बेलारुसमध्ये सुरू आहे फुटबॉल लीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 03:23 AM2020-04-27T03:23:38+5:302020-04-27T03:23:41+5:30
खेळाडूंना आपल्या स्वास्थ्याची चिंता आहे आणि केवळ कट्टर चाहतेच स्टेडियममध्ये सामने बघण्यासाठी जात आहेत.
मिन्स्क : जगभरात क्रीडा स्पर्धा ठप्प असताना बेलारुसमध्ये फुटबॉल लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे भारतासह अनेक देशांमध्ये प्रसारण होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षक वाढले आहेत. खेळाडूंना आपल्या स्वास्थ्याची चिंता आहे आणि केवळ कट्टर चाहतेच स्टेडियममध्ये सामने बघण्यासाठी जात आहेत.
एफसी स्लुटास्कचे चाहते याहोर खावान्स्की म्हणाले की, आठवडाअखेर फुटबॉल बघितल्याशिवाय चैन पडत नाही. बेलारुसमध्ये जीवन सामान्य पद्धतीने सुरू आहे. कारण येथील सरकारने कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्याचे विश्व स्वास्थ्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) सूचना मानली नाही. बेलारुसची लोकसंख्या जवळजवळ एक कोटी आहे आणि येथे कोरोना व्हायरसचे ९५९० रुग्ण आढळले. त्यांचा शेजारी देश युक्रेनची लोकसंख्या त्यांच्या चौपट आहे, पण तेथे यापेक्षा कमी रुग्ण आहेत. बेलारुस फुटबॉल महासंघ सरकारच्या निर्णयानुसार चालत आहे. त्यांनी म्हटले की, सध्याच्या दिशानिर्देशांमध्ये ते सामन्यांचे आयोजन स्थगित करू शकत नाही. त्यांनी या आठवड्यात घोषणा केली होती की, महिला लीग दोन आठवडे उशिरा ३० एप्रिलपासून सुरू होईल. सामने सुरू ठेवल्यामुळे बेलारुस लीगला नवे जीवन लाभले आहे. रशियाचे सर्वांत मोठ्या क्रीडा प्रसारण कंपनीने मार्चमध्ये सामने प्रसारणाचे अधिकार विकत घेतले. त्यानंतर भारत व इस्रायलसह ११ अन्य देशांनी त्यांचे अनुकरण केले. (वृत्तसंस्था)