वास घेणे कठीण झाले असून अनेकांना डोकेदुखी, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळत नाहीये.
सध्या देशाची राजधानी दिल्लीसह देशातील इतरही काही शहरांना वायु प्रदूषणाने आपल्या जाळ्यात घेतलं आहे. दिवाळीपूर्वीच स्थिती गंभीर झाली असून नंतर काय होईल या चिंतेने लोक हैराण आहेत. या विषारी हवेमुळे अनेकांना श्वास घेणे कठीण झाले असून अनेकांना डोकेदुखी, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळत नाहीये. अशा प्रकारची समस्या दूर ठेवणे तर कठीण आहेच. पण अशक्य नाहीये. यावर ही लंग टी म्हणजेच डीटॉक्स टी फायदेशीर उपाय आहे.
हानिकारक तत्व निघतील बाहेर
हेल्थ एक्सपर्ट ल्यूक कोटिन्हो यांनी नुकतीच ही आयडिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'मॅजिकल लंग टी' प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच हानिकारक तत्व बाहेर काढण्यास याने मदत मिळेल. हा चहा सर्वच लोक ट्राय करु शकतात.
फुफ्फुसांना डीटॉक्स करण्यासाठी फायदेशीर
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ल्यूक म्हणाले की, 'सध्याचं वाढतं प्रदूषण आणि थंडीतील स्मॉग चिंतेची बाब आहे. यामुळे अस्थमा, सायनस, श्वास घेण्यास अडचण, सर्दी-खोकला अशा समस्या वेगाने वाढत आहेत. अशात तुम्ही ही मॅजिक लंग टी घरी सहज तयार करु शकता. यासाठी तुम्हाला किचनमधील काही नेहमीच्या मसाल्यांचा वापर करावा लागेल. या चहाच्या मदतीने फुफ्फुसं डीटॉक्स होतात'.
कसा कराल तयार हा चहा?
एका भांड्यामध्ये २ कप पाणी घ्या आणि उकळू द्या. त्यानंतर यात एक छोटा तुकडा आलं, दालचीनीचा छोटा तुकडा किंवा दालचीनी पावडर, थोडा गूळ, ५ ते ६ तुळशीची पाने, १ चमचा सुकलेले ऑरिगॅनो, ३ काळे मिरे, २ वेलची बारीक केलेली, थोडी बडीशेप, चिमुटभर ओवा, थोडं जिरे, लसणाच्या १ ते २ कळ्या हे सर्व उकळत्या पाण्यात टाका. हे मिश्रण साधारण १० मिनिटे कमी आचेवर उकळू द्या. नंतर एका कपात हा चहा गाळा. हा चहा गरम असताना प्यायल्यास अधिक फायदा होतो.
काय होईल फायदा?
हा चहा नियमीतपणे सेवन केल्यास याने तुमची फुफ्फुसं निरोगी राहतील. श्वासनलिकेतील अडथळेही दूर होतील. याने डोकेदुखी, सर्दी खोकलाही दूर होईल. या खास चहाची चव वाढवण्यासाठी यात गूळाचं प्रमाण किंवा मधाचं प्रमाण कमी-जास्त करु शकता.