रोनाल्डोची जिगरबाज हॅटट्रिक! पोर्तुगाल-स्पेनमधील रंगतदार लढत बरोबरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 01:44 AM2018-06-16T01:44:27+5:302018-06-16T01:49:43+5:30
ख्रिस्टियानो रोनाल्डोने केलेली हॅटट्रिक आणि डिएगो कोस्टासह इतर स्पॅनिश खेळाडूंनी केलेला सांघिक खेळ यामुळे ब गटात पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली लढत 3-3 अशा बरोबरीत सुटली.
सोची - फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज फुटबॉलप्रेमींना अत्यंत अटीतटीच्या लढतीची मेजवानी मिळाली. ख्रिस्टियानो रोनाल्डोने केलेली हॅटट्रिक आणि डिएगो कोस्टासह इतर स्पॅनिश खेळाडूंनी केलेला सांघिक खेळ यामुळे ब गटात पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली लढत 3-3 अशा बरोबरीत सुटली. ख्रिस्टियानो रोनाल्डोने केलेली जिगरबाज हॅटट्रिक या लढतीत निर्णायक ठरली.
गेल्या तीन विश्वचषकात म्हणावा तसा प्रभाव पाडू न शकणाऱ्या रोनाल्डोने आज स्पेनविरुद्ध जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्या जादुई खेळाच्या जोरावर पोर्तुगालने लढतीतील बहुतांश काळ वर्चस्व राखले. अखेरीस पोर्तुगाल पराभवाच्या छायेत असताना रोनाल्डोने 89 व्या मिनिटाला केलेला तिसरा गोल निर्णायक ठरला. रोनाल्डोच्या या गोलच्या जोरावर पोर्तुगालने पराभव टाळत लढत बरोबरीत सोडवली. रोनाल्डोने केलेली हॅटट्रिक ही या विश्वचषकातील पहिली हॅटट्रिक ठरली.
अटीतटीच्या झालेल्या या लढतीत दोन्ही संघांमध्ये सुरुवातीपासूनच काँटेकी लढत पाहायला मिळाली. सामन्याच्या चौथ्या मिनिटालाच ख्रिस्टियाने रोनाल्डोने गोल करून पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. लढतीवर पोर्तुगालचे वर्चस्व दिसत असतानाच डिओगो कोस्टाने 24 व्या मिनिटाला गोल करून स्पोनला बरोबरी साधून दिली. त्यानंतर स्पेनने पोर्तुगालवर हुकूमत राखली. पण मध्यंतराला काही अवधी असतानाच रोनाल्डोने दुसरा गोल करून पोर्तुगालला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरानंतर स्पेनने आक्रमणाची धार वाढवली. 55 व्या मिनिटाला डिएगो कोस्टाने गोल करून स्पोनला बरोबरी साधून दिली. त्यानंतर निको याने 58 व्या मिनिटाला गोल करून स्पेनला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. छोटे छोटे पास देत स्पॉनिश खेळाडूंनी केलेल्या आक्रमणामुळे पोर्तुगालची बचावफळी खिळखिळी झाली. मात्र 89 व्या मिनिटाला बचावफळीतील खेळाडींनी केलेली क्षुल्लक चूक स्पेनला नडली. मग मिळालेल्या फ्री किकचा पुरेपूर फायदा उठवत ख्रिस्टियाने रोनाल्डोने सामन्यातील आपला तिसरा गोल नोंदवतानाच पोर्तुगालला बरोबरीत आणले. अखेर ही लढत 3-3 अशा बरोबरीत सुटली.