Football: भारतापुढे कुवेतचे अवघड आव्हान, अखेरच्या साखळी लढतीत खरी परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 06:16 AM2023-06-27T06:16:51+5:302023-06-27T06:17:29+5:30
Football: अखेरच्या साखळी सामन्याआधीच सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताला मंगळवारी कुवेतच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
बंगळुरू : अखेरच्या साखळी सामन्याआधीच सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताला मंगळवारी कुवेतच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. भारताप्रमाणेच कुवेतनेही दोन विजयांसह उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.
या सामन्यातील विजेता अ गटातील अव्वल स्थान पटकावेल. त्याचवेळी, दिवसातील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ असा रंगेल. दोन्ही संघ दोन पराभवांसह उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने हा सामना औपचारिकतेचा ठरेल. तरीही, स्पर्धेतील अखेरचा सामना जिंकून विजयी निरोप घेण्यासाठी दोन्ही संघ पूर्ण ताकदीने खेळतील. भारताने सलामीला पाकिस्तानला ४-० असे नमवल्यानंतर नेपाळला २-० असे नमवले होते. गेल्या आठ सामन्यांत भारताविरुद्ध एकाही गोलची नोंद झालेली नसून कुवेतला भारतीय बचाव फळी भेदण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, याची जाणीव आहे.
तरीही, कुवेतचा आक्रमक खेळ पाहता त्यांच्याविरुद्ध भारताला आपला स्तर उंचवावा लागेल. मध्यरक्षक आणि आघाडीची फळी यांना योग्य ताळमेळ राखून खेळावे लागेल. भारतीय संघ अजूनही गोल करण्याबाबत सुनील छेत्रीवर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध शानदार हॅटट्रिक केल्यानंतर नेपाळविरुद्धही पहिला गोल केला होता.
कुवेतचे पारडे जड
भारताविरुद्ध कुवेतचे पारडे वरचढ आहे. कुवेतने आतापर्यंत भारताविरुद्ध दोन सामने जिंकले असून भारताने कुवेतला एकदा नमवले आहे. कुवेतने या स्पर्धेत नेपाळला ३-१ असे नमवल्यानंतर पाकिस्तानला ४-० असे नमवले होते. उपांत्य सामन्याआधी मानसिकरीत्या मजबूत होण्यासाठी दोन्ही संघ विजयाच्या निर्धारानेच मैदानात उतरतील. भारत-कुवेत २०१० सालानंतर पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळतील.