केक करताना जर आधी तो बिघडण्याचीच भीती वाटत असेल तर या टिप्स वाचा आणि फॉलोही करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:23 PM2017-09-08T16:23:04+5:302017-09-08T16:30:25+5:30

You can make a spongy cake like bakery. Why not? Just follow these rules only. | केक करताना जर आधी तो बिघडण्याचीच भीती वाटत असेल तर या टिप्स वाचा आणि फॉलोही करा!

केक करताना जर आधी तो बिघडण्याचीच भीती वाटत असेल तर या टिप्स वाचा आणि फॉलोही करा!

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वकाही प्रमाणात घेऊनही केक स्पंजी होत नसेल, तो बाजारातील केकपेक्षा थोडा हार्डच राहात असेल तर निराश होवू नका. केक न करण्याची शपथही घेवू नका. त्यापेक्षा या टिप्स वाचून केक करणं जास्त फायदेशीर ठरेल.*केकची रेसिपी कधीही मनानं ,अंदाजानं करून पाहू म्हणून करु नका. त्यासाठी चांगल्या शेफची, चांगल्या सुगरणीची रेसिपी निवडा.* केक करताना केकचं साहित्य त्यासाठीच्या स्पेशल मेझरिंग कप किंवा चमच्यानेच मोजावं. त्यासाठी आपल्या घरातले वाटी, चमचे वापरू नये.


सारिका पूरकर - गुजराथी

स्पंजसारखा मऊ, लुसलुशीत केक घरी करायला घेतला की तो बाजारात मिळणा-या केकसारखा फुलत नाही, स्पंजी होत नाही, हा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल. पण तरीही केक बनवूून पाहण्याचे प्रयत्न आपण सोडत नाहीत. नाहीतर मग सरळ बेकिंग क्लास लावूनच केक ट्राय करण्याचा विचारही अनेकजणी करतात. शिवाय सर्वकाही प्रमाणात घेऊनही केक स्पंजी का होत नाही? का तो बाजारातील केकपेक्षा थोडा हार्डच बनतो? यावर अभ्यास सुरु असतो. पण या अभ्यासातून मिळत मात्र काही नाही. उलट केक करण्याचा उत्साह आणि आत्मविश्वास मात्र ढपतो. नकोच त्याच्या वाट्याला जायला असंही अनेकजणी ठरवतात.
पण केकच्या बाबतीत एवढं पराभूत होवून माघार घेण्याची अजिबात गरज नाही. काही महत्त्वाच्या टिप्स जर जशाच्या तशा फॉलो केल्या तर तुम्ही तयार केलेला केकही अगदी बाहेर मिळतो तसा स्पंजी आणि हलका होवू शकतो.

केक करताना..

 

1) चांगली रेसिपी निवडा

केक हा प्रामुख्यानं वाचून, पाहून किंवा ऐकूनच केला जातो. केकची रेसिपी कधीही मनानं ,अंदाजानं करून पाहू म्हणून करु नका. त्यासाठी चांगल्या शेफची, चांगल्या सुगरणीची रेसिपी निवडा. जेणेकरून केक बिघडण्याची शक्यता उद्भवणार नाही.

2) साहित्य प्रमाणातच घ्या .

प्रत्येक केकच्या रेसिपीत मैदा, साखर, बटर, बेकिंग पावडर यांचं प्रमाण दिलेलं असतं. काहीवेळेस ते ग्रॅममध्ये असतं तर काहीवेळा मेझरिंग कप किंवा चमच्यांच्या प्रमाणात असतं. अशावेळी हेच प्रमाण ट्राय करा, घरातील वाट्या, चमचे याचा अंदाज घेऊन साहित्य घेऊ नका. तुम्हाला वाटले तर तुम्ही बाजारातून नेमकं तेवढं साहित्य मोजूनही आणू शकता ( बेकिंग पावडर वगळता ). मैदा, साखर हे कोरडं साहित्य घेताना कप, चमचे शिगोशिग भरून न घेता, त्याची पातळी सपाट करून घ्यावी. जेणेकरून साहित्य हे कपापेक्षा, चमच्यापेक्षा जास्त होणार नाही. जर हे प्रमाण चुकलं तर केक कोरडा होतो. केकसाठी मैदा नेहमी स्टीलच्या चाळणीनं चाळूनच घ्यावा. यामुळे मैद्यात हवा भरली जाते. त्यामुळे केक हलका होण्यास मदत होते. मैदा चाळतानाच त्यात बेकिंग पावडर, सोडा घालून घ्या. बेकिंग पावडरही प्रमाणापेक्षा जास्त घालू नका, अन्यथा केकला कडवटपणा तर येईलच शिवाय तडेही जातील. मैदा वापरत असाल तर त्यात कॉर्नस्टार्चही घाला, यामुळे केक सॉफ्ट होईल. त्याकरिता एक कप मैदा असेल तर 2 चमचे कॉर्नस्टार्च घाला. तसेच हे सर्व साहित्य रूम टेंपरेचरच्या तापमनाएवढं असावं.

