युरोपियन तडक्यातून ठरणार विश्वविजेता, स्पेन, इंग्लंड विश्वचषकासाठी भिडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:02 AM2017-10-28T04:02:29+5:302017-10-28T04:02:37+5:30

कोलकाता : येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये शनिवारी रात्री स्पेन आणि इंग्लंडच्या रुपाने दोन युरोपियन फुटबॉल शक्ती १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक उंचावण्यासाठी एकमेकांविरुद्ध भिडतील.

European champions will take on World Cup, Spain and England for the World Cup | युरोपियन तडक्यातून ठरणार विश्वविजेता, स्पेन, इंग्लंड विश्वचषकासाठी भिडणार

युरोपियन तडक्यातून ठरणार विश्वविजेता, स्पेन, इंग्लंड विश्वचषकासाठी भिडणार

Next

कोलकाता : येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये शनिवारी रात्री स्पेन आणि इंग्लंडच्या रुपाने दोन युरोपियन फुटबॉल शक्ती १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक उंचावण्यासाठी एकमेकांविरुद्ध भिडतील. दोन आक्रमक शैलीचे संघ आपल्या पूर्ण ताकदीने खेळणार असल्याने यावेळी फुटबॉलप्रेमींना उच्च दर्जाच्या फुटबॉलची मेजवानी मिळणार हे निश्चित. विशेष म्हणजे, या लढतीच्या निमित्ताने युवा विश्वचषकात पहिल्यांदाच नवा चॅम्पियन मिळणार असल्याने कोण विजेता ठरणार, याकडे विश्व फुटबॉलचे लक्ष लागले आहे.
जागतिक फुटबॉलमध्ये निद्रिस्त शक्ती असलेल्या भारताला जागविण्यासाठी ‘फिफा’ने १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताला सोपविण्याचा निर्णय घेतला. सुमारे ३ आठवड्यांपासून सुरु असलेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून शनिवारी अंतिम सामन्याआधी तिसºया स्थानासाठीही माली विरुध्द ब्राझील असा सामना रंगेल. त्याचवेळी, या दोन्ही सामन्याद्वारे यजमान भारत युवा विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक प्रेक्षक उपस्थितीचा विश्वविक्रमही नोंदवणार असल्याचे निश्चित आहे.
तब्बल ६६ हजार प्रेक्षकसंख्या असलेल्या स्टेडियममध्ये स्पेन आणि इंग्लंड जेतेपद पटकावण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नसल्याने हा सामना अत्यंत चुरशीचा व रोमांचक होईल. दोन्ही संघांची मुख्य ताकद आक्रमणामध्ये असल्याने यावेळी दोन्ही संघाच्या बचावफळीची मोठी परीक्षा होईल. आतापर्यंत स्पर्धेत इंग्लंडने १८, तर स्पेनने १५ गोल नोंदवले आहेत. त्याचवेळी, इंग्लंड स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ असल्याने स्पेनला सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडला रोखण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. चौथ्यांदा युवा विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या इंग्लंडने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली असून स्पेनने याआधी १९९१, २००३ आणि २००७ मध्ये उपविजेतेपद पटकावले आहे.
कामगिरीवर नजर टाकल्यास इंग्लंड स्पेनहून किंचित वरचढ आहे. याचे कारण म्हणजे, त्यांनी उपांत्य सामन्यात बलाढ्य आणि संभाव्य विजेत्या ब्राझीलचा एकतर्फी पराभव करुन दिमाखात अंतिम फेरी गाठली. त्याचवेळी, इंग्लंडने आपल्या सहापैकी पाच सामने सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळले असल्याने त्यांच्यासाठी हे एकप्रकारे होमग्राऊंड झाले आहे. दोन्ही संघ खूप वेळ चेंडू आपल्याकडे राखण्यासाठी तरबेज आहेत. मात्र, ‘टिकी टाका’ या आपल्या प्रसिध्द शैलीने खेळणा-या स्पेनने सर्वाधिक वेळ चेंडू आपल्याकडे ठेवत प्रतिस्पर्धी संघाला दबावाखाली आणले आहे. यामुळे इंग्लंडपुढे विजयासाठी कठिण आव्हान असेल. (वृत्तसंस्था)

