रोनाल्डोला बॅलोन डी’ओर पुरस्काराचे नामांकन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:51 AM2018-10-09T04:51:34+5:302018-10-09T04:51:52+5:30
फ्रान्स फुटबॉलने सोमवारी या पुरस्कारासाठी ३० नामांकने जाहीर केली. रेयाल माद्रिद क्लबच्या या माजी खेळाडूने माद्रिदला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
पॅरिस : बलात्काराचे आरोप झाल्यामुळे सध्या फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो वादामध्ये अडकला आहे. या आरोपांमुळे त्याची फुटबॉल कारकिर्द धोक्यात येईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत असताना प्रतिष्ठेच्या ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कारासाठी त्याला नामांकन मिळाले आहे. फ्रान्स फुटबॉलने सोमवारी या पुरस्कारासाठी ३० नामांकने जाहीर केली. रेयाल माद्रिद क्लबच्या या माजी खेळाडूने माद्रिदला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने मागील सत्रात माद्र्रिदचे प्रतिनिधित्व करताना सर्व प्रकारच्या स्पर्धांमधील ४४ सामन्यांत ४४ गोल केले.
१९५६ सालापासून फ्रान्स फुटबॉल हा पुरस्कार देत असून फुटबॉलपटूंना दिला जाणारा हा युरोपातील सर्वांत जुना पुरस्कार आहे. मागील १० वर्षांत रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांचीच या पुरस्कारावर मक्तेदारी राहिली आहे. या दोघांनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार जिंकला आहे. या नामांकनामध्ये मँचेस्टर सिटीचा मध्यरक्षक केव्हीन डी ब्रुयनेचाही समावेश आहे. त्याच्या नावावर प्रीमिअर लीग, कॅरेबाओ चषक आणि कम्युनिटी शिल्ड स्पर्धेची जेतेपदे आहेत. (वृत्तसंस्था)