शाकाहारी लोकांसाठी फायदेशीर ठरतं 'पी प्रोटीन'; जाणून घ्या काय आहेत फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 12:35 PM2018-11-12T12:35:46+5:302018-11-12T12:36:20+5:30
सध्या बदलती जीवनशैली आणि धावपळीचं दैनंदिन जीवन याचसोबत वाढत्या प्रदूषणामुळेही आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.
सध्या बदलती जीवनशैली आणि धावपळीचं दैनंदिन जीवन याचसोबत वाढत्या प्रदूषणामुळेही आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. आरोग्य चांगलं राखण्यासाठी अनेक लोक आपल्या आहारामध्ये बदल करून योग्य आणि सकस आहाराकडे आपलं लक्ष केंद्रित करत आहेत. त्यासाठी वेगन डाएट, प्लांट बेस्ड डाएटचा आहारामध्ये समावेश करण्यात येत आहे.
मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटिनचे स्त्रोत मर्यादित आहेत. जे लोक मांसाहारी पदार्थांऐवजी शाकाहारी पदार्थांचं सेवन करत आहेत त्यांना शरीराला आवश्यक प्रमाणात प्रोटिन्स पुरवण्यासाठी दूध, पनीर, सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या पदार्थांवर अवलंबून राहावं लागतं. परंतु काही व्यक्तींना 'लॅक्टोज इन्टोलेरेंट'ची समस्या होते. या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींना दूध आणि दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ पचण्यास त्रास होतो. अशा व्यक्तींना शरीराला आवश्यक तेवढं प्रोटीन पुरवण्यासाठी 'पी प्रोटीन' म्हणजेच हिरव्या वाटाण्याच्या दूधाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. यामध्ये प्रोटीनची मात्रा अधिक असते परंतु हे ग्लुटन फ्रीदेखील असतात.
शाकाहारी लोकांसाठी बेस्ट आहे प्रोटीन डाएट
शाकाहारी लोकांसाठी पी- मिल्क म्हणजेच पी प्रोटीन बेस्ट डाएट आहे. हे प्रोटीन, आयर्नसोबतच शरीराला आवश्यक असणाऱ्या अनेक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करतं.
असं तयार होतं 'पी प्रोटीन'
वाटाण्यापासून दूध तयार करण्यासाठी सर्वात आधी वाटाण्याचा उपयोग करून प्रोटीन पावडर तयार करण्यात येते. यासाठी वाटाण्याचे दाणे सुकवून वाटण्यात येतात. त्याची बारिक पावडर तयार करण्यात येते. त्यानंतर पाण्याच्या मदतीने एक पेस्ट तयार करून त्यातील फायबर आणि स्टार्च काढून टाकण्यात येतात. या पेस्टमध्ये आता फक्त प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शिल्लक राहतात. शेवटी पुन्हा ही पेस्ट सुकवून बारीक पावडर तयार करण्यात येते. बाजारामध्ये 'पी प्रोटीन' पावडर अगदी सहज उपलब्ध होते. ही पावडर दूधामध्ये मिक्स करून पिण्यात येते.
दूध किंवा दूधाचे पदार्थ पचवण्यास त्रास होत असेल तर पी-प्रोटीन घ्या
शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन शरीराला पुरवण्यासाठी मांसाहारी पदार्थ आणि दूधाची आवश्यकता असते. तुम्ही शाकाहारी असाल आणि दूधाचे पदार्थ पचण्यासही त्रास होत असेल तर तुमच्यासाठी 'पी प्रोटीन' उत्तम पर्याय ठरेल. तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून 'पी प्रोटीन' घेऊ शकता. त्यामुळे शरीरातील प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यास मदत होते.
अनेक पोषक तत्वांचा स्त्रोत
पी प्रोटीन या नावावरूनचं समजत असेल की, यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावर आढळून येते. एक ग्लास पी प्रोटीनमध्ये व्यक्तीला जवळपास 16 ते 20 ग्रॅम प्रोटीन मिळण्यास मदत होते. दोन कप वाटाण्यामध्ये जवळपास चार कप ग्रेन्स असतं. त्याचप्रमाणे पी प्रोटीन शाकाहारी व्यक्तींसाठी आयर्नचाही चांगला स्त्रोत समजला जातो. याव्यतिरिक्त यामध्ये व्हिटॅमिन ए, ई, डी, के आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात.
बराच वेळ भूक लागत नाही
पी प्रोटीनच्या एक ग्लास दूधामध्ये अमीनो अॅसिड मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही. त्याचबरोबर यामधील पोषक तत्वांमुळे पोटाच्या अनेक तक्रारीही दूर होतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
प्रोटीनयुक्त हे दूध शरीरातील स्नायू बळकट करण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. जी लोक फूड क्रेविंगच्या समस्येने त्रस्त असतील त्यांच्यासाठीही पी प्रोटीन उपयुक्त ठरते.