इंग्लंड उपउपांत्य फेरीत, मेक्सिकोचा पराभव; ३-२ ने मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:31 IST2017-10-12T00:31:03+5:302017-10-12T00:31:15+5:30
दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या मेक्सिको संघाचा पराभव करीत इंग्लंडने १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.

इंग्लंड उपउपांत्य फेरीत, मेक्सिकोचा पराभव; ३-२ ने मात
कोलकाता : दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या मेक्सिको संघाचा पराभव करीत इंग्लंडने १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना इंग्लंडने ३-२ गोलने जिंकला. सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ४० हजार ६२० प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती.
इंग्लंडने पहिल्या सत्रात सामन्यावर वर्चस्व राखले. सुरुवातीच्या काही गोलसंधी वाया गेल्यानंतर ३९ व्या मिनिटाला रियान ब्रुस्टरने फ्री कीकवर गोल नोंदवला. मध्यंतरानंतर चौथ्या मिनिटाला फिलिप फोडेन याने गोल करत इंग्लंडची आघाडी २-० वर नेली. तर ५७व्या मिनिटाला फोडेनने पेनल्टी शूटआऊटवर गोल करीत इंग्लडला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर मेक्सिकोने सामन्यात पुनरागमन करीत डिएगो लेनेजच्या सलग दोन गोलच्या जोरावर आघाडी २-० ने कमी केली. विजय मिळवण्यात ते अपयशी ठरले. सात वेळा कोनकाकाफ चॅम्पियन राहिलेल्या मेक्सिकोचा या मालिकेतील हा पहिला पराभव आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात इराकला १-१ अशा गोलबरोबरीत रोखले होते. (वृत्तसंस्था)