>सर्वाधिक प्रेक्षकसंख्येसह स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विक्रम भारताच्या यजमानपदाखाली होणार आहे. आतापर्यंत ५० सामन्यांत
१७० गोल झाले आहेत. २०१३ साली यूएईमध्ये झालेल्या १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक १७२ गोल नोंदले गेले होते. शनिवारी होणाºया सामन्यांतून विक्रमही मोडला जाण्याचे निश्चित आहे.
>स्पेन जेतेपदाचा दुष्काळ संपवणार ?
युवा विश्वचषक स्पर्धेत स्पेनने एकूण ३ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. परंतु, दरवेळी जेतेपद निसटल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. चौथ्यांदा युवा विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेला स्पेन संघ यंदा विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का हीच उत्सुकता फुटबॉलप्रेमींमध्ये आहे. यावर्षी मे मध्ये झालेल्या युवा युरो चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडला नमवून बाजी मारली होती. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा स्पेनचा
निर्धार असेल.
>इंग्लंडला वचपा काढण्याची संधी
यंदा मे महिन्यात क्रोएशिया येथे झालेल्या १७ वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही स्पेन व इंग्लंड यांच्यातच झाला होता. त्यावेळी, संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखलेल्या इंग्लंडला अंतिम मिनिटात गोल स्वीकारावा लागल्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये १-४ असा पराभव पत्करावा लागला होता.याच पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळाली असल्याने
इंग्लंड पूर्ण त्वेषाने स्पेनविरुध्द लढेल.
>इंग्लंड धडाका कायम राखणार?
सध्या आंतरराष्ट्रीय ज्यूनिअर फुटबॉलमध्ये इंग्लंडने शानदार कामगिरी केली आहे.
यावर्षाच्या सुरुवातीला कोरियामध्ये झालेल्या २० वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने बाजी मारली होती.
यानंतर इंग्लंडचा १९ वर्षांखालील संघ युरोपियन चॅम्पियनही ठरला होता. त्यामुळे आता त्यांना १७ वर्षांखालील संघाकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
>१९६६ साली बॉबी मूरेच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या वरिष्ठ संघाने पहिल्यांदा विश्वचषक उंचावला होता. यानंतर यावर्षी जूनमध्ये २० वर्षांखालील इंग्लंड संघाने व्हेनेजूएलाला नमवत विश्वचषका जेतेपदाचा दुष्काळ संपवला होता.
>इंग्लंड : अंतिम सामन्यात इंग्लंड ४-२-३-१ अशा प्रारुपमध्ये खेळण्याची शक्यता आहे. गोलरक्षक कर्टिस अँडरसनच्या सोबतीला कर्णधार जोएल लैटिबियुडिअर, मार्क गुएही, जोनाथन पैंजो आणि स्टिव्हन सेसगनन यांचा बचवफळीत समावेश असेल. टॅशन ओकले बूथ आणि जॉर्ज मैकईचरन मध्यरक्षक म्हणून, तर कॅलम हडसन ओडोई आणि फिलिप फोडेन विंगर म्हणून जबाबदारी पार पाडतील. मुख्य स्ट्रायकर ब्रेवस्टरला मॉर्गन गिब्स व्हाइटची मदत होईल.
>स्पेन : संघात एफसी बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद संघाशी जुळलेल्या युवा खेळाडूंचा समावेश आहे. जुआन मिरांडा, ह्यूगो गुलियामान, व्हिक्स्टर चस्ट आणि मातेयू जौमी मूरे यांचा समावेश बचावफळीत असून सीजर गेलबर्ट, अँटोनियो ब्लांको आणि मोहम्मद मोकलिस मध्यरक्षक राहतील. मुख्य स्ट्रायकर आणि कर्णधार रुईज याला सर्जियो गोमेज आणि फेरान टोरेस या विंगर खेळाडूंची मदत होईल.
>या दोघांनीही उपांत्य सामन्यात आपआपल्या संघांना एकहाती अंतिम फेरीत नेले. या दोघांमध्येच या सामन्याच्या निमित्ताने गोल्डन बूटसाठी स्पर्धाही रंगणार आहे.

Web Title: European champions will take on World Cup, Spain and England for the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.