...म्हणून जपानी खाद्यपदार्थ जगात सर्वाधिक आरोग्यदायी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 06:12 PM2018-12-06T18:12:55+5:302018-12-06T18:20:17+5:30
जपानी माणसांच्या आरोग्यदायी आयुष्याचं रहस्य त्यांच्या खाद्यसंस्कृतीत दडलंय
मुंबई: जगभरातील माणसांचं सरासरी आयुमान 71 वर्षे आहे. मात्र जपानमधील व्यक्तींचं सरासरी आयुमान 83.7 वर्षे आहे. जपानी माणसांच्या आयुमानाचं रहस्य त्यांच्या खाद्य संस्कृतीत दडलं आहे. खाद्यपदार्थांकडे आरोग्यदायी दृष्टीकोनातून पाहिलं जावं, अशी शिकवण जपानी संस्कृतीत आहे. 'हारा हाची बू' असं जपानमध्ये म्हटलं जातं. याचा अर्थ पोट 80% भरेपर्यंत जेवावं, असा होता. विशेष म्हणजे परंपरेतून आलेली ही शिकवण मुलांना लहानपणीच दिली जाते.
खाद्यपदार्थ समोरच्या व्यक्तीसमोर कसे ठेवले जातात, याला जपानमध्ये अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे जेवण वाढताना विशेष काळजी घेतली जाते. खाद्यपदार्थ एखाद्या व्यक्तीच्या समोर मांडताना त्याच्या ते डोळ्याला सुखावतील, हे पाहिलं जातं. खाद्यपदार्थ पोटात जाण्याआधी ते पाहूनच तुमची ज्ञानेंद्रियं जागृत होतील, याबद्दल जपानी मंडळी अतिशय दक्ष असतात. त्यामुळे हे पदार्थ खाताना फक्त पोट न भरता, त्याचा 'फिल' घेता येतो.
कॅलरी कशा कमी करायच्या याची चिंता सतावत असेल, तर जपानी खाद्यपदार्थ हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. कारण जपानमधील व्यक्तींच्या आहारात जगातील इतर माणसांच्या तुलनेत 25% कमी कॅलरी असतात. फ्लोरिडा विद्यापीठाच्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे. जपानी खाद्यपदार्थ लहान ताटांमध्ये आणि वाट्यांमध्ये वाढले जातात. यामुळेच जपानी माणसांचं आरोग्य जास्त चांगलं राहतं, असं आहारतज्ज्ञांचं मत आहे. ताटात जास्त जेवण वाढल्यावर अनेकदा ते संपवण्यासाठी माणसं जेवतात. याउलट जपानमध्ये गरजेइतकंच अन्न सेवन केलं जातं. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. याचा खूप मोठा फायदा आरोग्याला होतो.