एएफसी फुटबॉल पात्रता फेरी : भारतीय संघ विजयी लय राखणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:45 AM2017-11-14T00:45:52+5:302017-11-14T00:46:13+5:30
गेल्या १२ आंतरराष्ट्रीय सामन्यात अपराजित कामगिरी करणारा भारतीय फुटबॉल संघ उद्या म्यानमारविरुद्धच्या सामन्यातही विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
मडगाव : गेल्या १२ आंतरराष्ट्रीय सामन्यात अपराजित कामगिरी करणारा भारतीय फुटबॉल संघ उद्या म्यानमारविरुद्धच्या सामन्यातही विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. २०१९ मध्ये होणाºया एएफसी फुटबॉल चषक पात्रता फेरीतील हा सामना गोव्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात येईल. सामन्यापूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आपला इरादा स्पष्ट केला.
‘अ’ गटात भारतीय संघ १२ गुणांसह आघाडीवर आहे. किर्गिस्तान आणि म्यानमार या दोन्ही संघांचे प्रत्येकी ४ गुणआहेत. त्यामुळे म्यानमार संघासाठी उद्याचा सामना महत्त्वाचा असेल. म्यानमारला त्यांच्या घरच्या मैदानावर भारतीय संघाने एकमेव गोलने पराभूत केले होते. त्याचा वचपा काढण्याचाही म्यानमार प्रयत्न करेल. दुसरीकडे, भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले असून, हा संघ लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टिफन कोईन्स्टाईन म्हणाले की, म्यानमारवर आम्ही विजय मिळवलेला आहे. हा संघ तांत्रिकरित्या चांगला आहे. त्यांच्या कमकुवत बाजूंचाही आम्ही अभ्यास केला आहे. आम्ही जबाबदारीने खेळ केला तर विजय मिळवणे सोपे होईल. सुनील छेत्री यानेही संघ विजयासाठी संघ असल्याचा विश्वास व्यक्त केला.
म्यानमारचे प्रशिक्षक गेर्ड जेईसे म्हणाले की, भारताविरुद्धचा उद्याचा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आम्ही तीन दिवस अगोदर भारतात आलो आहोत. गेल्या सामन्यात आघाडीपटूंनी काही संधी गमावल्या होत्या. त्यामुळे आम्ही पराभूत झालो होतो. उद्याच्या सामन्यात सुधारणा होतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय संघाची बचावफळी भक्कम असली तरी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
म्यानमारची एआयएफएफकडे तक्रार
म्यानमार संघ गोव्यात ज्या हॉटेलमध्ये मुक्कामास आहे, त्या हॉटेलच्या सुविधेबद्दल म्यानमार संघाने नाराजी व्यक्त केली आहे. हा संघ तीन दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झाला होता. सूत्रांनुसार, म्यानमारच्या व्यवस्थापनाने अखिल भारतीयफुटबॉल महासंघाकडे तशी तक्रारही केली आहे.
संघ असे : भारत- सुनील छेत्री (कर्णधार), गुरुप्रितसिंग संधू (गोलरक्षक), प्रीतम कोठल, संतोष जिंघम, अनस एदाथोडीका, नारायण दास, जॅकी चंद, यूजीनसन लिंगदोह, रॉल्वीन बॉर्जिस, रॉबिन सिंग, जेजे लालपेखुला.