FIFA World Cup 2018 : फिफाच्या कुंभमेळ्यासाठी 10 हजार भारतीय मॉस्कोत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 08:02 PM2018-06-14T20:02:16+5:302018-06-14T20:53:59+5:30
फिफाच्या महाकुंभासाठी रशिया पूर्णपणे सज्ज
मॉस्को: फिफा वर्ल्ड कप 2018 कोण जिंकणार, याचं उत्तर बरोब्बर एका महिन्यानंतर मिळणार आहे. मात्र त्याआधी पुढील महिनाभर जगभरातील शेकडो देशांमधील कोट्यवधी फुटबॉल चाहत्यांना सर्वोत्तम खेळाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. फिफाच्या झळाळत्या चषकासाठी 32 संघ आमनेसामने उभे ठाकणार असून विजेतेपदासाठी प्रत्येक संघ कडवा संघर्ष करताना पाहायला मिळेल. फुटबॉलच्या या महाकुंभासाठी रशिया सज्ज झाला आहे. फुटबॉलचा हा महाकुंभ याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी तब्बल 10 हजार भारतीय मॉस्कोत दाखल झाले आहेत.
यजमान रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सामन्यानं यंदाच्या फिफा वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. हा फुटबॉल वर्ल्ड कप कोण पटकावणार, याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 2026 चा वर्ल्ड कप मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडामध्ये होणार असल्याची घोषणा कालच झाली. त्यामुळे मेक्सिकोतील फुटबॉलप्रेमींना अतिशय आनंद झाला आहे. फुटबॉल वर्ल्ड कप पाहण्यासाठी मेक्सिकोतील तब्बल दीड लाख फुटबॉल चाहते मॉस्कोत दाखल झाले आहेत.
फुटबॉल वर्ल्ड कपसाठी रशिया पूर्णपणे सज्ज झाला असून मॉस्कोतील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रशियात पहिल्यांदाच वर्ल्ड कप होत आहे. मात्र तरीही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा एकही फोटो किंवा बॅनर मॉस्कोमध्ये लावण्यात आलेला नाही. या वर्ल्ड कपसाठी रशियन लोक उत्तम इंग्रजी भाषा शिकले आहेत. फिफा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून ही संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.