बाप्पांच्या नैवेद्याला नवीन काही शोधत असाल तर हे करून पाहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 04:32 PM2017-08-19T16:32:44+5:302017-08-19T16:40:58+5:30
बाप्पांच्या सेवेसाठी सकाळ-सायंकाळ नैवेद्य काय करावा? हा प्रश्न गृहिणींना नेहमीच पडतो. खिरापत, लाडू, मोदक, बर्फी या काही पारंपरिक चवींबरोबरच बाप्पालाही काही नवीन चवी चाखण्यास देता येतील का? हा प्रयत्नही अलीकडे होताना दिसतोय. म्हणूनच बाप्पांच्या नैवेद्यासाठी हे काही वेगळे पर्याय.. ट्राय करून पाहावेत असेच!
सारिका पूरकर-गुजराथी
आपल्या सर्वांच्या लाडक्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलं आहे. बाप्पा येताना आपल्याबरोबर मंगलमय, चैतन्यानं मंतरलेले दिवस घेऊन येणार आहे. त्याच्या चरणी भक्तीभावानं लीन झाल्यावर सर्वांनाच तो भरभरून आशीर्वाद, रोजच्या जगण्यातील अनेक अडचणींवर मात करण्याची शक्ती देऊन जाणार आहे. म्हणूनच बाप्पांचं आगमन म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभरात एक आनंद, चैतन्याचा सोहळा म्हणून साजरा होतो. 64 कलांच्या या देवतेचं घरात आगमन झाल्यावर त्याच्या सेवेत कसलीही उणीव राहू नये म्हणून सर्वच जण तन-मन-धनानं प्रयत्न करतात. प्रसन्न सजावट, आरती, अथर्वशीर्ष यांचे मंगल सूर यामुळे सा-यानाच एक तरतरी, टवटवी येते. तर अशा या मंगल सोहळ्यासाठी सज्ज होताना घराघरात बाप्पांच्या सेवेसाठी सकाळ-सायंकाळ नैवेद्य काय करावा? हा प्रश्न गृहिणींना नेहमीच पडतो. खिरापत, लाडू, मोदक, बर्फी या काही पारंपरिक चवींबरोबरच बाप्पालाही काही नवीन चवी देता येतील का, हा प्रयत्नही अलीकडे होताना दिसतोय. म्हणूनच बाप्पांच्या नैवेद्यासाठी हे काही वेगळे पर्याय तुम्हीदेखील ट्राय करु न पाहा...
1) चॉकलेट शिरा
चॉकलेट हा फ्लेव्हर सा-याच्याच आवडीचा. बाप्पालाही हा फ्लेव्हर नक्की आवडणार यात शंका नाही. म्हणूनच एरवीच्या शि-याला थोडा वेगळा टच देऊन पाहता येईल. त्यासाठी नेहमी करतो तेच प्रमाण शि-यासाठी घ्यायचं. सव्वाशे ग्रॅम रवा-साखर घेत असाल तर त्यात एक चमचा कोको पावडर घातल्यास हाच शिरा चॉकलेट शिरा तयार होईल! एक काळजी अशी घ्यायची की शिरा दुधात संपूर्ण वाफवला गेल्यावरच कोको पावडर मिक्स करायची, ती आधीच घातली तर जास्त कडवट चव येण्याची शक्यता असते.
2) सुंदल
आपण बाप्पाला वाटली डाळ, हरभ-याची हिंगाच्या फोडणीतील कोरडी डाळ हा नैवेद्य नेहमीच दाखवतो. याच डाळीलाही वेगळी चव द्यायची असेल तर डाळीऐवजी अख्खे हरभरे, छोले वापरून कोरडी उसळ करता येईल. हिंग,कढीपत्त्याच्या फोडणीतील ही उसळदेखील गणपतीला नैवेद्य म्हणून ठेवता येईल. याचप्रमाणे अख्खे मूग वापरून पौष्टिकतेची जोडही देता येईल. अख्ख्या चवळीचीही अशीच कोरडी उसळ बनवता येते. या सर्व उसळींवर लिंबू, कोथिंबीर, खोबरे, बारीक शेव पसरवून ठेवल्यास चवीलाही बहार येते. आणखी एक स्वीट कॉर्न, हिरवे वाटाणे, राजमा हे आॅप्शनदेखील तुम्ही ट्राय करु शकता... उसळीच्या या चवीला दक्षिण भारतात सुंदल संबोधतात.
