क्रोएशियाने केली इंग्लिश सिंहाची शिकार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 05:24 AM2018-07-13T05:24:36+5:302018-07-13T05:24:52+5:30
क्रोएशियाने विनाकारण गुरगुरणाऱ्या इंग्लिश सिंहाची शिकारच केली एकदाची!
- रणजीत दळवी
क्रोएशियाने विनाकारण गुरगुरणाऱ्या इंग्लिश सिंहाची शिकारच केली एकदाची! त्यांनी ट्युनिशिया आणि पनामासारख्या लहान-सहान शिकारी करत आपली हवा निर्माण केली; पण कोलंबियाशी लढताना त्यांचीच शिकार होता होता टळली. स्वीडनवर सेट-पीसच्या गोलवर विजय मिळविताना मोठी शिकार करण्याची त्यांची क्षमता नाही हे उघड झाले. क्रिएरन ट्रिपिअरने केलेल्या गोलवर मिळवलेली आघाडी टिकविण्यात अपयश आलेल्या इंग्लडला क्रोएशियालाही फाडून खाता आले नाही! दात नसलेल्या सिंहासारखी त्यांची अवस्था होती.
इव्हान पेरिसिच क्रोएशियाचा हिरो ठरला! त्याची वेगवान आक्रमणे व संधिसाधूपणामुळे संघाचे मनोबल उंचावले. ६५ व्या मिनिटाला सिमे व्रयालोकाच्या उंच क्रॉसवरील चेंडूला पाय उंचावत त्याने गोल दिशा दिली, हा संधी साधण्याचा सर्वोत्तम नमुना होता. इंग्लडचा काइल वॉकर चेंडू हेड करण्याच्या बेतात असता इव्हानने ‘हाय-बूट’ वापरून चेंडू चक्क ‘पोक’ केला. कदाचित त्याने धोकादायक खेळ केला अशी शंका निर्माण झाली; पण इंग्लंडकडून कोणतीच तक्रार न झाल्याने गोलनिर्णय योग्य ठरला. या गोलने सामन्याचे रूप बदलले.
इंग्लंडला खरे तर स्वप्नवत सुरुवात लाभली. प्रतिस्पर्धी कर्णधार ल्युका मॉड्रिचने त्यांना जे हवे ते दिले. त्याने डेली अलीला पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर अवैधरीत्या रोखले. क्रिएरन ट्रिपिअरने ही सुवर्णसंधी साधली. त्याची फ्री-किक एकदम अचूक! इंग्लिश चाहत्यांना डेव्हिड बेकहमची आठवण त्याने करून दिली. सुुबासिच काय, कोणत्याही गोलरक्षकाला तो अडविता आला नसता. ज्याचे ‘हरीकेन’ म्हणजे वादळ अशी तुलना झाली त्या इंग्लिश कर्णधार हॅरी केनने दोन सोप्या संधी दवडल्याने त्यांची स्थिती भक्कम झाली नाही. केनने सुबासिचला अंशत: चकविले; पण चेंडू खांबावर आदळला. त्या रिबाउंडवरही त्याला गोल करता आला नाही. तेव्हाच केन ‘आॅफ-साइड’ असल्याचा निर्णय दिला. म्हणून त्याचे पहिल्या प्रयत्नावेळचे अपयश थोडेच झाकले जाणार? ‘गोल्डन बूट’ शर्यतीत अव्वल असलेले हे ‘वादळ’ म्हणजे वाºयाच्या साध्या झोताएवढ्या जोराचेही दिसले नाही. सहापैकी ३ गोल पेनल्टीचे, गेल्या तीन लढतींत त्याचा काहीच प्रभावी खेळ नाही.
रहीम स्टर्लिंग, जेस्सी लिनगार्ड व डेले अली यांचाही बुडबुडा फुटला! एक गोल प्रयत्न सोडा, समन्वय साधत एकही चाल त्यांना रचता आली नाही. मॉडरिच सुरुवातीला निष्प्रभ ठरल्याने क्रोएशियाच्या वाट्याला पूर्वाधात दोनच संधी आल्या. प्रथम रेबिचचा ताकदवान फटका इंग्लिश गोलरक्षक जॉर्डन पिकफर्डच्या हातात विसावला. त्यानंतर पेरिसिचने चेंडू लाथाडायला फारच वेळ घेतला. मात्र, पेरिसिच उत्तरार्धात वेगळाच वाटला. त्याचा एक जोरदार लेफ्ट- फूटर दूरच्या गोलखांबावर थडकला. रेबिचने ‘रिबाऊंड’ कमजोरपणे मारला व पिकफर्डने सुटकेचा श्वास सोडला.
शेवटी जादा वेळेत व्रयालको क्रोएशियाचा तारणहार ठरला. जॉन स्टोन्स्चा कॉर्नरवरील हेडर व्रयालकोने गोलरेषेवरून डोक्यानेच परतविला. विजयी गोल करण्यापूर्वी मॅँडझुकीच पेनल्टी क्षेत्रात घुसला; पण पिकफर्ड मोठ्या हिमतीने पुढे सरसावत त्याला सामोरा गेला. चेंडू त्याच्या पायाला लागला व गोल वाचविला. इंग्लंडच्या ११० व्या मिनिटातल्या घोडचुकीचा अचूक लाभ पेरिसिचने उठविला. त्याचा अचूक पास मॅँडझुकीचला मिळाला. त्याला अडविण्यासाठी ना मॅग्वायर ना स्टोन्स पुढे झाले. बिचारा पिकफर्ड, चेंडू त्याच्या खालून गोलमध्ये गेला. यानंतर मॅँडझुकीचने लंगडत मैदान सोडले. इंग्लंडनेही ट्रिपिअर दुखापतग्रस्त होताच, दहा खेळाडूंसह लंगडत सामना पूर्ण केला!