Corona Virus: इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूची कोरोनाशी लढाई; प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 10:18 AM2020-04-17T10:18:31+5:302020-04-17T10:24:14+5:30
कोरोना व्हायरसची झळ क्रीडा क्षेत्रालाही बसली आहे
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 21 लाख 82,823 इतकी झाली असून 1 लाख 45,551 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पण, दिलासादायक बाब म्हणजे 5 लाख 47,679 लोकं बरी झाली आहेत. कोरोना व्हायरसची झळ क्रीडा क्षेत्रालाही बसली आहे. इंग्लंडफुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघाचे स्टार खेळाडू नॉर्मन हंटर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
76 वर्षीय नॉर्मन हे 1966च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य होते. गत आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती लीड्स फुटबॉल क्लबने दिली आहे.
📰 Club Statement: Norman Hunter Update #KeepFightingNorman
— Leeds United (@LUFC) April 16, 2020
नॉर्मन हे वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य होते, परंतु त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी लीड्स क्लबला दोन जेतेपद पटकावून दिली होती. 29 ऑक्टोबर 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. लीड्स क्लबसाठी त्यांनी 726 सामने खेळे आणि त्यात त्यांनी 21 गोल केले. 1962 ते 1976 या कालावधीत ते लीड्स साठी खेळले. त्यानंतर 1976 ते 1979 या कालावधीत ब्रिस्टल सिटी आणि 1979 ते 1982 या कालावधीत बर्न्सले क्लबचे प्रतिनिधित्व केले.
नॉर्मन यांनी 1964 ते 1965 कालावधीत इंग्लंडच्या 23 वर्षांखालील आणि 1965 ते 1974 या कालावधीत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले. खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी 1980 ते 1990 मध्ये ते संघाचे व्यवस्थापक होते.