'तू कुठेही जा, आम्ही तुला फॉलो करणारच'... रोनाल्डोच्या चाहत्याचं पत्र
By स्वदेश घाणेकर | Published: July 11, 2018 06:58 PM2018-07-11T18:58:56+5:302018-07-11T18:59:59+5:30
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या या क्लबमध्ये पोर्तुगालचा तू आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटत होतास तेव्हापासून ते अगदी रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील उरुग्वेविरुध्दच्या अखेरच्या लढतीपर्यंत तुला फॉलो करत आलोय...
दिवसभर पावसाचा धुमाकूळ सुरू असताना संध्याकाळी एक बातमी विजेच्या वेगाने आली आणि मनात कडकडाट झाला. ख्रिस्तीयानो रोनाल्डो इटालियन क्लब युव्हेन्टसकडून खेळणार. रेयाल माद्रिद शिवाय रोनाल्डो आणि रोनाल्डो शिवाय माद्रिद याची कल्पना करूच शकत नाही. गेली नऊ वर्षे तुला रेयाल माद्रिदच्या जर्सीत खेळताना पाहत आलो आहे. २००३ साली सर ॲलेक्स फर्गुसन यांचा हात पकडून जेव्हा तू मॅंचेस्टर युनायटेड क्लबच्या स्टेडियमवर दाखल झालास तेव्हापासून तुझी चर्चा होती. इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या या क्लबमध्ये पोर्तुगालचा तू आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटत होतास तेव्हापासून ते अगदी रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील उरुग्वेविरुध्दच्या अखेरच्या लढतीपर्यंत तुला फॉलो करत आलोय...
खरं सांगायचं तर मॅंचेस्टर युनायटेड मध्ये मातब्बर खेळाडूंत तू स्वत:ला का झाकोळतोस?? हा प्रश्न सतावत होता. पण तुझ्यावर , तुझ्या खेळावर प्रचंड विश्वास होता आणि त्याला तू तडा जाऊ दिला नाहीस. तू आपलं नाणं खणखणीत वाजवलंस. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये उगवता तारा म्हणून तुझी ओळख झाली. या क्लबला अनेक निर्णायक विजय मिळवून देताना तुझा तो आनंद माझ्यासारख्या लाखो चाहत्यांसाठी बहुमोलाचा होता.
२००९ मध्ये तू रेयाल माद्रिद क्लबमध्ये दाखल झालास, त्यावेळी खऱ्या अर्थाने तुझे पर्व सुरू झाले. तू कुचका आहेस, गर्विष्ठ आहेस, तू स्वार्थी आणि स्वत:साठी खेळतोस असे टीकाकार सतत तुझ्या नावाने ओरडायचे. पण तू तोच ॲटिट्यूड कायम राखत विक्रमांचे एव्हरेस्ट उभे केलेस आणि टीका करणाऱ्यांची बोलती बंद केलीस. हाच ॲटिट्यूड कदाचित तुझ्याकडे अधिक आकर्षित करत होता. जगावे तर असे, कोण साथ देईल की नाही याचा फार विचार न करता एकट्याच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटण्याची तुझी कला अनेकदा अनुभवली. लिओनेल मेस्सी की रोनाल्डो? या वादात तू नेहमी अग्रेसर राहिलास. माद्रिद आणि तुझे नाते असे तुटेल याची कल्पना केली नव्हती. स्पॅनिश लीगचा टीआरपी मेस्सी आणि तुझ्यामुळे वाढला. बार्सिलोना आणि माद्रिद ही एल क्लासिको लढत पाहण्यासाठी, नव्हे नव्हे खरं तर रोनाल्डो वि. मेस्सी हीच लढत पाहण्यासाठी रात्री जागवल्या आहेत. आता ती एल क्लासिको नाही आणि तो क्लास नाही. चॅम्पियन्स लीगचे विक्रमी जेतेपद, सर्वाधिक गोल, हॅटट्रिक, अन्य जेतेपदं अशी अनेक विक्रम तू माद्रिदसोबत साजरी केलीस आणि दुरूनच का होईना, तुझ्या या प्रत्येक आनंदात सहभागी झालो. किंबहुना तुझा प्रभावच होता की आपणहून त्यात मी ओढलो जायचो. अगदी आताचीच गोष्ट. विश्वचषकातील पहिल्या लढतीत स्पेनविरुद्ध तुझा संघ २-३ अशा पिछाडीवर होता आणि माझ्या मनात धाकधुक वाढलेली. हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा जलद गतीने धडधडत होते.. अखेरच्या मिनिटाला मिळालेल्या त्या फ्री किकवर केलेल्या गोलने मनातील घालमेल घालवली. आयुष्यातील असे अनेक अविस्मरणीय क्षण तू अनुभवायला लावलेस...
