युरो चषक- पोलंडने बलाढ्य स्पेनला बरोबरीत रोखले; लेवानदोवस्कीचा गोल ठरला निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 07:51 AM2021-06-21T07:51:38+5:302021-06-21T07:51:48+5:30
सेविले : शानदार आक्रमक खेळ करत आघाडी मिळवल्यानंतरही स्पेनला युरो चषक फुटबॉल स्पर्धेत पोलंडविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. गोल ...
सेविले : शानदार आक्रमक खेळ करत आघाडी मिळवल्यानंतरही स्पेनला युरो चषक फुटबॉल स्पर्धेत पोलंडविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्याचा फटका स्पेनला बसला. रॉबर्ट लेवानदोवस्की याने केलेला गोल पोलंडसाठी निर्णायक ठरला आणि या जोरावर त्यांनी बलाढ्य स्पेनला १-१ असे बरोबरीत रोखले.
फिफाचा यंदाचा सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेल्या लेवानदोवस्की याने आपल्या लौकिकानुसार दमदार खेळ करताना स्पेनला विजयापासून रोखले. त्याने ५४व्या मिनिटाला हा गोल करत पोलंडच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. स्पेनच्या अल्वारो मोराटा याने २५व्या मिनिटाला शानदार गोल करत संघाला आघाडीवर नेले. यानंतर स्पेनकडून आणखी आक्रमणाच अपेक्षा होती आणि त्यांनी तसा खेळ केलाही. परंतु, पोलंडने भक्कम बचाव करत स्पेनला यश मिळू दिले नाही.
स्पेनसाठी सर्वात मोठी संधी हुकली ती पेनल्टी किकवर. यावेळी गेरार्ड मोरेना याने पेनल्टीवर मारलेली किक गोलपोस्टला लागून परत आला, मात्र त्यावेळीही त्याला गोल करण्यात यश आले नाही. ही सुवर्ण संधी हुकल्याचा मोठा फटका स्पेनला बसला. स्पेनला सलामीच्या सामन्यातही स्वीडनविरुद्ध वर्चस्व राखल्यानंतरही गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले. त्यामुळे दोन सामने बरोबरीत सुटल्याने स्पेनला बाद फेरीत आगेकूच करण्यासाठी अखेरचा साखळी सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. पोलंडला सलामीला स्लोवाकियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता.