Video: रेफ्रीला धक्का देणा-या ख्रिस्तियानो रोनाल्डोवर पाच सामन्यांची बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 02:51 PM2017-08-15T14:51:43+5:302017-08-15T14:57:40+5:30
स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोना क्लबविरुद्धच्या पहिल्या लीग लढतीत रोनाल्डोने सामनाधिकाऱ्यांना जोरदार धक्का दिला.
माद्रिद, दि. 15 - रिअल माद्रिद फुटबॉल क्लबचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावर पाच सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोवर रेफ्रीला धक्का दिल्यामुळे पाच सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. रॉयल स्पॅनिश फुटबॉल महासंघाने ही बंदी घातली आहे.
स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोना क्लबविरुद्धच्या पहिल्या लीग लढतीत रोनाल्डोने सामनाधिकाऱ्यांना जोरदार धक्का दिला. त्यामुळे त्याच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात आली. या सामन्यात गोल केल्यानंतर रोनाल्डोने टी-शर्ट काढून आनंद व्यक्त केला होता. त्यावेळीही त्याला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. मात्र, नंतर रेफ्रीला धक्का दिल्यामुळे रेड कार्ड दाखवून त्याला मैदानाबहेर काढण्यात आले. रेड कार्ड दाखवण्यात आल्यामुळे त्याच्यावर एका सामन्यांची बंदी होतीच आणि त्यात चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. या बंदीबरोबरच रोनाल्डोला 4 हजार 500 अमेरिकन डॉलरचा दंडही भरण्यास सांगितला आहे.
बार्सिलोना क्लबविरुद्धच्या पहिल्या लीग लढतीत रोनाल्डोने रेफ्री रिकाडरे डी बगरेस बेंगोएत्जी यांच्या निर्णयावर नाराज होऊन त्यांना धक्का दिला होता. त्यामुळे त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली. या निर्णयाविरोधात रोनाल्डो दहा दिवसांत दाद मागू शकतो. दाद मागूनही रोनाल्डोवरील बंदी कायम राहिल्यास त्याला पुढच्या चार सामन्यांना मुकावं लागणार आहे. या सामन्यात रोनाल्डोच्या संघाने 3-1 असा विजय मिळवला आहे. मात्र, बंदी उठली नाही तर परतीच्या लढतीत रिअल माद्रिदला रोनाल्डोशिवाय खेळावे लागणार आहे.
#Ronaldo is sent off#redcard#elclasicopic.twitter.com/AxQ4wxSYKv
— Transfer Rumours (@rumourkitchen) August 13, 2017