हिवाळा स्पेशल : चवदार आणि पौष्टिक बाजरीची खिचडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 03:34 PM2019-01-08T15:34:50+5:302019-01-08T15:36:21+5:30
हिवाळा म्हटलं की खाण्याची चंगळचं !याच काळात खास केली जाणारी, अतिशय सोपी आणि चवदार अशी बाजरीची खिचडी.
Next
पुणे : हिवाळा म्हटलं की खाण्याची चंगळचं ! ताजा हुरडा, हिरव्यागार भाज्या आणि कुडकुडायला लावणारी थंडी अशा वातावरणात काहीतरी नवं, चवदार आणि भन्नाट खावंसं वाटलं नाही तरंच नवल. याच काळात खास केली जाणारी, अतिशय सोपी आणि चवदार अशी बाजरीची खिचडी. बाजरी उष्ण मानली जाते. आणि हिवाळ्यात शरीराला गरज असल्यामुळे खान्देश, मराठवाड्यात ही खिचडी आवर्जून करता.तेव्हा यंदाचा हिवाळा संपायच्या आत बाजरीची खिचडी नक्की करा.
साहित्य :
बाजरी : एक वाटी
तांदूळ :अर्धी वाटी
मुगाची डाळ :पाव वाटी
हिरव्या मिरच्या दोन
लसूण पाकळ्या आठ ते दहा
हिंग
हळद
मोहरी
मीठ
तेल
कोथिंबीर :सजावटीसाठी
कृती :
- बाजरी निवडून कमीत कमी आठ तास पाण्यात भिजवून ठेवा.
- खिचडी करण्याआधी तांदूळ आणि डाळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा.
- कुकरमध्ये बाजरी, तांदूळ आणि डाळ आणि साडेचार ते पाच वाट्या उकळलेले पाणी घाला.
- यात चवीपुरते मीठ, हळद आणि हिंग घालून सात ते आठ शिट्ट्या घ्या.
- बाजरी शिजण्यास कठीण असल्याने जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतात.
- आता कुकर गार झाल्यावर शिजवलेले धान्य पळीने घोटून एकजीव करा.
- दुसऱ्या भांड्यात तेल किंवा तूप घालून त्यात मोहरी आणि जिरे तडतडवून घ्या.
- त्यात उभ्या चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून त्या खरपूस तळून घ्या.
- त्यात दोन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून घालून ही फोडणी खिचडीत घालून एकजीव करा.
- सजावटीसाठी आवडीनुसार कोथिंबीर घाला.
- ही खिचडी पातळ आणि सरसरीत असते. मात्र आवडत नसल्यास पाणी कमी घालावे.
- खिचडीवर तूप घालून लोणचं आणि पापडासोबत सर्व्ह करावी.