यंदाच्या हिवाळ्यात डिंक खोब-याच्या लाडू सोबतच भारतातल्या इतर प्रांतातले खास हिवाळ्याचे पदार्थही करून पाहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 06:35 PM2017-11-06T18:35:20+5:302017-11-06T18:41:05+5:30
डिंक खोब-याच्या लाडूसोबतच आपल्या भारतातील हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थांची परंपरा संपत नाही. डिंक, साजूक तूप, सुकेमेवे याचबरोबर गहू-बाजरीचं पीठ, उडीद डाळ यापासून असे अनेक पौष्टिक पदार्थ देशभरात तयार केले जातात. चवीला अत्यंत रूचकर आणि शरीरासाठी आरोग्यवर्धक असे हे पदार्थ या हिवाळ्यात आपणही ट्राय करायला हवेत.
- सारिका पूरकर-गुजराथी
गुलाबी थंडीची चाहुल लागलीय. त्यामुळे अवती-भोवती छान प्रसन्न वातावरण आहे. हिवाळा हा तसा अनेकांचा फेवरिट ॠतू आहे. कडक उन्हाचे चटके नाही की पावसाची चिकचिक, रिपरिप नाही. मनसोक्त भटका, खा-प्या असा हा ॠतु. खवय्यांचा तर त्याहून फेवरिट. तसेच बलसंवर्धन, शरीरसौष्ठत्वासाठी हिवाळा ॠतु अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण या ॠतुुत कडकडून भूक लागते. आपण जे खातो, त्याचं पचनही चांगलं होतं. आजीच्या भाषेत सांगायचं झाल्यास अंगी लागतं. शिवाय बाजारात भाजी-पाला, धान्यं,फळ-फळावळ यांची मुबलकताही असते. म्हणूनच हिवाळा आला की घरोघरी डिंकाचे, मेथीचे लाडू करण्याची परंपरा आजही टिकून आहे. वर्षभरासाठीची ऊर्जा शक्ती या लाडवातून मिळावी म्हणून हे लाडू तयार केले जातात.
परंतु, केवळ या लाडवांपुरतीच आपल्या भारतातील हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थांची परंपरा संपते असे नाहीये. तर डिंक, साजूक तूप, सुकेमेवे याचबरोबर गहू-बाजरीचं पीठ, उडीद डाळ यापासून असे अनेक पौष्टिक पदार्थ देशभरात तयार केले जातात. चवीला अत्यंत रूचकर आणि शरीरासाठी आरोग्यवर्धक असे हे पदार्थ या हिवाळ्यात आपणही ट्राय करायला हवेत.
1) राब
गुजराती बांधवांचा हिवाळ्यातील हा पारंपरिक पदार्थ. कडाक्याच्या थंडीत सर्दी झाली असेल तर गरगागरम राब प्यायला देतात. तसेच बाळंतीण महिलांसाठीही राब खूप शक्तीवर्धक मानला जातो. आपल्या महाराष्ट्रात यास घाटा असट म्हणतात. साजूक तूपावर ओवा तडतडवून दोन चमचे बाजरीचं पीठ भाजून घेतलं जातं. नंतर गुळ पाण्यात विरघळवून हे पाणी आणि सुंठ पावडर भाजलेल्या पीठात घालून मिश्रण चांगलं सरबरीत केलं जातं. चवीनुसार त्यात मीठ घातलं जातं. त्यास उकळी आणून गरमागरम राब प्यायला देतात,. महाराष्ट्रात घाटा याच पध्दतीनं केला जातो. साजूक तूपात जिरे तडतडून घेऊन पीठ भाजून घेतलं जातं. नंतर यात पाणी घालून चांगली उकळी आली की थोडं दूध घातलं जातं. पुन्हा उकळी आल्यावर चवीनुुसार साखर-मीठ घालून घाटा गरम असतानाच बशीत ओतला जातो. बाजरी उष्ण असल्यानं हिवाळ्यात राब किंवा घाटा बनवला जातो.
2) अदादिया
हा देखील गुजरातमधीलच एक पारंपरिक पदार्थ हिवाळ्यात हमखास केला जातो. अत्यंत पौष्टिक आणि खमंग चवीचा हा पदार्थ आहे. उडीद डाळीच्या पीठात साजूक तूप आणि थोडं दूध घालून ते चांगलं चोळून घेऊन त्याचा दाबा तयार केला जातो. म्हणजेच हे मिश्रण एकत्र करून रवाळ करूम दाबून ठेवलं जातं. नंतर साजूक तूपात हे पीठ चांगलं भाजून घेतलं जातं. यात साजूक तूपात तळून बारीक केलेला खायचा डिंक, सुकेमेवे, जायफळ पावडर घालून मिश्रण एकजीव केलं जातं. यातच पीठीसाखर घालून, चांगले फेणून ताटात थापून वड्या पाडल्या जातात. शक्यतो काळ्या उडदाच्या डाळीपासून अदादिया बनवला तर पौष्टिक मुल्यं आणखी वाढतात.