3) फेसण्याची प्रक्रिया महत्वाची.

केकसाठी बटर आणि साखर एकत्र फेसताना ते एकजीव होऊन क्रि मी होईपर्यंत फेसणं गरजेचं असतं. त्यासाठी साखर पूर्ण विरघळली पाहिजे. त्यासाठी तुम्ही पीठीसाखर देखील वापरु शकता. बटर आणि साखर क्रि मी होऊन हलके होईपर्यंत फेसले गेले पाहिजे.कमीत कमी 7 मिनिटापर्यंत तरी ही फेसण्याची प्रक्रि या व्हायला हवी. त्यानंतर पुढील साहित्य घालून पुन्हा फेसायचं असतं. जर केकमध्ये अंडी घालणार असाल तर अंडी देखील बलक आणि एग व्हाईट असे स्वतंत्रिरत्या दहा मिनिटांपर्यंत फेसून हलके करु न घेतल्यास केक हलका होतो. फेसलेली अंडी, साखर-बटरच्या मिश्रणात मैदा एकदम घालून फेसल्यास हवा नीट आत शिरत नाही, त्याकरिता हळूहळू मैदा घालून चांगले फेसले तरच केक हलका होण्यास मदत होते. सर्व साहित्य एकत्र केल्यावर साधारण 10 मिनिटं तरी फेसायला हवे. याकरिता तुम्ही इलेक्ट्रिक उपकरणं देखील वापरु शकता.

 

4) कट अ‍ॅण्ड फोल्ड

साहित्य फेसल्यानंतरची ही प्रक्रि या अत्यंत हलक्या हातानं करायची असते. चमचा एकदा आडवा आणि एकदा उभा असा फिरवून मिश्रण एकजीव केलं जातं. ही प्रक्रिया करताना हाताचा जोर चमच्यावर पडू देवू नये.

5) ओवनचे योग्य तपमान

वरील सर्व नियम काटेकोर पाळूनही अनेकदा केक कोरडा होतो. याचं कारण म्हणजे ओवनचं तपमान. केकसाठी ओवन फार तापवायचं नसतं. तसेच बेक करतानाही कमी तपमानावरच बेक करायचा असतो. नाहीतर मग तो कोरडा होतो तसेच त्याचे तुकडेही नीट होत नाहीत. बरेचदा केक आतल्या बाजूूनं खोलगट होऊन दाबल्यासारखा दिसतो. याचेही कारण म्हणजे ओवनचं तपमान नीट सेट केलेलं नसतं जर ओवन गरजेपेक्षा कमी तापवून केक बेक होण्यासाठी ठेवला गेला असेल तर केक संपूर्ण वर फुलून न येता असा खोलगट दिसतो. याकरिताच ओवनचं तपमान नीट सेट करावं. तसेच केक बेक करायला ठेवल्यानंतर ओवन सारखा उघडू नये.

6) पॅन योग्य रितीने फील करा

केकचं बॅटर तयार करण्यापूर्वीच ज्या टीनमध्ये तो बेक करणार आहात त्याच्या आतील बाजूंवर बटरचा कोट लावून घ्या. तसेच त्यावर थोडा मैदा भुरभरु न ठेवा, जेणेकरु न केक बेक झाल्यावर भांड्यातून सहज काढता येईल. सध्या बाजारात सिलिकॉन साचेही मिळतात, त्याचाही वापर करु शकता. तसेच बॅटर या टीनमध्ये निम्मे किंवा 2/3 इतकं भरावं. यापेक्षा जास्त बॅटर टीनमध्ये घालू नका, अन्यथा केक फुलायला जागा राहणार नाही. केक बेक झाल्यावर तो पूर्णपणे थंड होऊ द्यावा. नंतर भाड्यांच्या आतील कडांवर हलक्या हातानं सुरी फिरवून केक अलगद मोकळा करावा. भांड्यावर प्लेट पालथी घाला आणि भांड्यासह उलटे करु न केक प्लेटमध्ये काढून घ्या.

7) पौष्टिकतेची जोड

केकमधील कॅलरी, फॅट्स कमी करायचे असतील तर त्याऐवजी तुम्ही दही, खाद्यतेलही वापरु शकता. तसेच सध्या गव्हाची कणिक, गाजर, केळी तसेच अन्य फळं वापरूनही केक तयार होऊ लागले आहेत. ते देखील ट्राय करायला हरकत नाही.
या महत्वाच्या टिप्स फॉलो केल्यावर केक स्पंजी होईलच, यासोबतच केकच्या मिश्रणात स्वाद नसलेले जिलेटीन घातले तर केकला तडे जात नाहीत. तसेच साखर आणि बटर एकत्र फेसताना त्यात थोडा लिंबाचा रस घातल्यास केक हलका होतो यागोष्टीही लक्षात असू द्या.

Web Title: You can make a spongy cake like bakery. Why not? Just follow these rules only.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.