मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार या स्टार फुटबॉलपटूंसमोर अठरा वर्षांच्या डेनाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 12:27 PM2017-10-23T12:27:01+5:302017-10-23T12:35:39+5:30

डेना कॅसेलेनोस हे नाव बहुतेकांनी ऐकलेले नसेल परंतु फुटबॉल जगतात सध्या याच नावाच्या अवघ्या 18 वर्षांच्या व्हेनेझुएलाच्या या तरुणीची जोरदार चर्चा आहे.

Eighteen years of Dane challenge before star footballers Messi, Ronaldo and Neymar | मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार या स्टार फुटबॉलपटूंसमोर अठरा वर्षांच्या डेनाचे आव्हान

मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार या स्टार फुटबॉलपटूंसमोर अठरा वर्षांच्या डेनाचे आव्हान

googlenewsNext

- ललित झांबरे 

लंडन - डेना कॅसेलेनोस हे नाव बहुतेकांनी ऐकलेले नसेल परंतु फुटबॉल जगतात सध्या याच नावाच्या अवघ्या 18 वर्षांच्या व्हेनेझुएलाच्या या तरुणीची जोरदार चर्चा आहे. लियोनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेमार यांच्यासारख्या दिग्गजांसोबत ती जागतिक फुटबॉल नियंत्रण संस्था (फिफा) च्या सर्वात मानाच्या पुरस्कारांच्या स्पर्धेत आहे, किंबहुना या दिग्गजांच्याही ती पुढे आहे कारण 'फिफा'च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये दोन-दोन गटात नॉमिनेशन मिळालेली ती यंदाची एकमेव फुटबॉलपटू आहे.

डेना ही वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू आणि वर्षातील सर्वोत्तम गोल या दोन पुरस्कारांसाठी टॉप-3 मध्ये शॉर्ट लिस्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्वोत्तम गोलासाठीच्या पुस्कास ट्रॉफीसाठी  अर्सेनलचा स्ट्रायकर ऑलिव्हर जिरोड आणि बारोकाचा गोलकिपर ओस्कारीन मासालुके या पुरुष फुटबॉलपटूंशी तिची स्पर्धा आहे. म्हणजे अवघ्या 18 वर्षांची ही तरुणी पुरुषांना टक्कर देते आहे. 
लंडनच्या पेलाडियम थिएटरमध्ये सोमवारी रात्री 'फिफा'च्या या पुरस्कारांची घोषणा होणार आहे. त्यावेळी डेना सेलेनोस ही मेस्सी, नेमार, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यासोबत पहिल्या रांगेत बसलेली दिसणार आहे. 

सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी लियेकी मार्टिन्स आणि कार्ली लॉयड या तिच्या स्पर्धक आहेत तर सर्वोत्तम गोलासाठी अंतिम तिघात स्थान मिळवलेली फुटबॉल इतिहासातील ती केवळ तिसरीच महिला फुटबॉलपटू आहे. योगायोगाने व्हेनेझुएलाचीच दानीउस्का रॉड्रिगेजला गेल्यावर्षी या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी व्हेनेझुएलाची महिला फुटबॉलपटू पुस्कास ट्रॉफीच्या स्पर्धेत आहे. 

डेनाच्या या देदिप्यमान यशाचे वैशिष्ट्य हे की ती आतापर्यंत एकही प्रोफेशनल लीग सामना खेळलेली नाही की सिनियर संघात  खेळलेली नाही. आतापर्यंत ती जे काही खेळलीय ते ज्युनीयर संघातच. अगदी 20 वर्षाआतील संघातसुध्दा ती खेळलेली नाही तरी मेस्सी-नेमार-रोनाल्डोंच्या पंक्तीत ती जाऊन बसलीय हेच तिचे सर्वात मोठे यश आहे. 

गेल्या काही वर्षातील डेनाच्या कामगिरीवर नजर टाकली तर ती या दिग्गजांसोबत का गणली जाऊ लागलीय याची कल्पना येईल. 2013 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षीच ती साऊथ अमेरिकन फुटबॉल चॅम्पियनशीप विजेत्या संघात होती. 2014 च्या 17 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धेत व्हेनेझुएलाचा संघ चौथ्या स्थानी राहिला त्यावेळी डेनाने सहा गोल करुन सर्वाधिक गोलांसाठीचा गोल्डन बूट पटकावला होता. त्याचवर्षी चीनमध्ये खेळल्या गेलेल्या युवा अॉलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या आपल्या संघासाठी तिने सर्वाधिक सात गोल केले होते. गेल्यावर्षी व्हेनेझुएलाने पुन्हा साऊथ  अमेरिकन फुटबॉल चॅम्पियनशीप जिंकली त्यात डेनाचे योगदान सर्वाधिक 12 गोलांचे होते. यावेळीसुध्दा गोल्डन बूट व स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार तिनेच पटकावला. गेल्यावर्षीचा 17 वर्षाआतील विश्वचषक तिने सलग दुसऱ्यांदा गाजवला आणि ब्राँझ बॉल व ब्राँझ बूटाचा पुरस्कार जिंकला. यावेळी डेनाचे योगदान पाच गोलांचे राहिले. यासह 17 वर्षाआतील विश्वचषकात 11 गोलांसह सर्वाधिक गोलांचा विक्रम तिच्या नावावर आहे. 

