दोन आफ्रिकी संघात वर्चस्वाची लढाई, घाना-माली उपांत्यपूर्व लढत आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:55 AM2017-10-21T01:55:59+5:302017-10-21T02:02:11+5:30
फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत शनिवारी घाना संघाला माली संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाºया संघाला या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बचाव फळीकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.
गुवाहाटी : फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत शनिवारी घाना संघाला माली संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाºया संघाला या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बचाव फळीकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.
घानाने १९९५ मध्ये या स्पर्धेत शेवटचे जेतेपद पटकावले होते. यावेळी घाना पुन्हा एकदा जेतेपदाच्या दावेदारांमध्ये आहे. त्यांनी साखळी फेरीत अमेरिकेविरुद्धच्या लढतीचा अपवाद वगळता अन्य सामन्यांत चमकदार खेळ केला आहे.
दरम्यान, अंडर-१७ आफ्रिकी कप आॅफ नेशन्सच्या फायनलमध्ये घानाला मालीविरुद्ध १-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. आता घाना संघ या पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक आहे. घाना संघाला अभेद्य बचाव फळी, वेगवान स्ट्रायकर या व्यतिरिक्त समर्थकांचा पाठिंबा मिळेल.
उपउपांत्यपूर्व फेरीत पदार्पण करणा-या नाइजरचा २-० ने पराभव केल्यानंतर सॅम्युअल फॅबिनच्या खेळाडूंनी आपल्या समर्थकांसह विजयाचा जल्लोष साजरा केला.
‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावणा-या घाना संघाने कर्णधार एरिक एईयाने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर अंतिम आठमध्ये सहज प्रवेश मिळवला. एईयाने संघाचे शानदार नेतृत्व केले आहे. तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविणाºया खेळाडूंपैकी एक आहे.
शनिवारी इंदिरा गांधी अॅथ्लेटिक्स स्टेडियममध्ये निश्चितच त्याच्या कामगिरीवर नजर राहील. प्रशिक्षक फॅबिन म्हणाले,‘प्रेक्षकांमध्ये समर्थक व आपल्या देशाचे चाहते बघितल्यानंतर निश्चितच चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. आम्ही नेहमी प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करावे, अशी त्यांना अपेक्षा असते.’
फॅबिन यांनी आपल्या संघाच्या कामगिरीवर थोडी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले,‘गोल करण्यात येत असलेले अपयश चिंतेचा विषय आहे. आम्ही त्यावर मेहनत घेत आहोत.’
नजीम याकुबू व गिडोन मेनसाह या जोडीच्या मजबूत बचावाच्या जोरावर तीन सामन्यांत घाना संघाला केवळ एकदा गोल स्वीकारावा लागला. एईयासह संघाचा आक्रमक मिडफिल्डर सादिक अब्राहम याचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली. आपल्या वेगवान खेळाने घानाच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना थकविले, पण माली संघाचा बचाव भेदणे वेगळी बाब ठरेल.
माली संघाने इराकविरुद्ध पाच गोल नोंदविले होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. इराकच्या प्रशिक्षकांनी मात्र त्यांच्यावर अधिक वयाचे खेळाडू खेळविल्याचा आरोप केला आहे, पण जोनास कोमलाच्या संघाने त्यावर लक्ष दिले नाही.
मालीच्या लासाना एनडियायेने चार सामन्यांत पाच गोल नोंदवले असून घानाविरुद्ध तो शानदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे. इराकविरुद्धच्या लढतीत माली संघाने वारंवार प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदला, पण त्या तुलनेत घानाविरुद्धची लढत मात्र त्यांच्यासाठी वेगळी असेल. त्यामुळे कोमलासाठी सर्वांत मोठी चिंता त्यांचा बचाव राहील. (वृत्तसंस्था)