Cristiano Ronaldo: रोनाल्डो मालामाल! सौदीच्या क्लबसोबत करार; वर्षाचा पगार बघाल तर हादराल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 11:26 AM2022-12-31T11:26:23+5:302022-12-31T11:27:03+5:30
रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील बेबनावामुळे ऐन वर्ल्डकप सुरु असतानाच दोघांनी करार संपविला होता. यानंतर रोनाल्डोच्या भविष्याबाबत अनेक प्रकारची शक्यता वर्तविण्यात येत होती. रोनाल्डो निवृत्ती घेईल असेही बोलले जात होते, त्यावर आता पूर्णविराम लागला आहे.
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तायानो रोनाल्डो झटक्यात मालामाल बनला आहे. त्याने सौदी अरेबियाच्या अल नस्सरसोबत अडीज वर्षांचा करार केला आहे. याचबरोबर तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर रोनाल्डो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे.
रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील बेबनावामुळे ऐन वर्ल्डकप सुरु असतानाच दोघांनी करार संपविला होता. यानंतर रोनाल्डोच्या भविष्याबाबत अनेक प्रकारची शक्यता वर्तविण्यात येत होती. रोनाल्डो निवृत्ती घेईल असेही बोलले जात होते, त्यावर आता पूर्णविराम लागला आहे.
३७ वर्षीय रोनाल्डोने २०२५ पर्यंत अल नस्सरसोबत करार केला आहे. यासाठी त्याला 200 मिलियन यूरो (1775 करोड़ रुपये) मिळणार आहेत. फुटबॉल क्लब अल नस्सरने याची माहिती दिली आहे. रोनाल्डोच्या समावेशामुळे अल नस्सरचा संघ मजबूत होईल. क्लबने नऊ सौदी प्रो लीग विजेतेपदे जिंकली आहेत. या संघाला आता प्रथमच एएफसी चॅम्पियन्स लीग जिंकण्याची आशा असेल.
"युरोपियन फुटबॉलमध्ये जे काही मिळविण्याचे मी ठरवले होते ते सर्व मी जिंकले आहे, त्यासाठी भाग्यवान आहे. आता मला वाटते की आशियातील माझा अनुभव शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे'', असे रोनाल्डोने म्हटले आहे.
रोनाल्डोने 2009-18 पासून स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदसोबत उत्कृष्ट खेळ केला. या काळात त्याने दोन ला लीगा, दोन स्पॅनिश चषक, चार चॅम्पियन्स लीग विजेतेपद आणि तीन क्लब विश्वचषक जिंकले आहेत. रोनाल्डोने क्लब आणि देशासाठी एकूण 800 हून अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने युव्हेंटसमध्ये तीन वर्षात दोन सेरी ए जेतेपद आणि एक कोपा इटालिया ट्रॉफीही जिंकली.