भारताचे आव्हान संपुष्टात, ४-० गोलने पराभूत : घाना अंतिम सोळांमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:15 AM2017-10-13T01:15:33+5:302017-10-13T01:16:08+5:30
एरिक अयाहने नोंदविलेले २ गोल आणि बदली खेळाडू रिकार्ल्डा डान्सो व इमानुअल टोकूने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर गत दोन वेळचा विजेता घाना संघाने भारतीय संघाचा ४-० गोलने पराभव करून १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील आपली
नवी दिल्ली : एरिक अयाहने नोंदविलेले २ गोल आणि बदली खेळाडू रिकार्ल्डा डान्सो व इमानुअल टोकूने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर गत दोन वेळचा विजेता घाना संघाने भारतीय संघाचा ४-० गोलने पराभव करून १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली. कोलंबियाविरुद्ध चांगल्या खेळाचे प्रदर्शन करणाºया भारतीय संघाला गुरुवारी सलग तिसरा पराभव पत्करावा लागल्यामुळे या स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सुरुवातीला घाणाच्या चपळ खेळाडूंना बरोबरीची टक्कर दिली. पण, घानाच्या आक्रमक आणि नियोजनबद्ध पासमुळे नंतर सामन्यावर त्यांचे वर्चस्व वाढू लागले. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सुमारे ५२ हजार प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्याने भारतीय संघातील खेळाडूंचा उत्साह वाढत होता. पण, घानाच्या खेळाडूंच्या आक्रमकतेमुळे भारतीय संघाची बचाव फळी खिळखिळी झाली. सहाव्या मिनिटाला भारताच्या बचाव फळीला चकवून घाना संघाचा आघाडीचा खेळाडू एरिक अयाह हा भारतीय गोलपोस्टच्या दिशेने घुसला. त्या वेळी भारताचा गोलरक्षक धीरज सिंग एकटाच होता. या वेळी ब्लॅक कॅट्स (घाना)च्या फॉरवर्ड लाईनवर असलेल्या पंचाने त्याला आॅफसाईड म्हणून झेंडा वर केला. त्यामुळे त्याची गोल करण्याची संधी हुकली.
घाना संघाचा राईट विंगर सादीक इब्राहिमने लागोपाठ भारतीय गोलवर चढाया करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना दबावाखाली आणले. भारताचा डिफेंडर संजीव स्टॅलिनने त्याला प्रत्येक वेळी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, घानाच्या या खेळाडूने २०व्या मिनिटात भारताच्या गोलमध्ये चेंडू मारला. पण, धीरज सिंगने तो चपळाईने अडविला. आज झालेल्या संपूर्ण सामन्यात धीरज सिंगने घानाच्या अनेक आक्रमणांना चपळाईने अडवून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. ३४व्या मिनिटाला भारताच्या बोरिसला पंचांनी नियमबाह्य खेळ केल्यामुळे पिवळे कार्ड दाखविले. आजच्या सामन्यात विशेषकरून भारताच्या बचाव फळातील खेळाडू स्टॅलिन अन्वर आणि बोरिस थंगजाम यांनी घाना खेळाडूंच्या अनेक आक्रमणांना रोखून धरणात यश मिळविले.
भारताने जरी पराभव पत्करला असता, तरी संघातील खेळाडूंनी प्रेक्षकांची मने मात्र जिंकली होती. संपूर्ण स्पर्धेवर ६५ टक्के घानाच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले होते. भारताविरुद्धच्या विजयानंतर घानाने ३ सामन्यांत ६ गुण संपादन करून ‘अ’ गटात अग्रस्थान मिळविले. कोलंबिया आणि अमेरिका प्रत्येकी ६ गुणांनंतर अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकावर आहेत. (वृत्तसंस्था)
४३व्या मिनिटाला घानाच्या ऐरिकने एक उत्कृष्ट चाल रचून आपल्या संघाचा पहिला गोल नोंदविला. हा पहिला गोल झाल्यानंतर घाना संघाच्या खेळाडूंनी जलद खेळ करण्यास सुरुवात केली.
त्यातच पुन्हा ऐरिकला ५२व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचा त्याने पूर्ण फायदा घेऊन संघाचा व स्वत:चा दुसरा गोल केला. त्यानंतर त्यांच्या रिकार्डो डान्सोने ८६व्या मिनिटाला संघाचा तिसरा आणि लगेचच एका मिनिटाने इमानुअल टोकोने ८७व्या मिनिटाला चौथा गोल केला.
५३व्या मिनिटाला भारताच्या लालेगमवाईला बॉक्सच्या बाहेर चेंडू मिळाल्यानंतर त्याने गोल करण्याचा प्रयत्न केला; परंतु चेंडू थेट घानाचा गोलरक्षक इब्राहिम डॅनलॅण्डच्या हातात गेला.