विश्वविजयाचा ‘नायक’!

By स्वदेश घाणेकर | Published: December 25, 2022 10:02 AM2022-12-25T10:02:58+5:302022-12-25T10:03:38+5:30

आयुष्यात त्याने स्वत:चे ‘गोल’ निश्चित केले आणि ते साध्य करण्यासाठी कमालीचा संघर्षही केला... 

emiliano martinez real hero of fifa world cup 2022 victory | विश्वविजयाचा ‘नायक’!

विश्वविजयाचा ‘नायक’!

Next

स्वदेश घाणेकर, लोकमत डॉट कॉम

फुटबॉलमध्ये आक्रमकता तुम्हाला सामना जिंकून देऊ शकते, परंतु बचाव तुम्हाला चषक जिंकून देऊ शकतो.’ - सर ॲलेक्स फर्ग्युसन यांचे हे विधान अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने तंतोतंत खरे ठरवले. 

अर्जेंटिनाने कतारमध्ये इतिहास घडविला अन् ३६ वर्षांचा वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवला. कर्णधार लिओनेल मेस्सीचा हा अखेरचा वर्ल्ड कप असल्याने अर्जेंटिनाचे फॅन्स आधीच भावनिक झाले होते. त्यात साखळी गटातील पहिल्याच सामन्यात हार पत्करल्याने त्यांची धाकधुक वाढली; पण, अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या मेहनतीला चमत्काराची जोड मिळाली अन् अर्जेंटिनाने राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे कामगिरी केली. या वर्ल्ड कप विजयाचे श्रेय हे एकट्या मेस्सीचे नाही. डी मारिया, झेव्हिअर 

अलव्हारेज यांच्यासह मैदानावर खेळणाऱ्या अन् डग आऊटमध्ये बसून चीअर करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे हे यश आहे. पण, फायनलचा खरा नायक गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ हा आहे. 

आर्सेनल क्लबने मार्टिनेझला १७ वर्षांचा असताना करारबद्ध केले. २०१० साली करार झाला, तरी २०२० पर्यंत मार्टिनेझला क्लबने एकही सामना खेळवला नाही. इतकी वर्षे राखीव गोलरक्षक असलेल्या मार्टिनेझने आत्मविश्वास गमावला नाही. जेव्हा संधी मिळेल तेव्हा जगाला आपली धमक दाखवायची, हाच निर्धार त्याने मनाशी पक्का केला होता. त्याला २०२० मध्ये पहिल्यांदा आर्सेनलने संधी दिली ती थेट एफ ए कप फायनलमध्ये... 

ईपीएलमधील मोठ्या क्लबपैकी एक चेल्सीविरुद्ध मार्टिनेझ मैदानावर उतरला अन् संघाला चॅम्पियन बनवले. नियमित गोलरक्षक बर्न्ड लिनोचे जायबंदी होणे, हे मार्टिनेझसाठी वरदान ठरले. १० वर्षांनी मिळालेली संधी मार्टिनेझने दोन्ही हातांनी घट्ट पकडली अन् नशिबाने कलाटणी मारली...
   
मार्टिनेझचा प्रवास  

- १७व्या वर्षी मार्टिनेझ घरच्यांना सोडून अर्जेंटिनाहून लंडनला आला. आर्सेनल क्लबने त्याला करारबद्ध केल्याचे कळताच आई व भाऊ ढसढसा रडू लागले.  

- बिल भरायला पैसे नसल्याने वडिलांना रडताना पाहिले होते आणि म्हणून त्याने आर्सेनलचा करार स्वीकारला. त्यावेळी तो घरच्यांचा भावनांचा आदर करून थांबला असता तर कदाचित फुटबॉल विश्वाने एक हिरा गमावला असता.      

- चेल्सीविरुद्ध प्रथम खेळायला तो मैदानावर उतरला तेव्हा आई सुसाना व वडील अल्बेर्टो स्टेडियमवर उपस्थित नसल्याची खंत मार्टिनेझला आजही आहे. 

- त्याने एकदा आईला सांगून टाकले, की जेव्हा मी १८ वर्षांचा होईन आणि एनफिल्ड येथे राहायला जाईन. त्यानंतर मी परत घरी येईन तो यशस्वी होऊनच... मला इतर खेळाडूंसारखे हताश होऊन युरोपमधून परत यायचे नाही. त्याने त्याचे शब्द खरे ठरवले अन् आज तो अर्जेंटिनाचा ‘नायक’ म्हणून घरी परतला आहे....

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: emiliano martinez real hero of fifa world cup 2022 victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.