भारतापुढे बलाढ्य कोलंबियाचे तगडे आव्हान; प्रशिक्षक मातोस यांना चमकदार कामगिरीचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:57 AM2017-10-09T00:57:38+5:302017-10-09T00:57:53+5:30
सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघ १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुस-या सामन्यात सोमवारी कोलंबियाविरुद्ध विजयाच्या निर्धाराने खेळेल.
नवी दिल्ली : सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघ १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुस-या सामन्यात सोमवारी कोलंबियाविरुद्ध विजयाच्या निर्धाराने खेळेल. दरम्यान, कोलंबियाचा बलाढ्य संघांमध्ये गणना होत असल्याने भारतापुढे विजयासाठी तगडे आव्हान असेल.
येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणाºया दुसºया सामन्यात भारतीय संघ आपल्या चुका टाळण्यावर अधिक भर देईल. पहिल्या सामन्यात सुरुवातीची ४० मिनिटे चांगला खेळ केल्यानंतर भारतीयांकडून काही चुका झाल्या आणि नंतर अमेरिकेने वर्चस्व मिळवल्यानंतर भारतीयांच्या उणिवा स्पष्ट झाल्या होत्या. त्यामुळे दुसºया सामन्यात यजमानांपुढे कठीण आव्हान असेल. भारताने पहिल्या सामन्यात आपली गुणवत्ता नक्कीच दाखवली, परंतु कौशल्याच्याबाबतीत अमेरिका संघ खूप वरचढ ठरला.
मध्यरक्षक फळीतील मुख्य खेळाडू सुरेश सिंग याच्या मते भारताला अंतिम क्षणातील पासवर आणखी नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. परंतु, कोलंबियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करणे अनिवार्य आहे. त्याचवेळी पहिल्यांदाच युवा विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या नायजेर संघाकडूनही भारतीय संघ प्रेरणा घेईल. नायजेरने जबरदस्त पदार्पण करताना आपल्या पहिल्याच सामन्यात उत्तर कोरियाला नमवण्याचा पराक्रम केला.
त्याचवेळी, प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मातोस भारताच्या पहिल्या सामन्यातील प्रदर्शनाने निराश आहेत. त्याचबरोबर, त्यांना विश्वास आहे, की पुढील सामन्यात कोलंबियाविरुद्ध भारतीय युवा चमकदार कामगिरी करतील. अमेरिकेविरुद्धच्या सलामी सामन्यात भारताने काही वेळा चांगला खेळ करून आपला प्रभाव पाडला. विशेष म्हणजे भारताचा एक गोल थोडक्यात हुकला. मात्र, तरी दोन्ही संघातील फरक स्पष्टपणे जाणवला.
स्ट्रायकर कोमल थटालने अप्रतिम कौशल्य सादर करताना आपल्या वेगवान खेळाच्या जोरावर काही आक्रमक चाली रचल्या. मात्र, गोल करण्याची सुवर्णसंधी थोडक्यात हुकल्याने त्याचे प्रयत्न विफल ठरले. तसेच, महाराष्ट्राच्या अनिकेत यादवनेही आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. बचावफळीमध्ये अन्वर अली आणि जितेंद्र सिंग यांनी आपल्या बाजूने चांगला बचाव केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गोलरक्षक एम. धीरज याने भक्कम बचावाचे प्रदर्शन करताना अनेक गोल रोखून भारताचा मोठा पराभव टाळला.
दुसरीकडे, कोलंबिया भारताविरुद्ध आक्रमक खेळ करणार हे नक्की आणि यासाठी यजमानांना सज्ज राहावे लागेल. सलामीला घानाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने कोलंबिया आपल्या पूर्ण ताकदनिशी यजमानांविरुद्ध खेळेल. कोलंबियाने आतापर्यंत ५ वेळा या स्पर्धेत सहभाग घेतला असून
तीन वेळा त्यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. (वृत्तसंस्था)