आशियाई फुटबॉलसाठी ड्रॉ ठरला; स्पर्धेत भारताला स्थान नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 12:07 AM2018-07-06T00:07:51+5:302018-07-06T00:08:19+5:30
भारतीय फुटबॉल संघ इंडोनेशियात होणाऱ्या आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाही. कारण आज या स्पर्धेचा ड्रॉ घोषित करण्यात आला. त्यात भारताचा समावेश नाही.
नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघ इंडोनेशियात होणाऱ्या आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाही. कारण आज या स्पर्धेचा ड्रॉ घोषित करण्यात आला. त्यात भारताचा समावेश नाही.
भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) पुरुष आणि महिला फुटबॉल संघ या वेळी इंडोनेशियात न पाठवण्याचा निर्णय घेतला. कारण आॅलिम्पिक संघटनेच्या मानकांना पुरुष आणि महिला फुटबॉल संघ पूर्ण करू शकलेला नाही. आयओएने भारताच्या पुरुष आणि महिला फुटबॉल संघांना पदक जिंकण्यासाठी दावेदार समजले नाही आणि त्यांना परवानगी नाकारली.
भारतीय पुरुष फुटबॉल संघांचे लक्ष आशियाई स्पर्धेचा उपयोग पुढील वर्षी एएफसी आशिया कपच्या तयारीसाठी करण्याकडे होते. या निर्णयाने वाद उपस्थित झाला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयओएच्या या निर्णयाला चुकीचे म्हटले आहे. कारण गेल्या काही वर्षात भारतीय फुटबॉलची वेगाने प्रगती होत आहे. भारतीय संघाने १७३ रँकिंगवरून ९७ वे स्थान मिळवले आहे.
आयओए अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी आशियाई स्पर्धेत फुटबॉलला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला, तसेच पेनचॅक सिलाट यासारख्या अपरिचित खेळांना भारतीय संघात सहभागी करून घेतले. त्यांनी या निर्णयाचा बचाव करताना म्हटले की,‘ते संभाव्य पदक विजेते आहेत आणि संघात गैर दावेदारांसाठी कोणतीही जागा नाही.’ बत्र यांनी सांगितले की, ‘आम्ही पेनचॅक सिलॅटची निवड केली कारण या खेळात भारत सातत्याने पदक जिंकत आहे. शिवाय आशियाई स्पर्धेतही त्यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे.’