फराळ झाल्यावर तळलेले तेल बरेच उरले तर काय करायचे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:41 AM2022-10-25T11:41:24+5:302022-10-25T11:41:45+5:30
दिवाळीचा फराळ करून झाला, पदार्थ तळून झाले की एक प्रश्न कायमच असतो, तो म्हणजे उरलेल्या तेलाचं काय करायचं?
- मंजिरी कुलकर्णी
दिवाळीचा फराळ करून झाला, पदार्थ तळून झाले की एक प्रश्न कायमच असतो, तो म्हणजे उरलेल्या तेलाचं काय करायचं? कुणी म्हणतं ते तेल भाजीआमटीला वापरून टाकावे, कुणी त्यातच पुन्हा पुन्हा पदार्थ तळते, कुणी ते तेल न खाता सरळ फेकून देते. यातलं खरं-खोटं काय? तळलेल्या तेलाचं नेमकं करायचं काय? आणि मुळात म्हणजे एकदा पदार्थ तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरावे का?
तर त्या प्रश्नांचं एकच उत्तर, की एकदा आपण ज्यात पदार्थ तळला, ते तेल उरलं तर ते तेल अजिबात वापरू नये. असे पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल आरोग्यासाठी अतिशय घातक असू शकते. त्यामुळे तळताना अंदाजाने मापात तेल घ्यावे, कारण उरलेले तेल टाकून देणं जीवावर येणं साहजिकच आहे. मात्र आरोग्याचा विचार करता एकच तेल पुन्हा पुन्हा गरम करून पदार्थ तळणे हे हिताचे नाही.
तळलेले तेल पुन्हा पुन्हा का वापरू नये?
>> तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असू शकते. त्या तेलाच्या पुनर्वापराने कॅन्सरसह अनेक घातक आजार होण्याची शक्यता असते.
>> पुन्हा पुन्हा तळलेले तेल वापरल्याने खराब कोलेस्टेरॉल वाढते.
>> पुन्हा पुन्हा गरम केलेल्या तेलात कॅन्सर कॉजिंग एजंट, पॉलिसायकलिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणतात, ते हानीकारक घटक असतात. त्यानं कर्करोग होण्याचा धोका बळावतो.
>> अनेकदा गरम केल्यानं तेलात विषारी प्रक्रिया सुरु होते.
>> त्यातले चांगले घटक कमी होतात.
>> म्हणून पुन्हा पुन्हा तळलेले तेल आरोग्याला अतिशय हानीकारक असते. ते वापरू नये.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)