ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्होची निवृत्तीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 14:05 IST2018-01-17T14:00:26+5:302018-01-17T14:05:40+5:30
ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्होने फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोनाल्डिन्हो मागच्या दोनवर्षांपासून व्यावसायिक फुटबॉलपासून दूर होता.

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्होची निवृत्तीची घोषणा
साओ पावलो - ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्होने फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोनाल्डिन्हो मागच्या दोनवर्षांपासून व्यावसायिक फुटबॉलपासून दूर होता. रोनाल्डिन्हो ब्राझीलच्या 2002 सालच्या विश्वचषक विजेत्या फुटबॉल संघातील महत्वाचा खेळाडू होता. या विश्वचषकात रोनाल्डिन्होने महत्वाची भूमिका बजावली होती. 2015 साली फ्लूमाइन्स क्लबसाठी रोनाल्डिन्हो शेवटचा सामना खेळला होता.
रोनाल्डिन्होचा भाऊ आणि एजंट रॉबर्ट एसिसने मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. यापुढे रोनाल्डिन्हो फुटबॉलच्या मैदानावर उतरणार नाही असे एसिसने सांगितले. स्थानिक क्लबमधून करीयरला सुरुवात करणा-या रोनाल्डिन्होला पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळताना ख-या अर्थाने नाव, प्रसिद्धी मिळाली. 2003 ते 2008 दरम्यान रोनाल्डिन्होने जगप्रसिद्ध बार्सिलोना क्लबचे प्रतिनिधीत्व केले.
2005 साली त्याची फीफाच्या सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी निवड झाली होती. 2008 ते 2011 दरम्यान रोनाल्डिन्हो इटलीच्या एसी मिलान क्लबकडून खेळला. ब्राझीलला परतल्यानंतर रोनाल्डिन्होने फ्लामेंगो आणि अॅटलेटिको क्लबकडून खेळताना आपले कौशल्य दाखवले. ब्राझीलकडून 97 सामने खेळताना रोनाल्डिन्होने 33 गोल केले. त्यातील दोन गोल 2002 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत केले होते. रोनाल्डिन्होने येत्या मार्च महिन्यात 38 वर्षांचा होईल. ऑगस्ट महिन्यात रशियामध्ये होणा-या फुटबॉल वर्ल्डकपनंतर ब्राझीलमध्ये फुटबॉलसाठी वेगळ काही तरी करण्याची रोनाल्डिन्होची योजना असल्याचे एसिसने सांगितले.