जागतिक पोहे दिन विशेष : पुण्यात या पाच ठिकाणी मिळतात भन्नाट पोहे !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 06:23 PM2019-06-07T18:23:43+5:302019-06-07T18:29:31+5:30
पिवळ्याधम्मक पोह्यांवर ओल्या खोबऱ्याची पखरण आणि हिरव्याकंच कोथिंबीरिची साथ असलेले बघूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यातही या पोह्यांमध्ये तळलेले शेंगादाणे आणि शेव असतील तर सोने पे सुहागा योगच. त्यामुळे दही पोहे असोत किंवा दडपे पोहे आणि तर्री पोहे असोत किंवा कांदा पोहे पण घरोघरी पोहे व्हायलाच हवे. म्हणतात ना उदरभरण 'पोहे' जाणी जे यज्ञकर्म !
पुणे: आज जागतिक पोहे दिन. महाराष्ट्रात असे एकही घर नाही जिथे पोहे मिळत नाहीत. पिवळ्याधम्मक पोह्यांवर ओल्या खोबऱ्याची पखरण आणि हिरव्याकंच कोथिंबीरिची साथ असलेले बघूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यातही या पोह्यांमध्ये तळलेले शेंगादाणे आणि शेव असतील तर सोने पे सुहागा योगच. त्यामुळे दही पोहे असोत किंवा दडपे पोहे आणि तर्री पोहे असोत किंवा कांदा पोहे पण घरोघरी पोहे व्हायलाच हवे. म्हणतात ना उदरभरण 'पोहे' जाणी जे यज्ञकर्म !
उदयविहार : एस पी कॉलेज समोर
टिळक रस्त्यावर एस पी कॉलेजसमोर असलेल्या उदयविहारमधील पोह्यांसाठी आजही गर्दी असते. दुनियादारी चित्रपटातही उदयविहारचा उल्लेख आहे. अनेक वर्षांनंतरही या पोह्यांची चव अबाधित असून तिथल्या पोह्यांसोबत मिळणारी हिरवी चटणी त्यांची विशेष ओळख आहे.
उडपी पोहे : शनिवारवाड्यासमोर
शनिवारवाड्यासमोरील उडुपीमध्ये सकाळच्या वेळी पोह्यांसाठी वेटिंग असते. भरपूर पोहे आणि त्यात सांबर आणि चटणी टाकत इथे पोहे सर्व्ह केले जातात. इथल्या पोह्यांना पार्सल नेण्यासाठीही अनेकजण येतात.
(तर्री पोहे)
आम्ही पोहेकर : पत्र्या मारुती चौक, नारायण पेठ
आम्ही पोहेकर हे नवीन पोह्यांना वाहिलेलं हॉटेल सुरु झालं असून इथे सुमारे १६ प्रकारचे पोहे मिळतात. २० रुपयांत इथे पोटभर पोहे मिळतात. फक्त पोहेच नाही तर पोहे कटलेट आणि वडेही अप्रतिम आहेत. इथले तर्री पोहे, भेळ पोहे, दही पोहे, कोकणी पोहे आवर्जून ट्राय करते.
अमृततुल्य :नळस्टॉप
हा स्पॉट तर अजिबात मिस करू नका. नळस्टॉपवर मध्यरात्री अडीच ते सकाळी ७ पर्यंत पोहे मिळतात. खरं तर इथे अनेक पदार्थ मिळतात पण हे ठिकाण ओळखलं जातं ते पोह्यांसाठी. चवदार पोहे खाण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी असते.
बिपीन स्नॅक्स सेंटर : गरवारे कॉलेजसमोर
इथली साबुदाण्याची खिचडी, शिरा असे पदार्थ खाण्यासाठी खवैय्यांची गर्दी असते. पण पट्टीचा खवैय्या आजही बिपीनचे पोहे टॉप क्लास असल्याचे मानतो. इथे गेल्यावर पहिली ऑर्डर पोह्याची द्या आणि आस्वाद घ्या मऊसूत, चवदार, वाफाळलेल्या पोह्यांचा.