चॅम्पियन्स लीग : रियाल माद्रिदचे वर्चस्व संपविण्यास लिव्हरपूल प्रयत्नशील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 12:22 AM2018-05-26T00:22:00+5:302018-05-26T00:22:00+5:30
मोहम्मद सालाहच्या शानदार फॉर्मच्या जोरावर लिव्हरपूरलचे लक्ष शनिवारी खेळल्या जाणाऱ्या यूएफा चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये बलाढ्य रियाल माद्रिदचे वर्चस्व संपविण्यावर केंद्रित झाले आहे.
किव्ह : मोहम्मद सालाहच्या शानदार फॉर्मच्या जोरावर लिव्हरपूरलचे लक्ष शनिवारी खेळल्या जाणाऱ्या यूएफा चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये बलाढ्य रियाल माद्रिदचे वर्चस्व संपविण्यावर केंद्रित झाले आहे. त्याचवेळी स्पॅनिश क्लब रियाल माद्रिदचे सलग तिसरे विजेतेपद पटकावण्यास प्रयत्न असतील.
रियाल माद्रिदने तब्बल १२ युरोपियन चषक पटकाविले असून शनिवारी खेळल्या जाणाºया अंतिम लढतीत त्याची संख्या १३ करण्यास उत्सुक आहे. लिव्हरपूलने पाचवेळा हा चषक जिंकला आहे. यापूर्वी २००५ मध्ये त्यांनी जेतेपद पटकावले होते.
रियालने प्रथम सलग पाचवेळा युरोपियन चषक जिंकले होते आणि आता, पाच वर्षांत चौथ्यांदा चॅम्पियन्स लीग ट्रॉफीवर नाव कोरण्यास प्रयत्नशील आहे.
या निर्णायक सामन्यात लिव्हरपूलपुढे कडवे आव्हान राहणार आहे. कारण एटलेटिको माद्रिद (दोनदा) आणि युवेंट्स हालच्या अंतिम फेरीत स्टार फॉरवर्ड ख्रिस्टियानो रोनाल्डोला रोखण्यात अपयशी ठरले आहेत. लिव्हरपूलच्या खेळाडूंना आक्रमकतेमुळे अधिक विश्वास वाटत आहे. त्यामुळे युक्रेनच्या राजधानीमध्ये असलेल्या आॅलिम्पिक स्टेडियममध्ये ही लढत रंगतदार होण्याची खात्री आहे. इतिहासाचा विचार करता ही स्वप्नवत अंतिम लढत होईल, अशी आशा आहे.
११वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अंतिम फेरीत धडक मारलेला लिव्हरपूल संघ १२वेळचा चॅम्पियन रियाल माद्रिदचे तगडे आव्हान सज्ज आहे. विशेष म्हणजे तब्बल ३७ वर्षांनंतर उभय संघ विजेतेपदाच्या ‘हायव्होल्टेज’ सामन्यात लढतील. (वृत्तसंस्था)
ऐतिहासिक कामगिरी करण्याचा निर्धार
रियाल माद्रीदने जेतेपद पटकावले तर १९७६ मध्ये बायर्ननंतर सलग तीनदा युरोपियन चषक जिंकणारा पहिला संघ ठरेल. रोनाल्डो आपले पाचवे चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावू शकतो. त्यासोबत तो वैयक्तिक विक्रमाची बरोबरी साधताना आणखी एक ‘बॅलन डिओर’चा दावेदार ठरेल. विशेष म्हणजे फुटबॉल लिजंड झिनेदीन झिदानही प्रशिक्षक म्हणून चॅम्पियन्स लीगचे सलग तिसरे विजेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
शानदार प्रवास करण्यास लिव्हरपूल सज्ज
लिव्हरपूल संघाने यंदाच्या मोसमात विक्रमी ४६ गोल नोंदवले असून त्यापैकी ११ गोल सालाहने केले आहेत.लिव्हरपूलच्या वेबसाईटवर क्लोप म्हणाले की,‘जर जेतेपद पटकावले तर ‘किव्ह व अंतिम फेरीचा प्रवास’ हा आतापर्यंतचा शानदार प्रवास राहील.’दरम्यान संघात अनुभवाची उणीव भासत आहे. कारण संघातील एकही खेळाडू यापूर्वी चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत खेळलेला नाही, पण क्लोप यांना कल्पना आहे की, झिनेदिन झिदानचा संघ त्यांना कमी लेखू शकत नाही.