ब्राझील-इंग्लंड रंगतदार लढतीची अपेक्षा, अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत इंग्लंड संघाची शानदार कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 04:12 AM2017-10-24T04:12:28+5:302017-10-24T04:18:13+5:30
जर्मनी आणि ब्राझील यांच्यादरम्यानची उपांत्यपूर्व फेरीची लढत बघण्यासारखी होती. कोलकाताच्या युवा भारतीय क्रीडांगणातील गर्दी बघितल्यानंतर या लढतीचे महत्त्व स्पष्ट होते.
- गुरप्रीतसिंग संधू लिहितात...
जर्मनी आणि ब्राझील यांच्यादरम्यानची उपांत्यपूर्व फेरीची लढत बघण्यासारखी होती. कोलकाताच्या युवा भारतीय क्रीडांगणातील गर्दी बघितल्यानंतर या लढतीचे महत्त्व स्पष्ट होते. विशेषत: ही लढत फुटबॉलजगतातील दोन दिग्गज संघांदरम्यान होती. सामन्यादरम्यानचे वातावरण भारतातील फुटबॉलला वेगळी पातळी प्रदान करणारे होते. अशा लढती आणि लढतीपूर्वीच्या वातावरणामुळे संघांवर दडपण येते. पण, ज्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये बसून या लढतीचा आनंद उपभोगला त्यांच्यासाठी हा अनुभव संस्मरणीय ठरणारा असेल.
जर्मनीचा संघ शारीरिकदृष्ट्या मजबूत होता, असे काही म्हणू शकतात, पण दर्जाचा विचार करता ब्राझीलचा संघ उजवा होता आणि अखेर हीच बाब निकालातील अंतर स्पष्ट करणारी ठरली. विशेषत: ब्राझीलने मध्यंतरानंतर शानदार खेळ केला. जर्मनी संघाने पहिल्या हाफमध्ये त्यांच्या तुलनेत चांगला खेळ केला होता, ही बाब ब्राझीलला विसरता येणार नाही. जर्मनी संघाने एक गोलही नोंदवला आणि हा संघ त्यापेक्षा अधिक गोल नोंदवू शकला असता. ब्राझीलला आता इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी या बाबीवर लक्ष द्यावे लागेल. इंग्लंडचा संघ संतुलित आहे. अशा स्थितीत ब्राझीलला विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरण्यापूर्वी आपल्या उणिवा दूर कराव्या लागतील.
कदाचित आता जगभरातील चाहत्यांच्या नजरा ब्राझील व इंग्लंड यांच्यादरम्यान खेळल्या जाणा-या उपांत्य लढतीवर केंद्रित झाल्या असतील. या अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत इंग्लंड संघाने शानदार कामगिरी केली. त्यांनी तुल्यबळ अमेरिका संघाचा पराभव केला. अमेरिका संघ मजबूत होता, हे विसरता येणार नाही. विशेषत: त्यांचा बचाव. अशा स्थितीत त्यांच्याविरुद्ध चार गोल नोंदविणाºया संघामध्ये काहीतरी विशेष तर नक्कीच असेल. त्यामुळेच उपांत्य फेरीची लढत रंगतदार होण्याची आशा आहे. अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मजबूत घाना संघाला पराभूत करणाºया माली संघाच्या कामगिरीमुळे प्रभावित झालो. उपांत्य फेरीच्या लढती रंगतदार आहेत. या चारही संघांमध्ये जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे, पण विजेता तर सर्वोत्तम संघच राहील. (टीसीएम)