मुंबईत रंगणार चौरंगी फुटबॉल स्पर्धा, इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 02:05 AM2018-04-21T02:05:12+5:302018-04-21T02:05:12+5:30
मुंबईत येत्या १ मे ते १० जूनदरम्यान होणाऱ्या चार देशांच्या ‘इंटरकॉन्टिनेंटल कप’ स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या टप्प्यात दक्षिण आफ्रिका आणि चिनी तैपई संघांविरुद्ध भिडणार असून ही वार्षिक स्पर्धा असेल.
नवी दिल्ली : मुंबईत येत्या १ मे ते १० जूनदरम्यान होणाऱ्या चार देशांच्या ‘इंटरकॉन्टिनेंटल कप’ स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या टप्प्यात दक्षिण आफ्रिका आणि चिनी तैपई संघांविरुद्ध भिडणार असून ही वार्षिक स्पर्धा असेल. यामध्ये आफ्रिकन फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधित्व दक्षिण आफ्रिका, ओसनियाचे प्रतिनिधित्त्व न्यूझीलंड आणि एएफसीकडून चिनी तैपई स्पर्धेत सहभागी होईल. दक्षिण आफ्रिकेने फिफा विश्वचषकाच्या गेल्या तीन टप्प्यांत भाग घेतला आहे. न्यूझीलंडचा संघ दोन वेळा विश्वचषक खेळलेला आहे. हे दोन्ही संघ २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळले होते. स्पर्धेत सर्व सहभागी संघ अखिल भारतीय फुटबॉल महासंघासोबत केलेल्या करारानुसार आपले पहिले नोंदणीकृत संघ पाठविणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील. यानंतर अव्वल दोन संघ फायनलमध्ये पोहोचतील.
पुढील वर्षी होत असलेल्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी मजबूत करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. जी आठ वर्षांत उपखंडातील चॅम्पियनशीपसाठी दुसरी क्वालिफिकेशन असून ही चौथी संधी आहे. यापूर्वी अशी संधी २०११ साली दोहामध्ये मिळाली होती. (वृत्तसंस्था)
मोठी संधी...
एआयएफएफचे महासचिव कुशाल दास म्हणाले, ‘ही स्पर्धा ‘ब्लू टायगर्स’ला एएफसी आशियाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. स्पर्धेत भारत उपखंडातील मजबूत संघांविरुद्ध खेळेल. आशिया चषकापूर्वी अशा संघांविरुद्ध खेळण्याची संधी भारताला मिळेल.’