'हँड ऑफ गॉड' फुटबॉलचा लिलाव, रेफ्री झाले मालामाल, 'इतक्या' कोटींना विक्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 08:21 AM2022-11-17T08:21:55+5:302022-11-17T08:23:02+5:30
hand of god ball has been sold : हँड ऑफ गॉड गोलचा इतिहास असलेल्या फुटबॉलचा रेफ्रींनी लिलाव केला.
'हँड ऑफ गॉड' हा केवळ फिफा वर्ल्डकपमध्ये नाही तर फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्धी मिळवणारा गोल आहे. हा गोल फुटबॉल खेळातील महान खेळाडू दिएगो मॅराडोना यांनी केला होता. अर्जेंटिनाच्या स्टार फॉरवर्डने 1986 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध हा गोल केला होता. स्टार फॉरवर्डने ज्या फुटबॉलने हा पराक्रम केला, त्या फुटबॉलचा आता लिलाव झाला आहे.
हँड ऑफ गॉड गोलचा इतिहास असलेल्या फुटबॉलचा त्याच सामन्याच्या रेफ्रींनी लिलाव केला. त्या ऐतिहासिक फुटबॉलचा 24 लाख डॉलर्स म्हणजे जवळपास 20 कोटी रुपयांना लिलाव झाला. 1986 च्या वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात ट्युनिशियाचे अली बिन नासेर हे रेफ्री होते. मेक्सिकोमध्ये झालेल्या वर्ल्डकपमधील हा उपांत्यपूर्व सामना होता.
या सामन्यात हेडरने गोल करण्यासाठी मॅराडोना यांनी हवेत उडी मारली. पण डोक्याऐवजी त्यांनी हाताने गोल केला. रेफ्रींनी हा गोल असल्याचे मान्य केले. इंग्लंडच्या खेळाडूंनी याला जोरदार विरोध केला. पण रेफ्रींनी आपला निर्णय बदलला नाही. यानंतर फूटबॉलच्या इतिहासात हा गोल हँड ऑफ गॉड नावाने ओळखला जाऊ लागला. या उपांत्यपूर्व फेरीनंतर त्या सामन्याचा फूटबॉल रेफ्रींनी स्वत: जवळ ठेवला होता, त्याचा आता लिलाव झाला आहे.
36 वर्षे जुना फुटबॉल 16 नोव्हेंबर रोजी लंडनमधील ग्रॅहम बड लिलावात 20 लाख पाउंड (सुमारे 23 लाख 70 हजार डॉलर) मध्ये विकला गेला. अशाप्रकारे, भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत कोटींमध्ये पोहोचते. दरम्यान, फूटबॉलच्या लिलावाच्या 6 महिने आधी, त्या जर्सीचाही लिलाव झाला होता, जी परिधान करून मॅराडोना यांनी हॅंड ऑफ गॉड गोल केला होता. ट्युनिशियाचे रेफ्री बिन नासेर यांनी फूटबॉलच्या लिलावापूर्वी सांगितले की, हा फूटबॉल जगासोबत शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्याचा खरेदीदार सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.