अर्जेंटिनाच्या अपेक्षांचे सर्व ओझे मेस्सीवरच!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 06:09 AM2022-12-17T06:09:08+5:302022-12-17T06:09:30+5:30
लुसैल स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात फ्रान्सला नमवून विश्वविजेतेपदाचा मान मिळविण्याचे त्याचे स्वप्न आहे.
दोहा : स्वत:चा दुसरा आणि अखेरचा विश्वचषक खेळत असलेल्या लियोनेल मेस्सीवर अर्जेंटिनाच्या अपेक्षांचे संपूर्ण ओझे आहे. आठ वर्षांआधी तो जेतेपदाच्या लढतीत चुकला असेलही मात्र, ती चूक तो पुन्हा करू इच्छित नाही. त्याच्या संघाने तीन दशकांहून अधिक काळापासून विश्वचषक जिंकलेला नाही.
लुसैल स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात फ्रान्सला नमवून विश्वविजेतेपदाचा मान मिळविण्याचे त्याचे स्वप्न आहे. आपल्या सोनेरी कारकिर्दीत मेस्सीने विश्वचषक वगळता सर्व काही हस्तगत केले. यासोबतच आणखी एक महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो यालादेखील तो मागे टाकणार आहे. ३७ वर्षांच्या रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होताच रोनाल्डोचे जेतेपदाचे स्वप्न भंगले होते.
अर्जेंटिनाचे कोच लियोनेल स्कालोनी म्हणाले, ‘मी मेस्सीला खेळताना पाहतो तेव्हा मनात वेगळे भाव येतात. त्याच्यात असे काहीतरी विशेष आहे की केवळ अर्जेंटिना नव्हे तर जगातील चाहते त्याला पसंत करतात. तो आमच्या संघात आहे, हे आमचे भाग्यच!’
अर्जेंटिना म्हटले की, दिएगो मॅरेडोनानंतर मेस्सीचेच नाव ओठांवर येते. विश्वचषक जिंकताच मेस्सी मॅरेडोनाच्या पंक्तीत बसेल. मॅरेडोनाने १९८६ ला मेक्सिकोला जेतेपद मिळवून दिले होते. आपल्याकडे अखेरची संधी असून ती वाया जाऊ द्यायची नाही, याची मेस्सीला जाणीव आहे, यंदा फ्रान्सच्या काइलियन एमबाप्पेच्या बरोबरीने त्याचे पाच गोल आहेत. याशिवाय अनेक गोल नोंदवून देण्यात त्याने सूत्रधाराची भूमिकाही बजावली.
सरावातील अनुपस्थितीने चर्चेला उधाण
अंतिम सामना हा काही तासांवर येऊन ठेपला आहे. क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला स्नायूदुखीचा त्रास झाला. अर्जेंटिनाचा हा सुपरस्टार गुरुवारी प्रशिक्षणासाठी मैदानावरही उतरला नाही. आता तो अंतिम सामन्यातही दिसणार नाही का? अशी भीती चाहत्यांना वाटू लागली आहे. त्याच्याशिवाय इतर अनेक प्रमुख खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. फूट मर्काटो वेबसाइटनुसार, मेस्सीला पायाच्या स्नायूंमध्ये समस्या येत आहेत. मेस्सीच्या पायाचे स्नायू सुजले होते. यामुळे तो या सरावावेळी अनुपस्थित होता.
मात्र, पीएसजीने एक निवेदन जारी करून मेस्सीची दुखापत गंभीर नसल्याचे म्हटले आहे. दुखापत आणखी गंभीर रूप धारण करू नये यासाठी मेस्सी सध्या उपचार घेत असून लवकरच सराव सुरू करेल, अशी माहिती समोर येत आहे. मेस्सीच्या आधी डी मारिया आणि डिबेला हेदेखील दुखापतग्रस्त झाले. संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे तिघेही अंतिम सामन्यात मैदानात उतरतील.