आहारातील 'या' तीन रंगांचे काय आहे महत्त्व?; जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 02:01 PM2019-01-29T14:01:12+5:302019-01-29T14:02:29+5:30
राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याचा आपण कायम सन्मान करतो. तिरंग्यातील तीन रंग आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे असतात ते पाहू. आपल्या आहारात 2 प्रकारचे स्रोत असतात.
राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याचा आपण कायम सन्मान करतो. तिरंग्यातील तीन रंग आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे असतात ते पाहू. आपल्या आहारात 2 प्रकारचे स्रोत असतात. पहिला प्राणीजन्य स्रोत आणि दुसरा वनस्पतीजन्य स्रोत. यातील वनस्पतीजन्य स्रोतांमधून आपल्याला फायटो पोषणमूल्ये मिळतात. साधारण 25000 पेक्षा जास्त प्रकारची पोषणमूल्ये ही यात येतात.
केशरी रंग :
तिरंग्यातील पहिला रंग केशरी. तसेच आहारातील एक अत्यावश्यक रंग म्हणून आपण केशरी रंग वापरायला हवा. केशरी फळ व भाज्यांमध्ये कॅटेनाईड या प्रकारचे फायटो पोषणमूल्ये असतात. हे कॅटोनाईड पोषणमूल्ये ते अँटिऑक्सिडंटचं काम करत असतात, म्हणजे नियमितपणे आपल्या शरीरात जी फ्री रॅडीकल तयार होतात, त्याचा निचरा करण्याचे काम हे कॅटोनाईड करतात. अल्फा कॅटोनाईड, बिटा कॅटोनाईड, बिटा क्रीपटोझीन इ. याचे आपल्या शरीरात व्हिटॅमिन एमध्ये रूपांतर होतं. जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच डोळ्याच्या आरोग्याची काळजी घेतात. पिवळी, केशरी फळ व भाज्यामधून मिळणारे व्हिटॅमिन हे डोळ्याच्या वयापरत्वे कमकुवत होणाऱ्या पेशींचं संरक्षण करतात. मोतीबिंदूपासून डोळ्याचे संरक्षण करतात. म्हणून आहारात नैसर्गिकपणे उपलब्ध असणारा केशरी-पिवळा रंगाची फळे भाज्या वापराव्या. जसे की लालभोपळा, गाजर, संत्री, आंबा.
पांढरा रंग :
मीठ, साखर, मैदा हे पांढरे पदार्थ आहारातून काढून टाकावेत, पण त्याचबरोबर नैसर्गिकत: पांढऱ्या पदार्थांचा जरूर समावेश करावा. यात दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी यांचा समावेश आहारात करणे अपेक्षित आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रोटिन्स पुरवितात, जे शरीराच्या वाढीसाठी व झीज भरून काढण्यासाठी आवश्यक असतात. तसेच पांढऱ्या भाज्या व फळे यांचा समावेश करावा. तसेच हाडं बळकट व्हायला मदत होईल. म्हणून आहारात पांढरे तीळ, कांदा, मुळा, काजू, लसूणचा समावेश करावा.
हिरवा रंग :
हिरव्या रंगाच्या पालेभाज्या, भाज्या व फळ हे आरोग्यासाठी पोषक असतात. हिरव्या पालेभाज्या हे फ्रंटपोषण मूल्यांचा खजिनाच मानला जातो व त्यामधून आपल्याला ल्युटीन, आयसोफ्लवोनास, आयसोथिसायनेट मिळत असतात. ही सगळी द्रव्ये आपल्या शरीरासाठी अत्यंत हितकारक असतात. आपल्या डोळ्याचे आरोग्य, पेशीसंस्थेचे काम, फुफ्साचं कार्य, यकृताचे कार्य व दातांची मूळ घट्ट करणे या पोषण मुल्यांचा मोलाचा आधार असतो. तसेच शरीरात जमा होणारे अनावश्यक द्रव्ये बाहेर टाकण्याचं काम हिरव्या पालेभाज्यांमधील तंतूमय पदार्थ करत असतात. म्हणून विविध प्रकारच्या पालेभाज्या मेथी, पालक, हिरवा माठ, आंबटचुका, चाकवत, शेपू, तसेच कोथिंबीर, कढीपत्ता, पुदीना याचा देखील आहारात योग्य प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. तरं हिरवी फळ, हिरवी द्राक्ष, पेरू, किवी, कैरी यांचा देखील आहारात योग्य मोसमात समावेश करणे गरजेचे आहे.