CoronaVirus : फुटबॉल सामन्यातून कोरोनाने मारली इटलीत ‘एन्ट्री’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 03:56 AM2020-03-28T03:56:07+5:302020-03-28T05:34:59+5:30
यूईएफए चॅम्पियन्स लीगमधील इटालियन क्लब अटलांटा आणि स्पेनचा क्लब व्हॅलेंसिया यांच्यात १९ फेब्रुवारीला मिलान येथील सॅन सिरो स्टेडियमवर झालेला सामना पाहण्यासाठी ४० हजार प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते.
मिलान : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील क्रीडा घडामोडी थांबविण्यात आल्या असून अनेक देशही लॉकडाऊन करण्यात आले आहेत. आतापर्यंत जगभरात ५ लाख ३६ हजार ४५४ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. चीनपासून सुरुवात झालेल्या या विषाणूने जगभरात थैमान घातले. याची मोठी किंमत चीनने मोजली असली, तरी आता इटलीला त्याहून मोठा धक्का बसत आहे. जगभरात कोरोनाने सर्वाधिक बळी इटलीमध्ये घेतले आहेत. इटलीत कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्यामागचे कारण एक फुटबॉल सामना असल्याचा दावा करण्यात आला असल्याने सर्वच क्रीडाप्रेमींना आता धक्का बसला आहे.
यूईएफए चॅम्पियन्स लीगमधील इटालियन क्लब अटलांटा आणि स्पेनचा क्लब व्हॅलेंसिया यांच्यात १९ फेब्रुवारीला मिलान येथील सॅन सिरो स्टेडियमवर झालेला सामना पाहण्यासाठी ४० हजार प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते. चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील पहिल्या लीग सामन्यात अटलांटाने ४-१ असा विजय मिळवला. या सामन्यानंतर आठवड्याभरात उत्तर इटलीत कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. या सामन्यासाठी बेर्गामो येथील ४० हजार चाहते मिलान येथून घरच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. याच बेर्गामो येथे कोरोना विषाणूचा मोठा प्रभाव आढळून येत आहे. येथे जवळपास ६ हजार ७०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. इटलीतील ही परिस्थिती पाहता सिरी ए इटालियन लीग ९ मार्चपासून स्थगित करण्यात आली. बेर्गामो येथील उत्तरपूर्व शहरात ६०० पैकी १३४ जण कोरोनामुळे आजारी पडल्याची अधिकृत माहिती मिळाली. यापूर्वी अटलांटाचा गोलरक्षक मार्को स्पोर्टिलो हाही कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
त्यानंतर इटलीतील सीरि ए लीगमध्ये आतापर्यंत १५ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह म्हणून सापडले आहेत. व्हॅलेंसिया क्लबनेही त्यांच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले.
तसेच इटालियन लीग विजेत्या युव्हेंटस क्लबमधील पाऊलो डीबाला, ब्लेस मातूडी आणि डॅनिेल रुगानी हेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
महापौरांनीही केला दावा
बेर्गामो महापौर जॉर्जिओ गोरी यांनीही चॅम्पियन्स लीगमुळे कोरोना व्हायरस पसरला असल्याचा दावा केला आहे. ‘हा सामना पाहण्यासाठी ४० हजार लोकांनी मिलान येथे प्रवास केला. उर्वरित लोकं घरातून किंवा पब व बारमध्ये सामना पाहत होते. त्या रात्री कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असेल, हे नक्की,’ असे गोरी यांनी सांगितले.