युरो चॅम्पियन्सपुढे आफ्रिकन धडाका रोखण्याचे आव्हान, आज स्पेन-माली भिडणार, अंतिम फेरीसाठी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:39 AM2017-10-25T00:39:51+5:302017-10-25T00:40:02+5:30
मुंबई : भारतात पहिल्यांदाच आयोजित झालेली १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून बुधवारी नवी मुंबईमध्ये स्पेन आणि माली यांच्यात चुरशीचा उपांत्य सामना रंगेल.
मुंबई : भारतात पहिल्यांदाच आयोजित झालेली १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून बुधवारी नवी मुंबईमध्ये स्पेन आणि माली यांच्यात चुरशीचा उपांत्य सामना रंगेल. एकीकडे तंत्रशुद्ध खेळ करणारा बलाढ्य स्पेन, तर दुसरीकडे तुफानी हल्ले करत प्रतिस्पर्धी संघाला दडपणाखाली आणणारा बिनधास्त खेळणारा माली, असा सामना रंगणार असल्याने फुटबॉलप्रेमींना थरारक आणि उच्च दर्जाच्या फुटबॉलची मेजवानी मिळेल.
नेरुळ येथील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणा-या या रंगतदार सामन्यात लहान पास देणाºया ‘टिकी टाका’ पद्धतीने खेळणा-या स्पेनच्या विजयाची संभावना व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे आफ्रिकी चॅम्पियन असलेल्या मालीने आपल्या बिनधास्त खेळाच्या जोरावर समोर आलेल्या प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धूळ चारत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळेच, स्पेनला अंतिम फेरी गाठण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. विशेष म्हणजे, दोन्ही संघांना स्पर्धेतील आपल्या सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यानंतर त्यांनी शानदार खेळ करताना दिमाखात बाद फेरी गाठली. त्याचवेळी, गटसाखळीमध्ये ‘ब’ गटात समावेश असलेल्या मालीचे साखळी सामने डीवाय पाटील स्टेडियमवर झाल्याने त्यांना या मैदानाचा चांगला अंदाज आहे आणि ही त्यांच्यासाठी या सामन्यात जमेची बाब आहे. त्याचवेळी, स्पेनने आपले बहुतांश सामने कोच्ची येथे खेळल्याने त्यांना नवी मुंबईतील वातावरणाशी जुळवून घेणे आव्हानात्मक असेल. मालीने आपले याआधीचे दोन्ही सामने पावसात खेळले असून उपांत्यपूर्व फेरीत गुवाहाटी येथे घानाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी ओल्या मैदानावर निर्णायक विजय मिळवला होता. आक्रमकता ही मालीची जमेची बाजू असून त्या जोरावर ते स्पेनसारख्या बलाढ्य संघाला धक्का देण्याची क्षमता राखून आहेत. लासाना एनडियाए याने स्पर्धेत आतापर्यंत ५ गोल नोंदवले असून त्याच्यावरच आक्रमणाची प्रमुख जबाबदारी असेल. त्याचप्रमाणे, हादजी डेÑम आणि जेमूसा टी या वेगवान स्ट्रायकरचाही स्पेनला धोका आहे. दुसरीकडे, तीन वेळचा १७ वर्षांखालील युरो चॅम्पियन असलेल्या स्पेनपुढे मालीच्या आक्रमकतेला आणि त्यांच्या वेगवान खेळाला रोखण्याचे मुख्य आव्हान असेल. सलामीला ब्राझीलविरुद्ध पराभूत झाल्यानंतर स्पेनने नायजेर आणि उत्तर कोरियाला सहजपणे नमवले.