गोल्डन बुटवर केनचा दावा मजबूत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:25 AM2018-07-09T04:25:13+5:302018-07-09T04:25:28+5:30
विश्वकप फुटबॉल स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन गोल्डन बुटच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहे, पण बेल्जियमचा रोमेलू लुकाकू पुढील दोन सामन्यात चमकदार कामगिरी करीत या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरू शकतो.
नवी दिल्ली - विश्वकप फुटबॉल स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन गोल्डन बुटच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहे, पण बेल्जियमचा रोमेलू लुकाकू पुढील दोन सामन्यात चमकदार कामगिरी करीत या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरू शकतो.
विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवणारा खेळाडू गोल्डन बुट पुरस्काराचा मानकरी ठरतो. हेरी केनने आतापर्यंत सहा गोल नोंदवले आहे तर त्याचा जवळचा प्रतिस्पर्धी लुकाकूच्या नावावर चार गोलची नोंद आहे. या दोन्ही खेळाडूंना आता दोन-दोन सामने खेळण्याची संधी मिळेल. अशा स्थितीत उपांत्य फेरीच्या लढतीदरम्यान संघाच्या कामगिरीव्यतिरिक्त केन व लुकाकू यांच्या कामगिरीवर नजर राहील.
रशियाचा डेनिस चेरिसेव व पोर्तुगालाचा ख्रिस्टियानो रोनाल्डो यांनीही या स्पर्धेत प्रत्येकी चार गोल नोंदवले, पण त्यांचे संघ स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. या व्यतिरिक्त सहा खेळाडूंनी प्रत्येकी तीन गोल नोंदवले आहेत. त्यात फ्रान्सचा काइलियान एमबापे व मंटोनी ग्रीजमॅन यांचा समावेश आहे. फ्रान्स ज्यावेळी १० जुलै रोजी उपांत्य फेरीत बेल्जियमसोबत खेळेल त्यावेळी लुकाकू व्यतिरिक्त या दोन्ही खेळाडूंना गोल्डन बुटच्या जवळ जाण्याची संधी राहील. त्यामुळे आता या तिघांच्या खेळाची उत्सुकता लागली आहे.
गोल्डन बुटसाठी सध्या केनचा दावा अधिक मजबूत आहे. इंग्लंड ११ जुलै रोजी क्रोएशियाविरुद्ध दुसऱ्या उपांत्य लढतीत खेळेल. त्यावेळी केनला या लढतीत स्कोअर नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा गोल नोंदवण्याच्या शर्यतीत मोठी आघाडी घेण्याची संधी राहील. जर केन गोल्डन बुटचा मानकरी ठरला तर
इंग्लंडचा खेळाडू दुसºयांदा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मान मिळवेल. यापूर्वी १९८६ मध्ये मेक्सिकोमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वकप स्पर्धेत गॅरी लिनाकरने सर्वाधिक सहा गोल नोंदवत गोल्डन बुट (त्यावेळी गोल्डन शू) पटकावला होता.
बेल्जियमच्या एकाही खेळाडूला अद्याप गोल्डन बुट मिळवता आलेला नाही आणि जर लुकाकूने जर हा मान मिळवला तर अशी कामगिरी करणारा तो देशाचा पहिला खेळाडू ठरेल.
फ्रान्स संघाबाबत विचार करात दिग्गज फुटबॉलपटू जस्ट फोंटेनने १९५८ स्वीडन विश्वकप स्पर्धेत १३ गोल नोंदवण्याचा विक्रम करीत गोल्डन बुट पटकावला होता. कुठल्या एका विश्वकप स्पर्धेत हा गोल नोंदवण्याचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे.
क्रोएशियाचे स्वप्न कायम
जगरेब : क्रोएशिया मीडियाने विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात यजमान रशियाला पेनल्टीत नाट्यमय विजय नोंदविल्यानंतर आपल्या संघाची प्रशंसा केली आहे. क्रोएशियाचा संघ उपांत्य फेरीत इंग्लंडशी दोन हात करील.
‘स्पोर्टसके नोवोस्ती’ या वर्तमानपत्राने लिहिले, ‘मास्को, क्रोएशिया संघ सज्ज आहे. प्रिय इंग्लंड, पुन्हा तुमच्याशी खेळणे शानदार आहे.’ या वर्तमानपत्राने १९८८ च्या महान संघाच्या यशाचे स्मरण करीत लिहिले, ‘क्रोएशियाचे स्वप्न जिवंत आहे.’ १९९८ मध्ये क्रोएशियाचा स्वतंत्र देश म्हणून ही पहिली विश्वचषक स्पर्धा होती आणि त्यात त्यांनी उपांत्य फेरीत धडक मारली होती. इंग्लंडने २00९ मध्ये विश्वचषक क्वॉलिफायरमध्ये क्रोएशियाचा ५-१ असा पराभव केला होता. त्यानंतर गत वर्षी क्रोएशियाला इंग्लंडविरुद्ध १-४ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. या वर्तमानपत्राने लिहिले, ‘२0 वर्षांनंतर आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो आहोत. इंग्लंडविरुद्ध आम्हाला २00९ चा काही हिशेब चुकता करायचा आहे.’ जुटारनजी लिस्टने पहिल्या पानावर लिहिले, ‘क्रोएशिया पराभव मानू नका.’ या वर्तमानपत्राने इव्हान राकितिचचे मोठे छायाचित्रही लावले होते. (वृत्तसंस्था)