खेळाडूंना कवडी अन् ज्योतिषांना 16 लाख; भारतीय संघाच्या उज्वल वाटचालीसाठी संघटनेचा अजब घाट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:50 PM2022-06-22T12:50:13+5:302022-06-22T12:50:45+5:30
युवा खेळाडूंसाठी लीग घेण्यात असमर्थ ठरणाऱ्या AIFF कडून पैशांचा असा दुरूपयोग चुकीचा आहे, अशी टीका होतेय.
भारतीयफुटबॉल संघाने AFC Asian Cup 2023 स्पर्धेची पात्रता निश्चित केली. पण, पुढील वाटचालीसाठी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याऐवजी भारतीय फुटबॉल महासंघाने ( All India Football Federation ) चक्क ज्योतिषांची नेमणूक केली आणि त्यासाठी 16 लाख रुपये मोजल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी योग्य प्रयत्न करण्याबदल्यात AIFF कडून भारतीय संघाला मदत मिळावी यासाठी ज्योतिष कंपनी निवडण्यात आली.
होय हे खरं आहे... भारतीय संघाला प्रेरणा देण्यासाठी AIFF ने ज्योतिषांची नियुक्ती केली आहे. आशिया चषक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळत रहावी यासाठी मोटीव्हेटर नियुक्त केले होते. पण, नंतर कळालं की ती एक ज्योतिष कंपनी आहे. त्यासाठी 16 लाख रुपयांचं पेयमेंट करण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत AIFFचे सरचिटणनीस सुनांदो दास यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
भारताचा माजी गोलरक्षक तनुमोय बोस याने जोरदार टीका केली. युवा खेळाडूंसाठी लीग घेण्यात असमर्थ ठरणाऱ्या AIFF कडून पैशांचा असा दुरूपयोग चुकीचा आहे. हा प्रकार भारतीय फुटबॉलची प्रतिमा मलिन करणारा आहे, असे तनुमोयने सांगतिले. भारतीय संघाने हाँगकाँगवर 4-0 असा विजय मिळवून AFC Asian Cup 2023 ची पात्रता निश्चित केली. ड गटात भारताने अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय संघ प्रथमच सलग दुसऱ्यांदा आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. याआधी भारतीय संघ 1964, 1984, 2011, 2019 मध्ये पात्र ठरला होता.