नवरात्रीच्या उपवासासाठी 'या' रेसिपी नक्की ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 12:10 PM2018-10-09T12:10:20+5:302018-10-09T12:10:39+5:30
नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात होणार असून त्याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात होणार आहे. मानाच्या शुद्धीकरणासाठी आणि देवीची उर्जा प्राप्त करण्यासाठी अनेकजण 9 दिवस देवीची उपासना, आराधना करतात.
नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात होणार असून त्याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात होणार आहे. मानाच्या शुद्धीकरणासाठी आणि देवीची उर्जा प्राप्त करण्यासाठी अनेकजण 9 दिवस देवीची उपासना, आराधना करतात. अनेक जणांचा निर्जळी उपवास असतो तर अनेक जण उपवासाचे पदार्थ खाऊन नऊ दिवसांचा उपवास करतात. प्रत्येकाचे नवरात्रीच्या उपवासांचे नियम वेगळे असतात. पोटाला आराम देण्यासाठी आणि शरीराला पोषण देण्यासाठी नवरात्रीचे उपवास केले जातात. प्रामुख्याने साबुदाण्याचे तांदूळ, वरीचे तांदूळ, शेंगदाणे, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ, सैंधव मीठ यांसारख्या पदार्थांचे सेवन केले जाते. तुम्हीही उपवास करणार असाल तर तुमच्यासाठी काही खास उपवासाच्या पदार्थांच्या पाककृती आम्ही सांगणार आहोत.
1. साबुदाण्याची इडली
साहित्य :
- 200 ग्रॅम साबुदाणा
- 200 ग्रॅम दही
- 250 ग्रॅम वरईचे तांदूळ
- बेकिंग सोडा
- चवीनुसार मीठ
- अर्धा चमचा जिरे
कृती :
साबुदाणा आणि वरईचे मिक्सरमध्ये वेगवेगळे आणि बारीक वाटून घ्या. हे मिश्रण एकत्र करून त्यात दही, मीठ, जिरे आणि गरजेनुसार पाणी टाकून भिजवावे. हे मिश्रण एक तास झाकून ठेवावे. इडलीपात्राला तूप किंवा तेल लावावे. गरजेनुसार पातेल्यात झाकलेले मिश्रण काढून त्यात पाव टी स्पून चमचा बेकिंग सोडा टाकून एकजीव करा. ते मिश्रण इडली पात्रात घेऊन नेहमीप्रमाणे इडली वाफवून घ्या. हलकी, चवदार इडली तयार.
चटणी :
ओला नारळाचा चव किंवा ते नसल्यास सुक्या खोबऱ्याचा किस, त्यात मिरची, मीठ, चवीपुरती साखर आणि अर्ध लिंबू पिळून मिक्सरमध्ये दाटसर होईल असे फिरवा. तुपात किंवा तेलात अर्धा चमचा जिरे टाकून ती फोडणी चटणीवर टाकून इडलीसोबत खायला घ्या.
2. झणझणीत उपवासाची मिसळ
साहित्य :
- साबुदाण्याची खिचडी
- बटाट्याचे उकडलेले काप, भाजी, किस किंवा खिचडीत बटाटे असतील यापैकी काहीही नाही घेतलं तरी चालेल.
- दही
- मिरची, जिरं आणि मिठाचा मिक्सरमध्ये फिरवलेला ठेचा आवडीनुसार
- बटाट्याची शेव किंवा वेफर्स आवडीनुसार
- साबुदाणा तळून केलेला नायलॉन चिवडा
- खारे किंवा तेलात तळलेले शेंगदाणे
- बारीक चिरलेली काकडी
- शेंगदाण्याची आमटी
- मीठ
- साखर
- लिंबू
- आवडत असल्यास डाळिंबाचे दाणे
शेंगदाणा आमटी कृती :
भाजलेले शेंगदाणे, दोन हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्या. कढईत तेल किंवा तूप घालून त्यात जिरे तडतडवून घ्या. त्यात शेंगदाण्याचे वाटण, मीठ आणि चवीपुरती साखर घाला. जराशी आंबट चव आवडत असेल तर दोन-तीन आमसूल टाका आणि आमटी उकळल्यावर गॅस बंद करा.
मिसळ कृती :
एका खोलगट डिशमध्ये खिचडी, बटाट्याचे तुकडे टाका. आवडत असेल तर वरईचा भातही तुम्ही यात टाकू शकता.त्यावर चमचाभर नायलॉन साबुदाणा चिवडा, थोडीशी बटाट्याची शेव, कुस्करलेले वेफर्स, चमचाभर दही घाला. त्यावर मिरचीचा ठेचा,चिरलेली काकडी खारे किंवा तळलेले शेंगदाणे आवडीनुसार घाला. हवं असल्यास लिंबू पिळा. या मिसळीसोबत गरमागरम आमटी द्या. मिसळ एकजीव करण्यासाठी आवडीनुसार त्यात आमटी घेता येते. आवडत असल्यास त्यात डाळिंबाचे दाणेही घालता येतील.
3. उपवासाचा खमंग ढोकळा
साहित्य :
- वरईचे पीठ दीड वाटी
- अर्धा कप पाणी
- 3 ते 4 हिरव्या मिरच्या
- बारिक चिरलेली कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- चिमुटभर खाण्याचा सोडा
- आल्याचा किस (एक टी स्पून)
- जिरेपूड (अर्धा टी स्पून)
- आंबूस ताक दोन चमचे
- पाव चमचा लिंबाचा रस
कृती :
पीठ चाळणीने चाळून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ, आल्याचा किस, जिरेपूड, वाटलेली मिरची, ताक आणि पाणी घाला. मिश्रण एकजीव करून झाकून ठेवा. अर्धा ते पाऊण तासाने लिंबाच्या रसात सोडा कालवा आणि एकत्र केलेल्या मिश्रणात घालून एकत्र करून घ्या. प्रेशर कुरच्या भांड्याला आतून तुप लावून घ्या. त्यामध्ये तयार मिश्रण ओतून कुकरमध्ये ठेवा. कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून ठेवा. 15 ते 20 मिनिटांत ढोकळा तयार होईल. थोडा थंड झाल्यावर वड्या पाडून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
4. शिंगाड्याच्या पिठाचा हलवा
साहीत्य :
- शिंगाडा पीठ 1 वाटी
- साखर 1 वाटी
- तूप मोठे 4 चमचे ( टेस्पून)
- वेलचीपूड अर्धा टीस्पून
- ड्रायफ्रूट्स
- पाणी
कृती :
प्रथम पॅन/कढई मधे तूप घाला. गरम झाले की, त्यामधे शिंगाडा पीठ घाला.बेसन लाडूचे बेसन जसे भाजतो तसे पीठ सतत हलवत राहून खमंग भाजून घ्या. आता साखरेत अर्धा ते पाऊण वाटी कोमट पाणी घालून साखर पाण्यात विरघळवून घ्या व हे पाणी भाजलेल्या पीठात, गुठळी होणार नाही याची खबरदारी घेऊन कलथ्याने पीठ हलवत त्यात घाला. हलवत रहा. पाच मिनिटात हे मिश्रण घट्ट होत येईल व कडेने तूप सुटू लागेल. गॅस बंद करा व वेलचीपूड , ड्रायफ्रूट्स घालून खाली उतरवा. हा हलवा साधारण सैलच असतो. गरम लुसलूशित असा हलवा खाण्यास अतिशय उत्कृष्ठ लागतो. मुख्य म्हणजे उपवासालाही चालतो.