वर्ल्डकपसाठी रशियात १० हजार भारतीय चाहते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:59 AM2018-06-15T06:59:20+5:302018-06-15T06:59:20+5:30

 रशियात होत असलेल्या या फुटबॉल वर्ल्डकपसाठी तब्बल १० हजार भारतीय चाहते दाखल झाले आहेत. काही मराठी, काही उत्तर भारतीय तर काही दक्षिण भारतीयही येथे वर्ल्डकपचा थरार याची देही याची डोळा पाहणार आहेत.

10 thousand Indian fans in Russia for the World Cup | वर्ल्डकपसाठी रशियात १० हजार भारतीय चाहते

वर्ल्डकपसाठी रशियात १० हजार भारतीय चाहते

Next

विशेष प्रतिनिधी
मॉस्को -  रशियात होत असलेल्या या फुटबॉल वर्ल्डकपसाठी तब्बल १० हजार भारतीय चाहते दाखल झाले आहेत. काही मराठी, काही उत्तर भारतीय तर काही दक्षिण भारतीयही येथे वर्ल्डकपचा थरार याची देही याची डोळा पाहणार आहेत.
डोळ्याची पापणी लवेपर्यंत अचानक होणारा गोल, वाऱ्याच्या वेगानं होणारी चपळाई, नृत्यकाराला लाजवेल असे फुटबॉलच्या भोवती थुईथुई फिरणारे पाय, त्याचवेळी ताकद अन् टॅक्टिक्सच्या बळावर प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची जिद्द अशा साºयांचा संगम असलेल्या फुटबॉल महाकुंभमेळ्याचा रशियात गुरुवारी बिगुल वाजला.
लुझनिकी स्टेडियमवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमिर पुतीन यांनी उद्घाटन केल्यानंतर रशिया विरुद्ध सौदी अरेबिया यांच्यातील पहिल्या सामन्याने स्पर्धेचा श्रीगणेशा झाला. आता पुढील एक महिना ३२ संघ २१वा फिफा वर्ल्डकप जिंकण्यासाठी जिवाचे रान करणार आहेत.

आम्ही किमान खेळतोय, तुम्हा भारतीयांचे काय?
सौदी अरेबियाच्या चाहत्याला मी विचारले, तुम्हाला कसे वाटतेय? तो म्हणाला, फिफाच्या मैदानात खेळायला मिळतेय, याचे आम्हाला समाधान आहे. पहिला सामना हरलो. हरकत नाही. किमान आम्ही खेळतोय तरी. भारतीयांचे काय? उत्तर ऐकून मी स्तब्ध झालो.
यूपीएल हा एकमेव भारतीय समूह होता ज्यांच्यासाठी खास स्टेडियममध्ये बॉक्स होता आणि त्यात २५ खास चाहतेही होते. हिरोहोंडाचे मुंजालही तीनशे चाहत्यांसोबत उपस्थित होते.

70 हजार प्रेक्षकांनी पहिला सामना याची देही याची डोळा पाहिला.
फुटबॉलचा हा थरार पाहण्यासाठी मेक्सिकोमधून तब्बल दीड लाख चाहते रशियात दाखल झाले आहेत.
13,525 रुपये किमतीचा (२०० डॉलर) फुटबॉल प्रत्येक गेमसाठी वापरला जाणार. हा फुटबॉल यूपीएल कंपनीने तयार केला असून, तो अतिशय कडक आहे. तो फुटबॉल आम्हाला खेळाआधी हाताळता आला, हे विशेष.

पुतीन यांचा एकही फोटो नाही!
एकहाती देश चालवणारे राष्ट्राध्यक्ष ब्लादमिर पुतीन यांचा फुटबॉल फिवरदरम्यान साधा एक फोटोही कुठे दिसून आला नाही. कुठेही त्यांच्या फोटोचे बॅनर आढळले नाही. स्वत:ला महत्त्व न देता पुतीन यांनी फुटबॉल या खेळाला आणि फुटबाल चाहत्यांना अधिकाधिक महत्त्व दिल्याचे जागोजागी दिसून येत होते. उद्घाटनानंतर पुतीन जिथे सामना पाहण्यास बसले होते, त्याच्याशेजारीच आमचा बॉक्स होता. त्यामुळे त्यांच्या चेहºयावरील हावभाव पाहता येत होते.

रशियन शिकले इंग्लिश : फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी येणाºया पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी रशियन लोकही इंग्लिश शिकले आहेत. स्थानिकांनी गेले काही महिने खास यासाठी प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले. ते आमच्याशी अस्खलित इंग्रजी बोलत होते.

Web Title: 10 thousand Indian fans in Russia for the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.