3) चिगली उंडे किंवा कचरियू
दक्षिण भारतात खास हिवाळ्यात बनविला जाणारा हा असाच एक पौष्टिक पदार्थ. काळे तीळ आणि गुळ हे दोन मुख्य घटक यात वापरले जातात. काळे तीळ आणि गुळ हे शरीरास भरपूर लोह देणारे असतात. तसेच उष्ण देखील असतात. म्हणूनच हिवाळ्यात हा पदार्थ तयार केला जातो. तीळ भाजून त्याची पूड करून घेतली जाते. यात किसलेला गुळ, आवडत असल्यास वेलची पावडर, सुकेमेवे तसेच साजूक तूप घालून लाडू वळले जातात. गुजरातमध्ये हाच पदार्थ वेगळ्या पद्धतीनं तयार केला जातो.काळे खजूर आणि अंजीर तुकडे एकत्र परतून त्याचे छोटे लाडू बनवले जातात. नंतर काळे तीळ, खोबरे, टरबूजाच्या बिया, बदाम भाजून गुळ टाकून त्याची पूड बनवली जाते. या मिश्रणात सुंठ, वेलची आणि जायफळ पावडर घातली जाते. तीळ आणि खोब-याचं तेल सुटल्यामुळे मिश्रण सैल बनतं. या मिश्रणाची पारी बनवून त्यात अंजीर-खजुराचं सारण भरु न लाडू वळले जातात. गरजेनुसार साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करण्यास हरकत नसते.
4) दोधा बर्फी
हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीत शाही चव देणारा हा पंजाबमधील पारंपरिक पदार्थ. अर्थातच पौष्टिकतेनं परिपूर्ण असलेला. साजूक तूपात गव्हाचा दलिया परतून घेतला जातो. दूध ( दूधालाच दोधा म्हणतात) आणि भरपूर मलई एकत्र करु न चांगले उकळले की त्यात हा दलिया घालून पुन्हा उकळून दलिया शिजेपर्यंत आणि दूध घट्ट होईपर्यंत आटवलं जातं. यातच भरपूर सुकेमेवे, कोको पावडर,साखर घालून मिश्रण कडा सोडायला लागलं की वड्या थापल्या जातात. वरून पुन्हा सुकेमेवे पसरवून दोधा बर्फी खाल्ली जाते. पंजाबमध्ये गहू आणि दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. म्हणून हा पदार्थ हमखास हिवाळ्यात केला जातो.
5)रागी माल्ट
दक्षिण भारतात केला जाणारा हा पदार्थ हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थांच्या यादीतीलच. आपण घाटा करतो तसाच परंतु थोडा शाही. साजूक तूपात नागलीचं पीठ भाजून त्यात पाणी आणि दूध घालून उकळून घेतलं जातं. नंतर यात साखर, वेलची पावडर, केशर आणि बदामाची पावडर घालून आणखी एक उकळी काढून गरमागरम खाल्लं जातं. हिवाळ्यात दररोज पिण्याचे पेय म्हणून दक्षिण भारतात रागी माल्ट लोकिप्रय आहे.
6) अलसी पिन्नी किंवा जवसाची बर्फी
जवस शरीरासाठी किती लाभदायक आहे, हे आपण जाणतोच. हिवाळ्यातही जवस आरोग्य संर्वधनासाठी उपयुक्त आहे. पंजाब आणि उत्तर भारतात खास हिवाळ्यात ही पिन्नी तयार केली जाते. जवस आणि गव्हाचं पीठ समप्रमाणात घेऊन साजूक तूपात भाजून घेतलं जातं. तत्पूर्वी जवस कोरडेच भाजून त्याचं पीठ करु न नंतर ते साजूक तूपात परतलं जातं. खायचा डिंक साजूक तूपात तळून बारीक केला जातो तसेच सुकेमेवे भरडून पूड केली जाते. गुळाचा किंवा साखरेचा एक तारी पाक करु न त्यात जवसाचं पीठ, गव्हाचं पीठ, डिंकाची पूड, सुकामेव्यांची भरड घालून मिश्रण कडा सोडेपर्यंत आटवून वड्या पाडल्या जातात.