विश्वचषक स्पर्धेतील एक्झिटनंतर तू निवृत्ती घेशील या चर्चेने मन कासावीस झाले.. राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर मी क्रिकेटपासून दुरावलो आणि आता तू पण नसशील तर मग फुटबॉल कोणासाठी बघू?, असं झालं होतं. पण तू तसं केलं नाहीस. निदान पुढील विश्वचषक खेळशील अशी आशा आहे. पण तू माद्रिदला सोडचिठ्ठी दिलीस याने मात्र प्रचंड निराश झालो. पुन्हा एकदा सांगू इच्छितो रोनाल्डोशिवाय माद्रिद ही गोष्ट पचवणे कठीण आहे. २००९ ते २०१८ हा तुझ्यासाठी केवळ एक प्रवास असेल पण माझ्यासह अनेकांसाठी तो एक आयुष्याचा भाग आहे. अनेक चढउतार या क्लबने आणि तू पाहिलेस, त्या प्रत्येक गोष्टीचा मी भाग होतो. तुझ्यासाठी मित्रांशी केलेली भांडणं, प्रसंगी त्यांच्याशी अबोलाही धरला. काल मात्र तुझ्या निर्णयाने मला सुन्न केले. रेयाल माद्रिद सोडल्याची बातमी करताना मनात प्रचंड भावना दाटून आलेल्या, पण त्या बाजूला सारून, 'रोनाल्डोची माद्रिदला सोडचिठ्ठी' दिली हा मथळा टाईप केला.. आतून प्रचंड वेदना होत होत्या पण तुझा हा निर्णय मान्य करण्याखेरीज माझ्यासाठी तू कोणताच पर्याय ठेवला नाहीस.
आता टीकाकार पुन्हा सुरू होती. पैशासाठी रोनाल्डोने माद्रिद सोडले म्हणतील. पण व्यावसायिक खेळाडू म्हणून यात वावगे काहीच नाही. तुझ्या ( ३३ वर्ष) वयाचा विचार करता, पुढील युरो स्पर्धेत पोर्तुगालकडून खेळण्याच्या दृष्टीने तुझा हा निर्णय योग्यच आहे. माद्रिदच्या वर्षाला होणाऱ्या सामन्यांची संख्या पाहता त्या प्रत्येक लढतीत खेळणे तुझ्यासाठी शक्य नव्हते. याउलट युव्हेन्टसकडून तुला कमी सामने खेळावे लागतील आणि तंदुरुस्तीही कायम राखता येईल. हा विचार करून तू हा निर्णय घेतला आहेस. पुढील चार वर्षं तू युव्हेन्टसच्या जर्सीत दिसशील. त्यामुळे आता स्पॅनिश लीग सोडून इटालियन लीग फॉलो करायला सुरुवात केली पाहिजे. या निर्णयाने निदान पुढील चार वर्ष तू निवृत्ती घेत नाहीस याची खात्री पटली. क्लब बदललास तरी तू माझा फेव्हरेटच राहणार आहेस.. पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा...
तुझा 'जबरा फॅन'