दिग्गज प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सामने व्हावेत - सुनील छेत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:42 AM2018-05-07T00:42:23+5:302018-05-07T00:42:23+5:30
भारतीय संघाला जर एएफसी आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर आगामी सहा महिन्यांमध्ये संघाला दिग्गज प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मायदेशात व विदेशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.
गुरुग्राम - भारतीय संघाला जर एएफसी आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर आगामी सहा महिन्यांमध्ये संघाला दिग्गज प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मायदेशात व विदेशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.
छेत्री म्हणाला,‘भारतीय संघाला पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये ५ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित स्पर्धेसाठी सर्वोत्तम तयारी करावी लागेल. भारतीय संघ २०११ मध्ये या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या वेळी साखळी फेरीत सर्व सामने मोठ्या फरकाने गमावित भारतीय संघ साखळी फेरीतच गारद झाला होता.
छेत्री म्हणाला,‘देशाबाहेर सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. मायदेशात आमची कामगिरी चांगली आहे, पण विदेशातील मैदानावर आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यात आम्हाला जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली, तर क्षमतेची चाचणी घेता येईल.
आशिया कप स्पर्धेत आम्हाला आशियातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळायचे आहे.’
छेत्री म्हणाला,‘गट सोपा आहे, असे आम्ही म्हणणार नाही. संयुक्त अरब अमिरातचे रँकिंग आमच्यापेक्षा वरचे आहे. ते गृहमैदानावर खेळणार आहेत. थायलंड संघ गेल्या सहा महिन्यांमध्ये सर्वाधिक सुधारणा करणारा संघ आहे. सहा-सात वर्षांपूर्वी आम्ही थायलंडविरुद्ध खेळलो होतो आणि त्यावेळी २-२ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. ते आशियातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळत आहेत. आॅस्ट्रेलिया आणि जपान या संघांसाठी थायलंडला पराभूत करणे कठीण भासत आहे.’
भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ५ जानेवारी रोजी दुबईमध्ये थायलंडविरुद्ध करणार आहे. (वृत्तसंस्था)
भारताला विश्वकप पात्रता स्पर्धेत इराण, ओमान, तुर्कमेनिस्तान व गुआम या संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. स्टीफन कान्स्टेनटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाचा विश्वकप पात्रता स्पर्धेत १० पैकी केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. यंदा आॅगस्ट महिन्यात ३४ व्या वर्षांचा होणाºया छेत्रीने मात्र २०११ च्या तुलनेत यावेळी भारताला सोपा गट मिळाला असल्याच्या वृत्ताला असहमती दर्शवली. त्या वेळी भारताच्या गटात आशियाई पॉवरहाऊस आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या संघांसह बहरिनचा समावेश होता. या वेळी भारताच्या गटात संयुक्त अरब अमिरात, थायलंड आणि बहरिन या संघांचा समावेश आहे.