चवदार, हिरवागार 'डाळ पालक' नक्की ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 04:20 PM2020-01-09T16:20:48+5:302020-01-09T16:24:43+5:30
पालक पराठे किंवा पालक पनीर यांच्यापेक्षाही पौष्टिक आणि चवदार अशी 'डाळ पालकाची' आमटी किंवा भाजी आपल्याकडे घरोघरी केली जाते. त्यातलीच ही एक पद्धत.
हिवाळ्याच्या दिवसात पालकाची भाजी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते. पालक पराठे किंवा पालक पनीर यांच्यापेक्षाही पौष्टिक आणि चवदार अशी 'डाळ पालकाची' आमटी किंवा भाजी आपल्याकडे घरोघरी केली जाते. त्यातलीच ही एक पद्धत. तेव्हा हा डाळ पालक घरी नक्की करून बघा आणि हिवाळा अधिक आरोग्यदायी बनवा.
साहित्य :
- ताजा आणि बारीक चिरलेला पालक १ मोठी वाटी
- अर्धी वाटी मूग किंवा तुरीची डाळ
- लसूण सात ते आठ पाकळ्या
- हिरव्या मिरच्या चार ते पाच
- टोमॅटो एक, मध्यम आकाराचा
- फोडणीसाठी : तेल, मोहरी, हिंग, हळद, दोन सुक्या लाल मिरच्या
- मीठ
कृती :
कुकरमध्ये डाळ, धुवून बारीक चिरलेला पालक, टोमॅटो एकत्र करा.
आता डाळीच्या तिप्पट पाणी, चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद घालून तीन शिट्ट्या घ्या.
कुकर गार झाल्यावर पालक आणि डाळ एकजीव करून घ्या.
आवश्यकता वाटल्यास दोन वाट्या पाणी घाला.
आता या भाजीत एक चमचा मीठ घाला.
भाजीला उकळी आल्यावर गॅस बारीक करा.
लहान कढईत तेल तापवून घ्या. त्यात मोहरी टाका.
मोहरी तडतडल्यावर बारीक चिरलेल्या लसणाचे तुकडे टाकून सोनेरी रंगापर्यंत थांबा आणि गॅस बंद करा.
आता तात्काळ दोन लाल मिरच्या तोंडून टाका आणि चमूटभर हिंग आणि हळद घालून फोडणी जळण्याच्या आत भाजीवर टाका.
गरमागरम डाळ पालक खाण्यास तयार आहे. हा पालक पोळी, भाकरी किंवा गरमागरम भातासोबत अफलातून लागतो. चवीला अत्यंत उत्कृष्ट आणि पौष्टिक डाळ पालक या हिवाळ्यात नक्की ट्राय करा.