चॅम्पियन्स लीग : रियाल माद्रिद ‘चॅम्पियन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:22 AM2018-05-28T02:22:02+5:302018-05-28T02:22:02+5:30
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मैदानात उतरून निर्णायक कामगिरी केलेला स्टार गेरेथ बेल याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य रियाल माद्रिदने १३ वे चॅम्पियन्स लीग जेतेपद उंचावताना लिव्हरपूलचा ३-१ असा धुव्वा उडवला.
कीव - सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मैदानात उतरून निर्णायक कामगिरी केलेला स्टार गेरेथ बेल याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य रियाल माद्रिदने १३ वे चॅम्पियन्स लीग जेतेपद उंचावताना लिव्हरपूलचा ३-१ असा धुव्वा उडवला. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुस-या
सत्रात बेलेच्या धडाक्यापुढे रियाल माद्रिदने आपला दबदबा राखला. चॅम्पियन्स लीग स्पर्धेत सलग तीन सत्रांमध्ये जेतेपद पटकावून देणारा झिनेदान झिदान पहिला प्रशिक्षक बनला आहे.
रियाल माद्रिदने यासह विक्रमी १३ व्यांदा विजेतेपद पटकावतानाच गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा पराक्रम केला. या सामन्यात सर्वांचे लक्ष होते ते स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिव्हरपूलसाठी यंदा हीरो ठरलेला मोहम्मस सालाह यांच्यावर. रोनाल्डोला गोल करण्यात यश आले नसले, तरी त्याने अप्रतिम कौशल्य दाखवताना लिव्हरपूलवर दबाव आणण्यात यश मिळवले.
सामन्याचे पहिले सत्र गोलशून्य बरोबरी सुटल्यानंतर, दुसºया सत्रात वेगवान खेळ झाला. वेगवान सुरुवात करून लिव्हरपूलने सुरुवातीला रियाल माद्रिदवर दडपण आणले होते खरे, मात्र दुसºया सत्रात माद्रिदने
आपला हिसका दाखवताना एकहाती वर्चस्व राखले. यावेळी मैदानात उतरलेल्या बेलेन आपला जलवा दाखवला. त्याआधी ५१व्या मिनिटाला गोलरक्षक लॉरिस कारियूसकडून झालेल्या माफक चुकीचा फायदा
घेत सोपा गोल करत माद्रिदला आघाडीवर नेले. मात्र तीन मिनिटांनी सादियो मेन याने लिव्हरपूलसाठी महत्त्वपूर्ण गोल करताना संघाला
५४ व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली.
यानंतर केवळ बेल शो झाला. इस्कोच्या जागेवर मैदानात उतरलेल्या बेलेने ६४व्या मिनिटाला अप्रतिम गोल करत माद्रिदला २-१ असे आघाडीवर नेले. विशेष म्हणजे मैदानात उतरल्यानंतर दोनच मिनिटांनी बेलने गोल केला होता. ही आघाडी माद्रिदने अखेरच्या काही मिनिटांपर्यंत कायम राखली. सामना संपण्यास ७ मिनिटे शिल्लक असताना पुन्हा एकदा बेलने लिव्हरपूलच्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि गोलरक्षक कारियूसच्या चुकीचा फायदा घेत ताकदवर किक मारत चेंडू गोलजाळ्यास धाडला. यासह माद्रिदने आपले विक्रमी १३ जेतेपद निश्चित केले. (वृत्तसंस्था)
मी केलेला अखेरचा गोल माझा सर्वश्रेष्ठ गोल नोंदवला गेला पाहिजे. या गोलसाठी चॅम्पियन्स लीगसारखा मोठा मंच असूच शकत नाही. मैदानात सर्वश्रेष्ठ खेळ करणे हेच माझ्या हातात होते व मी तेच केले.
- गेरेथ बेल, स्ट्रायकर
पुढील काही दिवसांमध्ये मी माझ्या पाठीराख्यांना उत्तर देईन, कारण याच लोकांनी मला नेहमी पाठिंबा दिला आहे. रियाल माद्रिदसह राहणे खूप चांगला अनुभव होता. कोणत्याही खेळाडूचे भविष्य महत्त्वपूर्ण नाही. - ख्रिस्तियानो रोनाल्डो
मला खेळाडूंचे अभिनंदन केले पाहिजे. कारण त्यांनी जे केले ते सोपे नव्हते. हे व्यवसायाप्रमाणे आहे. यासाठी कोणतेही शब्द नाही. या संघासाठी एवढेच सांगता येईल. खेळाडूंच्या गुणवत्तेला कोणतीही मर्यादा नाही. - झिनेदान झिदान