बेल्जियम तृतीय स्थान पटकावेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 05:33 AM2018-07-14T05:33:04+5:302018-07-14T05:33:20+5:30

बेल्जियम आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानासाठी लढतील. पण, त्याचवेळी त्यांना विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाल्याच्या धक्क्यातून आणि पर्यायाने नैराश्यातून स्वत:ला सावरत मैदानावर उतरावे लागेल.

Belgian will get third place! | बेल्जियम तृतीय स्थान पटकावेल!

बेल्जियम तृतीय स्थान पटकावेल!

Next

- रणजीत दळवी

बेल्जियम आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानासाठी लढतील. पण, त्याचवेळी त्यांना विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाल्याच्या धक्क्यातून आणि पर्यायाने नैराश्यातून स्वत:ला सावरत मैदानावर उतरावे लागेल. एका अतिशय कठीण स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि शारीरिक तसेच मानसिक दमछाक - तणाव यावर मातही करावी लागेल. येथे एक दिवसाची विश्रांती अधिक मिळाल्याने बेल्जियमला थोडा लाभ अवश्य मिळाला. म्हणजे तयारीसाठी जादा वेळ. पण तिसºया स्थानासाठी तयारी? होय, शेवटी ही विश्वस्पर्धा आहे आणि तिसरे स्थान मिळविणे हेदेखील अभिमानास्पद असते.
हे दोन्ही संघ खरेखुरे व्यावसायिक असल्याने आपल्या तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या शक्तीनुसार योजना निश्चित आखतील. त्या मैदानावर यशस्वीपणे अंमलात आणण्याचे आटोकाट प्रयत्नही होतील. एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी कोणीही सोडणार नाही. तसे पाहावयास गेले, तर बेल्जियमच्या संघातील बहुतांश खेळाडू इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळत असल्याने आपण जणू त्या स्पर्धेतलाच एखादा सामना पाहात आहोत की काय असा भास व्हावा!
इंग्लंडला किएरन ट्रिपिएर, जॉर्डन हेंडरसन या सेट-पीस तज्ज्ञ आणि मधल्या फळीतील महत्त्वाचे दुवे असणाºया खेळाडूंच्या फिटनेसची समस्या आहे असे दिसते. त्यांच्या आघाडीच्या फळीतले रहीम स्टर्लिंग आणि हॅरी केन यांचा फॉर्म आणि गोल करण्याची क्षमता यावरही मोठे प्रश्नचिन्ह उद्भवले आहे. ‘गोल स्कोअरिंग’च्या मोहिमेला अन्य कोणी हातभार लावला, तरच इंग्लंडला विजयाची आशा राहील. समजा, गोल करणे अशक्य झाले, तर मागे बचाव करणेही कठीण बनते. त्या फळीने किती वेळ तग धरायचा?
एडन हेझार्ड जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो हवे तेव्हा इंग्लंडच्या बचावाला खिंडार पाडू शकतो. रोमेलू लुकाकू गेल्या दोन सामन्यांत थंड पडला होता. पण त्याच्यासाठी इंग्लिश बचावफळीतील मॅग्वायर आणि स्टोन्ससारख्यांचा मुकाबला म्हणजे नित्याचीच बाब नाही का? इंग्लिश साखळीत खेळतोच ना तो?
दोन्ही संघांच्या तयारी आणि योजनांविषयी बोलायचे झाल्यास, रॉबर्टो मार्टिनेझ हे जबरदस्त अनुभव असलेले सेनापती. त्या तुलनेत गॅरेथ साऊथगेट हे बरेच कमी. त्यांना नेहमीच आक्रमण करणे आवडते. फ्रान्सविरुद्ध त्यांना तेवढी मुभा मिळाली नव्हती. कारण त्यांना कायलियन एमबाप्पे आणि ग्रिझमन यांना रोखण्यासाठी मधली आणि बचावफळी अधिक भक्कम करावी लागली होती. तसेच या दोघांना मदत करणारे पॉल पोग्बा, ब्लेझ मॅटुइडी आणि एनगोलो काँटे हे त्रिकूटही धोकादायक होते. त्यामानाने डेल अली, जेस्सी लिनगार्ड आणि जॉर्डन हेंडरसन ही प्रतिस्पर्ध्यांची मधली फळी कमी कल्पक म्हणून धोकादायकही आहे.
थॉमस मेडनियर आता निलंबनानंतर उपलब्ध असल्याने मार्टिनेझ यांना बचावफळीची चिंता असणार नाही. शिवाय व्हर्मायलनचा पर्यायही त्यांच्यापाशी आहे. व्हिन्सेन्ट कोम्पानी बचावामध्ये कच्चा दुवा ठरू शकतो, असे म्हटले जात असले तरी त्याचा अनुभव दांडगा आहे. पण मागे गोलरक्षक थिबॉ कुर्तोआ आहे की! ही लढत रंगण्याची शक्यता आहे, पण त्याकरिता इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्ड कितपत करामत करतो यावर बरेचसे अवलंबून राहील. त्याने बेल्जियमचे गोलप्रयत्न हाणून पाडले तर?
एकूणच बेल्जियम उजवा वाटतो, तो त्यांच्या भक्कमपणामुळे. इंग्लंडची क्रोएशियाने ज्या प्रकारे हवा काढली हे बघता त्यांना या घोर निराशेतून बाहेर पडावे लागेल. ते जमले तर आणि तरंच त्यांना विजयी होता येईल. आपले पाठीराखे आणि इंग्लिश मीडियाने टाकलेल्या विश्वासास पात्र होण्याची त्यांची मनीषा अवश्य असेल!

Web Title: Belgian will get third place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.