3) गोड शेंगोळे
थंडीच्या दिवसात कुळीथाच्या पिठाचे गरमागरम शेंगोळे आपण नेहमी खातो. मात्र शेंगोळे हे गोडदेखील बनवले जातात. हा गुजराथी बांधवांचा एक पारंपरिक पदार्थ आहे. बाप्पाला पौष्टिक नैवेद्य म्हणून आपण हे शेंगोळे ठेवू शकतो. थोडी रवाळ कणिक घेऊन त्यात तूपाचं मोहन, चवीला मीठ टाकून दूधात घट्ट भिजवून त्याचे मुटके तूपात मंद आचेवर तळून घेतल्यावर गुळाचा पाक करून त्यात घोळवून घेतले की झाले गोड शेंगोळे तयार! पाक चांगला मुरला की हे गोड शेंगोळे चवीला अप्रतिम लागतात. वरु न तुपाची धार सोडायला मात्र विसरायचं नाही...
4) राजस्थानी लाडू
लाडू, हा तर बाप्पाचा मोदकांइतकाच आवडीचा पदार्थ. म्हणून विविध चवीचे लाडू गणरायासाठी नेहमीच बनवके जातात. बेसन, नारळ, खजूर, खारीक, चॉकलेट या चवींचे लाडू बनविले जातात. राजस्थानी लाडू हा वेगळ्या चवीचा लाडू या गणेशोत्सवात बनवून पाहता येईल. बेसनात तूपाचं मोहन घालून घट्ट भिजवून पुºया लाटून तळून त्याचा चुरमा बनवला जातो. नंतर साखरेच्या दोन तारी पाकात हा चुरमा घालून मिश्रण आळून आलं की त्याचे लाडू बनवले जातात. चवीला खूप छान आणि खमंग लागतात. बदाम-पिस्त्याचे काप लावून सजवले की नैवेद्याचा एक छान पर्याय तयार होतो. बेसन वापरायचं नसेल तर बारीक रवा वापरला तरी चालतो. अधिक पौष्टिक बनवायचं असेल तर साखरेऐवजी गुळाचा पाक केला तरी हे लाडू छान लागतात.
5) लुचिर पायस
बंगाली बांधवांचा मिठाई आणि नैवेद्याचा हा पारंपरिक प्रकार आहे. दुर्गापूजा उत्सवात हा पदार्थ नेहमी नैवेद्य म्हणून ते तयार करतात. आपण गणरायांसाठी हा तयार करु शकतो. दूध आटवून त्यात सुका मेवा, असल्यास केशर घातलं जातं. नंतर मैद्यात तेलाचं मोहन, चवीला मीठ घालून कोमट पाण्यानं मऊ मळून घेतलं जातं. या मैद्याच्या गोळ्यातून छोट्या आकाराच्या पु-या लाटून गरम तूपात मंद आचेवर गुलाबीसर तळून घेतले जाते. गार झाल्या की दूधात या पुर्या घातल्या जातात. दुधात या पु-या भिजल्या की मग वरून गुलाब पाकळ्यांची सजावट केली जाते. दुूध आटवताना खवा घातला तर चवीला खूप सुंदर लागते. पु-या पातळ व अगदी लहान लाटल्या तरच हा पदार्थ छान लागतो.
हे झाले गणरायासाठी पहिल्या पाच दिवसांचे नैवेद्य. उरलेल्या पाच दिवसांचे नैवेद्य पुढच्या भेटीत.