याशिवाय 17 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धेत  कमेरुनविरुध्द उंचावरुन चेंडू फटकावत केलेल्या भन्नाट गोलाने तिला वर्षातील सर्वोत्तम गोलांच्या स्पर्धेत आणून ठेवलेय. याच्या जोडीला युएस सेकंड डिव्हिजन स्पर्धेत 30 यार्डावरुन केलेला गोल, कॅनडाविरुध्द वळून केलेला बंदूकीच्या गोळीसारखा वेगवान गोल, ब्राझीलविरुध्द खांद्यावरुन फ्लिक करुन केलेला गोल आणि महाविद्यालयीन स्पर्धेत केलेली हॅट्ट्रीकसह तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

अशा लक्षवेधी कामगिरीमुळे 'फिफा'ने महिला फुटबॉलच्या या नव्या चेहऱ्याला शॉर्टलिस्ट केले. तिच्या नामांकनाची फिफाने घोषणा केली त्यावेळी डेना तिच्या एका जलतरणपटू मित्रासोबत होती. त्या क्षणांबद्दल डेना म्हणते, "आम्ही बोलत बोलतच तो कार्यक्रम बघत होतो आणि माझ्या नावाची घोषणा झाली. मला विश्वासच बसेना. त्याक्षणी मी खूपच भावूक झाले. माझा मित्र म्हणाला की त्याला माझा खूप अभिमान आहे. नंतर आईला मी हे फोनवर कळवले तर ती रडायलाच लागली".

व्हेनेझुएलाची राजधानी कराकासपासून उत्तरेला दीड तासाच्या अंतरावर असलेले मराके हे डेनाचे गाव. तेथील रिचर्ड कॅसेलेनास या हार्डवेअर व्यापाऱ्याची ही मुलगी. मुलींनी एकतर टेनिस खेळावे किंवा डान्स ले करावा अशी तेथील नागरिकांची विचारसरणी. याच मनोधारणेतून रिचर्ड यांचा डेनाच्या फुटबॉल खेळण्यास विरोध होता. ते म्हणायचे, हा पुरुषी खेळ आहे, मुलींसाठी नाही. डेनाची आई मात्र तिच्या पाठीशी होती. तिची आई म्हणायची, "मी जेंव्हा तरुण होती, तेंव्हा मी तुझ्यासारखीच होती. पुरुषी खेळ खेळायची". डेनाचा मोठा भाऊ, अल्वारो फुटबॉल खेळायचा. तो सराव करायचा तेथेच मैदानाच्या बाजूला चेंडूशी खेळताना डेनाने प्रशिक्षकांचे लक्ष वेधले. तेथून तिचा फुटबॉल प्रवास सुरु झाला. आई, भाऊ अल्वारो आणि डेना एकत्रित सरावाला जाऊ लागले. एका दिवशी प्रवास करुन परतलेल्या वडिलांना डेना म्हणाली, "मला तुम्हाला काही दाखवायचेय". रिचर्डने विचारले, काय? तर ती उत्तरली, फुटबॉल ! रिचर्ड आश्चर्याने म्हणाले, काय..फुटबॉल! पण त्यांनी आग्रहापोटी डेनाचा खेळ पाहिला आणि त्यांच्या लक्षात आले की डेनाला फुटबॉलची मनापासून आवड आहे. ती बघून त्यांनी तिला फुटबॉल खेळण्यास परवानगी दिली आणि डेनाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर ती अमेरिकेत आली. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी संघात तिने स्थान मिळवले. इंग्रजी शिकली. आता ती जनसंवाद पदवीच्या द्वितीय वर्षाला आहे.  आणि  शिकता शिकता फुटबॉल खेळत आता ती फिफाच्या सर्वोत्तम पुरस्काराच्या स्पर्धेत आहे. 

अमेरिकेतील फुटबॉल शो होस्ट पॅटी ला बेला यांनी डेनाच्या खेळाच्या वैशिष्ट्यांचे सुंदर वर्णन केले आहे.  म्हणण्यानुसार डेनाचा खेळ बघायला मजा येते. ती चेंडूवर चपळाईने येते आणि चेंडूची दिशा बदलण्याचे तिचे कौशल्य विलक्षण आहे. पाच वेळा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब जिंकणाऱ्या ब्राझिलियन महिला फुटबॉलपटू मार्ताच्या खेळाची आठवण करुन देणारा तिचा खेळ आहे. क्लब बार्सिलोनाची चाहती असलेल्या डेनाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर युरोपात खेळण्याचे स्वप्न आहे आणि 'फिफा' चा पुरस्कार मिळाल्यास तिचे हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
 

Web Title: Eighteen years of Dane challenge before star footballers Messi, Ronaldo and Neymar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.